You are currently viewing मालवणात उद्योजक संवाद मेळावा संपन्न

मालवणात उद्योजक संवाद मेळावा संपन्न

मालवण

भाजपचे प्रदेश सरचिटणीस माजी खासदार नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण येथील मौनीनाथ महाराज ट्रस्टतर्फे केंद्रीय लघु, सुक्ष्म, मध्यम मंत्रालयांतर्गत उद्योजकता संवाद मेळावा येथील दैवज्ञ भवन येथे पार पडला. या मेळाव्यात तरुण उद्योजकांना विविध उद्योग व त्यादृष्टीने असणाऱ्या योजना याबाबत अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले.

या मेळाव्याला खादी ग्रामोद्योग मंत्रालयाचे उदय बराटे, संतोष भोईर, कॉयर बोर्डाचे श्रीनिवास, लघु- सुक्ष्म- मध्यम मंत्रालयाचे डी. आर. जोहरी, लिड बँक मॅनेजर मुकेश मेश्राम, नाबार्डचे अजय बुटे, मत्स्य विभागाचे हिमांशू कदम, वैभवी देसाई, खेमराज सावंत उपस्थित होते. अधिकाऱ्यांचे आयोजक विजय कैनवडेकर यांनी स्वागत केले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, ललित चव्हाण, पूजा करलकर, पूजा सरकारे, ममता वराडकर, महानंदा खानोलकर, शर्वरी पाटकर, नारायण धुरी, मोहन वराडकर, विक्रांत नाईक, जॉन नन्होना, सुनील बागवे, नरेंद्र जामसंडेकर, नंदू देसाई, चंदू आचरेकर उपस्थित होते.

यावेळी सर्व अधिकाऱ्यांनी आपापल्या खात्यातील योजनांची माहिती दिली. उद्योग आधारची व सामूहिक व्यवसाय व सेवा याबाबत डी. आर जोहरी यांनी माहिती देऊन उद्योग आधारची नोंदणी करून देण्यात आली. उदय बराटे यांनी खादी ग्रामोद्योगची कोणतीही कर्ज योजना व नोंदणी याची माहिती देऊन कर्जप्रकरण करताना कोणतीही फी आकारली जात नसून कर्जप्रकरण पूर्णपणे ऑनलाईन करता येते, याबाबत माहिती देण्यात आली.

नाबार्डचे अजय बुटे यांनी शेतकरी बांधवांना योजना आणि त्यासाठी आवश्यक असणारा कर्जपुरवठा, शेळी-मेंढी- कुक्कुटपालन याची माहिती दिली. बँकेमध्ये अडकलेली कर्ज प्रकरणे का प्रलंबित राहतात, याचे मार्गदर्शन मुकेश मेश्राम यांनी केले. काही कर्जधारकांना आवश्यक असणारी माहिती करून देऊन ताबडतोब त्याच ठिकाणी अधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणली. मत्स्यसंपदा योजनेत सामूहिक मत्स्यपालनासाठी खाडीपात्रात मोठा प्रकल्प करण्यास मोठी संधी असून जास्तीत जास्त लाभार्थ्याने त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले होते. केंद्रीय सुक्ष्म लघु-मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत महिलांना छोट्या उद्योगासाठी आवश्यक योजनांची माहिती देऊन काही महिला गटांना यासंबंधी प्रकल्प तयार करण्यास मदत करण्यात आली.

कॉयर बोर्डमार्फत काथ्यापासून उद्योगाबाबत उद्योजकांना मोफत प्रशिक्षण देण्यात येईल. मालवणातील ग्रामीण व शहरी भागांमध्ये प्रत्येकी वीस लाभार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचे जाहीर करण्यात आले. अनुसूचित जाती जमाती हबमध्ये अनुसूचीत जाती जमातीतील उद्योजकांना, तरुणांना उद्योगांमध्ये समाविष्ट करण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजनाचे मार्गदर्शन करण्यात आले. त्याचा फायदा घेण्याचे आवाहन करण्यात आले. जे प्रशिक्षण घेणार आहेत, त्यांना पन्नास हजार रुपयांची टूलकिट आवश्यक हत्यारे मोफत देण्यात येणार आहेत. विविध योजनांचा माहिती देऊन आवश्यक ती माहिती पत्रे देण्यात आली. सूत्रसंचालन मौनीनाथ महाराज ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कुशे यांनी केले

प्रतिक्रिया व्यक्त करा