You are currently viewing कणकवली शहरातील उड्डाण पूलाखालील स्टॉल हटाव हटविले…!

कणकवली शहरातील उड्डाण पूलाखालील स्टॉल हटाव हटविले…!

हायवे प्राधिकरणची कारवाई; मोठा पोलीस बंदोबस्त…!

कणकवली

कणकवली शहरातील उड्डाणपुलाखाली उभारलेल्या अनधिकृत स्टॉल विरोधात महामार्ग प्राधिकरण जोरदार मोहीम हाती घेत कणकवली नरडवे रोड ते आप्पासाहेब पटवर्धन चौक येथील स्टॉल हटविण्यास भाग पडले आहेत. काही स्टॉल पोलीस बंदोबस्तात महामार्ग प्राधिकरणाने जेसीबीच्या साह्याने हटविले तर अनेकांनी स्वतः हुन स्टॉल बाजूला करत सहकार्याची भूमिका घेतली. कणकवली शहरात प्राधिकरणाने केलेल्या या कारवाईमुळे अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून या स्टॉल धारकांचे पुनर्वसन कसे करणार अशी समस्या निर्माण झाली आहे. स्टॉल धारकांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे यांचे लक्ष वेधले आहे

मुंबई -गोवा महामार्ग हायवे प्राधिकरणाने कणकवली शहरातील अनधिकृत स्टॉल हटविण्याची मोहीम सकाळी सुरू केली.यावेळी मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता. अनधिकृत स्टॉलधारकांना हायवे प्राधिकरणाने यापूर्वीच नोटीसा दिल्या होत्या. ही कारवाई सकाळपासून नरडवे नाका येथील करण्यात आली.कणकवली शहरातील उड्डाण पुलाखालील अनधिकृत स्टॉल जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यास सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवसामध्ये शहरातील अनधिकृत स्टॉल हटवले जातील दुसऱ्या दिवशी अनधिकृत पार्किंगसाठी लावण्यात आलेली वाहने सुद्धा हटवली जाणार आहेत अशी माहिती महामार्ग प्राधिकरण
उपअभियंता यांनी दिली आहे .

काही स्टॉलधारकानी स्टॉल हटवण्यापासून थोडासा अवधी आम्हाला द्या,असे यावेळी सांगितले. जर तुम्ही आपले स्टॉल हटवले नाही तर आम्ही जेसीबीच्या साह्याने स्टॉल हटवू असे महामार्ग प्राधिकरण यापूर्वीच नोटीसद्वारे सांगितले होते. काही स्टॉल धारकांना दोन महिन्यापूर्वी नोटीस दिल्या होत्या.ही कारवाई उप अभियंता महेश खटी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. यावेळी कनिष्ठ अभियंता एम. आर. साळुंखे,रुपेश कांबळे पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ,बापू खरात यांच्या सह चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

स्टॉल हटाव मोहीम सुरू राहणार

कणकवली शहरात उड्डाण पुलाखाली नरडवे नाका ते एस.एम.हायस्कूल पर्यंत अनाधिकृतपणे स्टॉल उभारणी करण्यात आली होती.महामार्ग प्राधिकरणच्यावतीने स्टॉल हटाव मोहिम राबवण्यात आलेली आहे .आमचा कुणालाही त्रास देण्याचा कोणताही हेतू नाही,त्यामुळे आम्हाला स्टॉलधारक सहकार्य करत आहेत. मात्र ही स्टॉल हटाव मोहीम सातत्यपूर्ण राहील, भविष्यात कणकवली शहरात महामार्ग प्राधिकरणच्या जागेत अनाधिकृत बांधकाम झालेली असतील, तेही हटविण्यात येतील अशी माहिती महामार्ग प्राधिकरण उपअभियंता महेश खटी यांची माहिती यांनी दिली.

चोख बंदोबस्त

उड्डाण पुलाखालील स्टॉल हटविले जात असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी महामार्ग प्राधिकरणाने घेतली होती त्यामुळे सकाळपासूनच कणकवली शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दंगल नियंत्रण पथकाबरोबरच राज्य राखीव पोलीस बल कार्यरत होते सकाळी नरडवे रोड येथे मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी स्टॉल धारकांनी सहकार्याची भूमिका घेतली. काही स्टॉल जेसीबीच्या साह्याने हटविण्यात आले.

स्वतःहून स्टॉल हटविले

कणकवली शहरात सकाळच्या सुमारास ही स्टॉल हटाव मोहीम राबविण्यात आली. यावेळी अनेक स्टॉल धारकानी स्वतःहून आपले स्टॉल पुलाखालून बाहेर आणत मोहिमेला सहकार्य केले. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणला स्टॉल हटविण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली नाही.

रोजी रोटीचा प्रश्न

कणकवली शहरातील उड्डाणपुलाखाली स्टॉल उभारत भाजी त्याचप्रमाणे खाद्यपदार्थ, फळे, फुले ,कांदे बटाटे, कपडे यासारख्या वस्तू विक्रीचा व्यवसाय करत होते . अनेकानी रोजी रोटीच्या प्रश्नासाठी मोठी गुंतवणूक या स्टॉलमध्ये केली होती. कणकवली शहरात भाजी मार्केट नसल्याने अनेकांना या उड्डाणपुलाखालील जागेचा आसरा होता. महामार्ग साकारत असताना अनेक जण विस्थापित झाले होते. त्यामुळे उड्डाणपूल उभारल्यानंतर या पुलाखाली स्टॉल थाटत अनेकानी आपले व्यवसाय सुरू केले होते. मात्र महामार्ग प्राधिकरणाने उड्डाण पुलाखालील जागा रिकामी करण्याच्या नोटीसा बजावल्यानंतर या विक्रेत्यांचे धाबे दणाणले होते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची घेतली भेट

उड्डाणपूला खालील स्टॉल हटविण्याच्या मोहिमेप्रसंगी कणकवली शहरातील स्टॉल धारकांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे यांची त्यांच्या कणकवली येथील निवासस्थानी भेट घेत आपल्या समस्या मांडल्या. यावेळी ना.नारायण राणे यांनी याबाबत महामार्ग प्राधिकरण, नगरपंचायत, स्टॉलधारक यांच्यासमवेत बैठक घेत निर्णय घेतला जाईल अशी भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे स्टॉल धारकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

उड्डाणपूला खालील भाग झाला मोकळा

महामार्ग प्राधिकरणाने कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालील स्टॉल हटविण्यास भाग पाडल्यानंतर अनेकानी स्वतःहून आपले स्टॉल बाजूला केले. त्यामुळे उड्डाणपूलाने मोकळा श्वास घेतला असल्याचे दिसून येत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × four =