You are currently viewing कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडी आयोजित “तुतारी कवी संमेलन” थाटात पार पडले

कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडी आयोजित “तुतारी कवी संमेलन” थाटात पार पडले

“मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाच पाहिजे” :- सुधाताई कामत जि.प. शाळा नं. २ च्या चिमुकल्यांच्या घोषणांनी दुमदुमली नगरी

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने सावंतवाडीच्या सुंदर नगरीत सोमवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजी सायं.६.०० ते ९.०० या वेळेत मोती तलावाच्या काठी कवीवर्य केशवसुत कट्ट्यावर तुतारी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या तुतारी कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कुडाळचे ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार श्री.अनंत वैद्य, प्रमुख पाहुणे कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री.मंगेश मसके, स्वागताध्यक्ष मा. सावंतवाडी तालुकाध्यक्ष कोमसाप प्रा.श्री. सुभाष गोवेकर, कोमसाप केंद्रीय कार्यकारणी सदस्या साहित्यिका उषा परब, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जी.ए. बुवा, जिल्हा सचिव कवी विठ्ठल कदम, मराठी अध्यापक संघाचे भरत गावडे, कवी रुजारियो पिंटो, कुडाळ कोमसाप तालुका अध्यक्षा वृंदा कांबळी आदी मान्यवर उपस्थित होते. तुतारी कवी संमेलनाचे अध्यक्ष श्री.अनंत वैद्य यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सावंतवाडी कोकण मराठी साहित्य परिषद पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
तत्पूर्वी सायंकाळी ४.३० वाजता सावंतवाडीच्या गांधी चौक येथे सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद शाळा नंबर २ च्या विद्यार्थ्यांनी “जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा” या महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. गौरवशाली महाराष्ट्र गीत गायनानंतर सुधाताई कामत जिल्हा परिषद शाळा नंबर २ च्या मुलांसह कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडीचे पदाधिकारी व सदस्य यांनी ग्रंथ दिंडी काढली. गांधी चौक पासून बाजारपेठ मार्गे तलावाच्या काठावरून ग्रंथदिंडी केशवसुत कट्ट्यावर आली. यावेळी शाळेतल्या चिमुकल्या मुलांच्या “मराठी भाषेचा विजय असो” …”राज्य माझे महाराष्ट्र राज्य”… “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाच पाहिजे”… “दुकानांवरील पाट्या मराठी लागल्याच पाहिजेत” अशा प्रकारच्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला. मराठी भाषेवरील या चिमुकल्या मुलांचं प्रेम पाहता मराठी भाषेच्या नावाने गळा काढणाऱ्या लोकांनी या छोट्या छोट्या मुलांकडून नक्कीच प्रेरणा घेतली पाहिजे. या ग्रंथ दिंडीसाठी सुधाताई कामत जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक, शिक्षिकवर्ग, पालक तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदकुमार (नंदू) गावडे, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
तुतारी काव्य संमेलनाच्या पूर्वार्धात कोकण मराठी साहित्य परिषदेने शिवजयंती निमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व बक्षिसे वितरित करण्यात आली. ही निबंध स्पर्धा पत्रकार अमोल टेंबकर यांनी मातोश्रींच्या स्मरणार्थ प्रायोजित केली होती. सावंतवाडीच्या कविवर्य केशवसुत कट्ट्यावर केशवसुतांच्या “तुतारी” कवितेची आठवण म्हणून बसविलेल्या तुतारीच्या सानिध्यात संपूर्ण मोकळ्या वातावरणात पहिल्यांदाच अशा प्रकारचे कवी संमेलन कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेने आयोजित केले होते. या कवी संमेलनात जिल्हाभरातील अनेक कवी कवयित्रीनी सहभाग घेतला होता, आणि मोठ्या प्रमाणावर रसिक श्रोत्यांची गर्दी पहायला मिळाली. मालवणचे कवी रुजारियो पिंटो यांच्या “शालग्या” या मालवणी कवितेने तुतारी कविसंमेलनाची सुरुवात करण्यात आली. जिल्हाभरातून कवी संमेलनासाठी उपस्थित असलेल्या कवी कवयित्रींनी बहारदार अशा कविता सादर करून काव्य संमेलनात रंगत आणली. तुतारी कवी संमेलनात मुक्तछंदापासून मालवणी… वृत्तबद्ध कवितेपर्यंत विविध प्रकारच्या कविता ऐकावयास मिळाल्या. “अआइईची कास सोडुनी एबीसीडी लिहिली… मायमराठीच्या पायाची भरणी कच्ची झाली” या कवितेतून कवी दीपक पटेकर यांनी मराठीची व्यथा मांडली. ॲड.नकुल पार्सेकर यांनी “कविता तारण”.. रुपेश पाटील यांनी खांदावर वेगवेगळ्या पक्षांचा झेंडा घेऊन फिरणाऱ्या तरुणाची होणारी अवस्था… मरणानंतर मातेला मिळणारे सरकारचे लाख रुपये काय कामाचे असे विदारक चित्र दर्शविणारी “लाख मोलाचा मुलगा”, सौ.आदिती मसुरकर कुडाळ यांची बालकविता, विट्ठल कदम, कल्पना बांदेकर, सौ.मंगल नाईक जोशी, सौ.ऋतुजा सावंत भोसले, सौ.प्रज्ञा मातोंडकर, सौ.उषा परब, रवींद्र ओगले, सोमा राऊळ आसोली, रा. भा. खानोलकर, पिंगुळी, वाय पी नाईक, मुकुंद पिळणकर, आयुर्वेदिक कॉलेजचे विद्यार्थी जयराज मरकड, तारामती पदंपल्ले, वैभव रांजवन, यांच्या सामाजिक विषयांवरच्या कविता अनेकांच्या मनाला भावल्या. त्याचप्रमाणे कुडाळ येथून आलेल्या डॉ.मेधा फणसळकर, स्नेहल फणसळकर, सुरेश पवार, वालावलकर, संदेश धुरी, सुधीर धुमे, प्रवीण ठाकूर, यशोधन चव्हाण, रामदास पारकर आदींनी बहारदार काव्यरचना सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्यकारणी सदस्या सौ.मेघना राऊळ यांनी तर तुतारी काव्य संमेलनाचे सूत्रसंचालन कवी श्री.विठ्ठल कदम यांनी केले. प्रास्ताविक सावंतवाडी तालुकाध्यक्ष पत्रकार श्री.संतोष सावंत, स्वागत प्राध्यापक श्री.सुभाष गोवेकर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.अनंत वैद्य यांनी आपल्या छोटेखानी मनोगतात मराठी भाषेला इंग्रजी भाषेपेक्षा जास्त जर कोणाची भीती असेल तर ती म्हणजे हिंदी भाषेची असे सांगतानाच आपण मराठी असूनही बाहेर गेल्यानंतर बऱ्याचदा सहजपणे मराठी ऐवजी हिंदी बोलतो याची काही उदाहरणे देखील दिली. काव्यसंमेलनाचे प्रमुख पाहुणे कोकण मराठी साहित्य परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री.मंगेश मसके यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देत कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखा अत्यंत उत्तम प्रकारे साहित्य सेवा करत असल्याचा दाखला दिला. केंद्रीय कार्यकारणी सदस्या उषा परब यांनी देखील आपल्या मनोगतात तुतारी कवी संमेलनाला शुभेच्छा दिल्या. कवी संमेलनाचे आभार प्रदर्शन कवी दीपक पटेकर यांनी केले.
या काव्य संमेलनाला सावंतवाडी सह जिल्हाभरातील अनेक रसिक श्रोते, साहित्यिक उपस्थित होते. त्यात डॉ. घारपुरे, श्री.प्रभू, मा.नगरसेवक संजय पेडणेकर, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, नंदकुमार गावडे, कोमसाप माजी जिल्हाध्यक्ष ॲड.अरुण पणदुरकर, कोमसाप सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष पत्रकार अभिमन्यू लोंढे, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, सहसचिव राजू तावडे, सदस्य विनायक गावस, धोंडी मसूरकर, आदिती सामंत, श्री कासले, रत्नाकर कोळंबकर, कोमसाप सावंतवाडी, कुडाळ, मालवण, आदी शाखांचे सदस्य, पदाधिकारी, प्रिंट मीडिया आणि सोशल मीडियाचे पत्रकार बंधू उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा