You are currently viewing सीएसएमटी ते एनसीपीए दरम्यान गारेगार डबलडेकर प्रवासाला उद्यापासून प्रारंभ

सीएसएमटी ते एनसीपीए दरम्यान गारेगार डबलडेकर प्रवासाला उद्यापासून प्रारंभ

*पाच किलोमीटरसाठी फक्त ६ रुपये तिकीट*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

पर्यावरणपूरक आणि सुरुवातीच्या पाच किलोमीटरसाठी फक्त ६ रुपये तिकीटात गारेगार प्रवास आता वातानुकूलित इलेक्ट्रिक डबलडेकर बसने करता येणार आहे. देशातील पहिली इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस मंगळवारपासून प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर धावणार असून सीएसएमटी ते एनसीपीए दरम्यान धावेल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली. वातानुकूलित इलेक्ट्रिक बस सुरवातीच्या पाच किलोमीटरसाठी फक्त सहा रुपये तिकीट आकारले जाणार आहे.

डबलडेकर बस म्हणजे मुंबईची शान, परंतु वयोमर्यादा संपुष्टात येत असल्याने बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील डबलडेकर बसेस हद्दपार होत आहेत. सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ४५ डबलडेकर बसेस असून त्याही लवकरच भंगारात काढण्यात येणार आहेत. बेस्ट उपक्रमाने भाडेतत्वावरील वातानुकूलित इलेक्ट्रिक ९०० डबलडेकर बसेस घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून ही प्रक्रिया सुरू असून शनिवार १९ फेब्रुवारी रोजी पहिली बातानुकूलित इलेक्ट्रिक डबलडेकर बस बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाली. आता आरटीओ विभागाचे क्लिअरन्स मिळाले आहे त्यामळे मंगळवारपासून दक्षिण मुंबईतील रस्त्यांवर मुंबईची लालपरी धावताना दिसेल.

गेल्या ऑगस्ट महिन्यातच इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बसचे उपपाटन झाले होते. परंतु पुण्यातील ऑटोमोटिव रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाकडून फिटनेस सर्टिफिकेट मिळण्यास विलंब झाला. स्विच कंपनीने ही बस तयार केली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत आणखी ५ इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बसेस येणार आहेत, असे लोकेश चंद्र यांनी सांगितले.

बसची ऑपरेशनल क्षमता १८० किमी आहे. ४५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये बस १०० किमीपर्यंत धावू शकते. तर संपूर्ण चार्जसाठी ८० मिनिटे लागतात. या बसची बॉडी अॅल्युमिनिअमपासून बनलेली आहे. या एका बसची किंमत जवळपास २ कोटी रुपये आहे. यातून जवळपास ९० प्रवासी प्रवास करू शकतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा