You are currently viewing देवगड येथील राष्ट्रीय लोकअदालतीत ३५५ प्रकरणे निकाली…

देवगड येथील राष्ट्रीय लोकअदालतीत ३५५ प्रकरणे निकाली…

देवगड

येथील न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत दिवाणी, फौजदारी खटले तसेच वादपूर्व प्रकरणे अशा १८४२ प्रकरणांपैकी एकूण ३५५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून १ कोटी १० लाख ८३ हजार ५४८ रूपये इतकी वसुली झाली. या लोकअदालतीचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश तथा देवगड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एस. बी. वाळके यांच्या हस्ते करण्यात आले.

तालुका विधी सेवा समिती देवगड व तालुका बार असोसिएशन- देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवगड तालुका वकिल संघटनेचे अध्यक्ष अँड. देवानंद गोरे, ज्येष्ठ विधीज्ज्ञ अविनाश माणगावकर, अँड. प्रकाश बोडस, अँड. लक्ष्मीकांत नाथगोसावी, अँड. इंद्रनील ठाकुर, ॲड. कौस्तुभ मराठे, अँड. प्रसाद करंदीकर, अँड. अभिषेक गोगटे, अँड. आशिष लोके, अँड. आरती खाडीलकर, अँड. मैथिली खोबरेकर, अँड. कालेकर, अँड. जाधव, अँड. देवगडकर, अँड. साटम, अँड. सिद्धेश माणगावकर, अँड. सांगळे यांच्यासह पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नीलेश जगताप व दिवाणी न्यायालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

या लोकअदालतीमध्ये दिवाणी व फौजदारीकडील एकूण २८९ दावे ठेवण्यात आले होते. त्यातील ५४ खटले निकाली काढण्यात आले. यातून २६ लाख ४४ हजार ९०१ रूपये इतकी वसुली झाली. तर बँक, दूरसंचार विभाग, ग्रामपंचायत विभाग, नगरपंचायत, महावितरण यातील १५५३ इतकी वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील ३०१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून एकूण ८४ लाख ३८ हजार ६४७ रूपये इतकी वसुली झाली. पॅनेल सदस्य म्हणून अॅड. अविनाश माणगावकर यांनी काम पाहिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा