You are currently viewing ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, वर्धा विषयी लेखक कवी विजय जोशी (विजो) यांचे मनोगत

९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, वर्धा विषयी लेखक कवी विजय जोशी (विजो) यांचे मनोगत

*३ ते ५ फेब्रुवारी २०२३ रोजी वर्धा येथे मुख्यमंत्री आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले संमेलन*

 

◼️अ.भा.मराठी साहित्य संमेलन, वर्धा ३, ४, ५ फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न झाले. आणि दरवर्षीप्रमाणे या संमेलनात मी प्रत्यक्ष उपस्थित राहून तीनही दिवस आनंद घेतला.

कवीकट्टा, गझलकट्टा, बाल साहित्य कट्टा, विविध विषयांवरील परिसंवाद, निमत्रितांची कवीसंमेलने, विविध प्रकाशकांच्या पुस्तकांची प्रदर्शन व विक्रीची दालने… असे अनेक उपक्रम, विभाग या संमेलनात नियोजित केले होते. विविध खाद्यपदार्थांचीही चंगळ होती. अनेकांच्या भेटीगाठी झाल्या. तीन दिवस साहित्यिक वातावरणात साहित्य जत्रेचा आनंद घेऊन परत आलो.

 

# काही ठळक वैशिष्ट्ये :

– बाल साहित्य कट्टा या वर्षी विशेष लक्षवेधी ठरला. कविता, गझल, अभिवाचन, नाट्य अशा अनेकविध कला बाल साहित्यिकांनी प्रतिभेने साकारल्या. पुढची पिढी घडविण्यासाठी, साहित्याची आवड निर्माण करण्यासाठी स्तुत्य आणि महत्वपूर्ण उपक्रम होता.

– कवीकट्टा आणि गझल कट्टा दोन्हीही कायम गर्दीत होते. निमंत्रितांच्या संमेलनापेक्षा इथल्या अनेक रचना खूपच चांगल्या होत्या. आपापले गटतट बाजूला ठेवून सर्व मान्यवर एकाच मंचावर वावरत होते असं आश्वासक दृश्य पहायला मिळालं. हा सुद्धा शुभ संदेशच.

– विविध विषयांवरचे अनेक परीसंवाद उत्तम माहितीपूर्ण होते. यात अभय बंग, श्याम जोशी, प्रवीण दवणे… अशा मान्यवरांचा विशेष उल्लेख करावा लागेल.

– मराठी दलनात शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रशाळा लाईव्ह अखंड सुरू होती.

– जेवणाची आणि राहण्याची उत्तम सोय त्यांच्या कुवतीनुसार आणि उपलब्ध साधनसामुग्रीनुसार आयोजकांनी छान केली होती.

शेवटी आपण साहित्याचा आनंद घ्यायला तिथे गेलो होतो आणि तो पुरेपुर मिळाला. वर्धा तसं छोटं शहर आहे. त्यामनाने उत्तम सोय केली गेली होती.

– मंत्र्यांची भाऊगर्दी, कट्ट्याची जवळ जवळ बांधणीमुळे आवाजाचा त्रास, मान्यवरांच्या भाषणांसाठी कवीकट्टे, गझलकट्टे काही काळ थांबविले गेले, गडकरींच्या सुरक्षेमुळे प्रत्यक्ष संमेलनाध्यक्षांनाच सभामंडपात प्रवेश नाकारला गेला, स्थानिक रहिवाश्यांचा संमेलनाप्रति निरुत्साह‌, ११ ते ४ वेळातलं तप्त उन… अशा खटकणाऱ्या आणि कमी अधिक प्रमाणात सर्वच संमेलनात दिसणाऱ्या गोष्टीही दिसल्या.

पण फक्त चुका, कमतरता यावरच टीका करण्यापेक्षा आपण नेहमी चांगलं घेत पुढे जावं. आयोजकांच्याही काही मर्यादा असतात याचाही विचार करायला हवा. टीकाकारांना फक्त उणीवा दिसतात, पण वरती उल्लेखिलेल्या चांगल्या बाजूंचीही दखल घ्यायला हवी.

मी प्रत्येक संमेलनात साहित्याचा अभ्यास आणि आनंद घेण्यासाठी जातो. चुका, टीका याकडे दुर्लक्ष करून आपल्याला साहित्याचा निर्भेळ आनंद घेता येतो / घेतला पाहिजे.

अनेकांच्या गाठीभेटी झाल्या. एवढी वर्षे मी मान्यवरांसोबत फोटो काढून घेण्यासाठी धडपडत असे. पण आज माझी ‘विजो’ थोडी फार ओळख निर्माण झाली आणि माझे चाहते माझ्यासोबत फोटो काढून घेत होते. हे माझ्यासाठीही सुखावह होतं.

*काय नव्हतं यापेक्षा काय होतं/काय मिळालं असा सकारात्मक दृष्टीकोन ठेवून पाहिलं तर वर्धा संमेलन सुफल संपूर्ण झालं. असं मला वाटतं…*

 

◼️◼️◼️

@ विजो (विजय जोशी)

डोंबिवली

9892752242

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + seven =