You are currently viewing नदी एक जीवन…

नदी एक जीवन…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*नदी एक जीवन ….*

 

आमच्या गावाला म्हणजे माझ्या माहेरी कापडण्याला

“भात” नावाची नदी आहे.(सध्या ती हरवली आहे, कशी

ते नंतर सांगते). ह्या नदीवर माझ्या वडिलांनी साठ सालाच्या

आधीच केव्हातरी फरशी(पूल) घातली. कारण तिच्या धो धो

प्रवाहातून पोहूनच त्यांना घरी यावे लागले होते. किनाऱ्यावर

तासंतास तिला उतार पडण्याची वाट पहावी लागे. म्हणून मग

त्यांनी छोटासा पूलच बांधून घेतला. म्हणजे बघा फुफाट अशी

वाहणारी ही नदी होती हे मला ही चांगलेच आठवते. मी काकू

बरोबर कधी मधी धुणे धुवायला नदीवर जात असे व काठा

काठाने मनसोक्त डुंबत असे.मग कपडे वाळवले की आरामात

घरी परतायचे. उन्हाळा सोडला तर नदीला वर्षभर बऱ्यापैकी

पाणी असे. मी गढीवरच्या शाळेत असतांना गढीच्या भिंतीवरून

वाकून आम्ही खालची वाहणारी नदी पाहत घाबरत असू.

एवढ्या उंचीवरून फारच भीतीदायक असे ते दृश्य असे.

पुढे एकदा हायस्कूलच्या दुसऱ्या मजल्यावर आमचा इतिहासाचा तास चालू असतांना नदी पात्राच्या वरच्या बाजु

कडून पाण्याचा प्रचंड लोंढा, तोही पाऊस नसतांना आम्ही

आमच्या डोळ्यांनी पाहिला नि आश्चर्याने थक्क झालो.

“जीप उनी, जीप उनी” वर्गातली मुले ओरडली. नदीच्या उगमा

कडील भागात पाऊस झाल्याने आमच्या गावी पाऊस नसतांनाही नदीला मोठा पूर आला होता.आजही ते दृश्य

तसेच्या तसे मला नजरेसमोर दिसते.

 

 

हे सारे आठवते नि मन विष:ण्ण होते.आपली जीवनाची” नाडी” असणाऱ्या नद्यांची आज ज्या प्रकारे आपण हेळसांड करतो आहोत,पर्यावरणाचा नाश करतो आहोत ते पाहून मानव जातीचे भवितव्य काय?असा मला प्रश्न पडतो. मघाशी मी म्हणाले,

नदी हरवली आहे, होय हो , खरंच हरवली आहे.नदीच्या उगमा

कडे “देवभान्याला” नदीवर छोटेसे धरण झाले नि नदीचा प्रवाह

आटला. नदी कोरडी ठ्ठाक झाली. ह्याच कोरड्या नदीत, जेव्हा

धरण नव्हते तेव्हा आई मला घागर घेऊन पाणी आणायला

पाठवायची. मग मी हाताने एका गोलाकार जागेवरती वरची

वाळू बाजुला सारत छोटासा खड्डा करताच हळूहळू गढूळ पाणी वर येऊ लागे. मग ते गढूळ पाणी हातानेच उपसून दूर

फेकायचे की खालून नित्तळ पाण्याचा झरा वर येई व खड्डा

स्वच्छ पाण्याने भरून जाई. मग पेल्याने ते पाणी मटक्यात

भरायचे व घरी आईकडे द्यायचे अशा २/३ तरी फेऱ्या मला

कराव्या लागत असत.

 

 

म्हणजे पहा उन्हाळ्यात आटल्या तरी आपली तहान भागवणाऱ्या या नद्यांची आम्ही काय दुर्दशा केली आहे हो?

प्रातिनिधिक म्हणून मी आमच्या भात नदीचे उदाहरण घेतले

असले तरी थोड्याफार फरकाने सर्वत्र हेच चित्र दिसते आहे.

मंडळी, तुम्हाला आश्चर्य वाटेल आमच्या भात नदीत आता

लोकांनी घरे बांधली आहेत, दुकाने टाकली आहेत. नदीत

आता चक्क बाजार भरतो, याला तुम्ही काय म्हणाल?

माणूस इतका स्वार्थी झाला आहे की, त्याने नदी ही गिळून

टाकली आहे.माझ्या लहानपणी कधीही पाण्याची ददात

नसलेले माझे गाव आता पाणी टंचाईने ग्रस्त आहे. व दुषीत

पाणी पित आहे. निसर्गाची मनमानी व माणसाचा स्वार्थ

पर्यावरणाला रसातळाला नेत आहेत. नद्यांच्या काठाने दुतर्फा

आमराई असलेली नदी आता गावांनी गडप केली आहे.नद्यांच्या

काठाने मानवी संस्कृती वसली, बहरली त्या नद्याच गडप होत

आहेत.परिणामी विहिरीही आटल्या व शेतीला पाण्याचा गंभीर

प्रश्न उभा राहिला. पाण्याअभावी पिके जळून शेतीचे प्रचंड

नुकसान झाले आहे. निसर्ग तर किती लहरी झाला आहे हे

आजकाल आपण चांगलेच अनुभवतो आहोत.अवकाळी काय? गारा काय? विचारू नका! आम्ही पूर्वी आमची कुलदेवता “धनदाई ता. साक्री येथे जात असू तेव्हा मला

आठवते नदीच्या दोन्ही काठाने सुंदर गच्च अशी आमराई

होती न नदीच्या झुळूझुळू वाहणाऱ्या पाण्यात पाय धुवूनच

आम्ही “धनदाईचे” दर्शन घेत असू , पण आता नदीचा

मागमूसही दिसत नाही. मी तिथे ही वेड्यासारखी नदी शोधत

होते.पण मला ती सापडलीच नाही व मन खट्टू झाले.

 

 

धुळ्याला मी शिकत असतांना “पांझरा नदी” झुळू झुळू

वहात असे. पुल असला तरी कधी मधी आम्ही पाण्यातून

मुद्दामच नदी ओलांडून जात असू. आता “पांझरा चे ही चित्र

भयावह आहे. “आमची कापडण्याची भात नदी कित्येक वर्षांनी

फुफाट अशी वाहतांना पाहून मन हरखून गेले पण नदीतील

बाजार व घरांचे काय झाले असेल असा ही प्रश्न मनात आला.

नदी म्हणजे जीवन, जीवनदाईनी, पाणी देऊन जनतेचे पालन

पोषण करणारी माता. काठ सुपिक करून शेतकऱ्यांना सुखावणारी दान देणारी आईच! वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे ती

आपले काम करत आली आहे पण तिच्यात मलमुत्र सांडपाणी

गोठ्यांची गोबरघाण व शहरातील मोठमोठे ड्रेनेज पाईप सर्वत्र

सोडलेले आहेत. हे आपल्याला माहित नाही काय ?तरी आम्ही

डोळ्यांवर कातडे ओढले आहेच ना?

 

 

नर्मदेच्या काठावरती जमदग्नी व रेणुका आले व मानवी संस्कृती निर्माण व्हायला सुरूवात झाली. दोघांनी मिळून

वैदिक काळात माणूस घडवायला सुरूवात केली. अत्यंत

रानटी व जंगली अवस्थेत राहणाऱ्या माणसाला माणूस

बनवण्याचे प्रयत्न सुरू झाले ते रेवा म्हणजेच नर्मदेकाठीच!

पण आजकाल सर्वत्र चित्र दिसतं ते बकालपणाचे. माणूस,

सभ्यता मानवी मुल्ये यांना काही किंमतच राहिली नाहीये!

नर्मदे वरील श्रद्धे पोटी मात्र तिची पवित्रता व परिक्रमा बऱ्यापैकी सांभाळलेली आहे हे सुखावह चित्र आहे. ह्या वर्षी

“पांझरा” ही फुफाट वाहतांना पाहिली व मन सुखावले पण ते

क्षणभरंच! कारण तिची दुर्दशाही डोळ्यांसमोर येतेच ना?

आपल्यावर प्रचंड उपकार करणाऱ्या पंचमहाभूतांचीही माणसाला कदर नाही तिथे माणसाचे काय ?खूप चिंतेचा

विषय आहे हा पण आम्हाला त्याचे कितपत गांभीर्य आहे माहित नाही.आपल्या विनाशाला माणूसच कारणीभूत

ठरणार ह्यात मुळीच शंका नाही .काहीच नद्यांचे उदाहरण

मी घेतले आहे, तुमच्याही डोळ्यांसमोर खूप नद्या आल्या

असतालंच..!मग करू या ना सुरूवात चांगल्या कामांची

आपल्या पासुनच! शुभस्य शिघ्रम् ॥

खूप खूप धन्यवाद..॥

 

आणि हो, ही फक्त माझीच मते आहेत .

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

दि : २४/१/२०२३

वेळ: संध्या.५/३७

प्रतिक्रिया व्यक्त करा