You are currently viewing २७ सप्टेंबरला जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांकडून कर्जमाफीसाठी उपोषणाचा इशारा..

२७ सप्टेंबरला जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांकडून कर्जमाफीसाठी उपोषणाचा इशारा..

सिंधुदुर्गनगरी :

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार शेतकरी यांनी २७ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या निवेदनात महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ति योजनेअन्तर्गत २ लाखावरील कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, तसेच खावटी कर्जदार शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी मिळावी, अश्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार शेतकरी संघटनेच्या वतीने शासन स्तरावर गेले ७ ते ८ महिने वेळोवेळी पाठपुरावा करून तसेच आंदोलन, उपोषण छेडून सुद्धा खावटी कर्जदारांना व २ लाखावरील कर्जदारांना अद्याप पर्यंत न्याय मिळालेला नाही. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेमधील सन २०१५ ते २०१९ मधील दोन लाखावरील कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी. तसेच २०१५ पासून खावटी कर्जदार कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ कर्जमाफी मिळावी. अल्पभूधारक व मध्यम मुदतीची कर्जे कोविड कालखंडात भरता आलेली नाहीत यावरही कर्जमाफी मिळावी. तोक्ते वादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राहिलेली नुकसान भरपाई तात्काळ मिळावी तसेच दरवर्षी खरीप व रब्बी पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावत लागत आहे. तरी याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २७ सप्टेंबर पासून लाक्षणिक उपोषणास बसणार असल्याचा इशारा आंबा काजू बागायतदार शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

यावेळी शंकर घारे, गंगाराम राऊळ, अशोक सावंत, वैभव तांडेल, यशवंत सावंत, गुंडू परब, सुनील घोगळे, भाई धर्णे, विजय भगत, नारायण गावडे, रमाकांत पेडणेकर, सुधीर परब, गोपाळ गावडे, यशवंत तेली, विठ्ठल माळकर, शामसुंदर राय, सुनील तुळसकर, जीजी माळकर, नारायण कुंभार, राधाकृष्ण गोलटकर आदींसह ४० हून अधिक कर्जदार शेतकऱ्यांनी या निवेदनावर सह्या केल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा