You are currently viewing भारताचा न्यूझीलंडवर ८ विकेट्स राखून विजय

भारताचा न्यूझीलंडवर ८ विकेट्स राखून विजय

*भारताचा न्यूझीलंडवर ८ विकेट्स राखून विजय*

*एकदिवसीय मालिकेत २-० वर्चस्व*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसर्‍या सामन्यात भारताने ८ विकेट्स राखून विजय मिळवत मालिका २-० अशी खिशात घातली. विजयासाठीचे १०९ धावांचे माफक आव्हान भारताने २०.१ घटकांत साध्य केले. कर्णधार रोहित शर्मा (५० चेंडूत ५१) आणि शुभमन गिल (५३ चेंडूंत नाबाद ४०) यांनी मोलाचे योगदान दिले, त्यामुळे तब्बल १७९ चेंडू राखून भारताने विजय साकारला. अवघ्या १८ धावांच्या मोबदल्यात तीन विकेट्स घेणाऱ्या मोहम्मद शमीला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी ७२ धावांची सलामी दिली. या दोघांनी चौथ्यांदा अर्धशतकी भागीदारी केली. कर्णधार म्हणून रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण केल्या. रोहित (५० चेंडूंत ५१) पंधराच्या पटकातील दुसऱ्या चेंडूवर शिपलेच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर विराट कोहलीला (९ चेंडूंत ११) मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर लॅथमने यष्टिचीत केले. शुभमन (५३ चेंडूत नाबाद ४०) आणि ईशान किशन (९ चेंडूंत नाबाद ८) यांनी भारताला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडची सुरुवात निराशाजनक झाली. डावाच्या पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर मोहम्मद शमीने सलामवीर फिन अॅलनचा शून्यावर त्रिफळा उडविला. सहाच्या पटकातील तिसर्‍या चेंडूवर मोहम्मद सिराजने हेन्री निकोलसला (२० चेंडूत २) शुभमन गिलच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. सातव्या षटकातील पहिल्या चेंडूवर डॅरेल मिचेलचा (३ चेंडूत १) स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल टिपला.

दहाच्या पटकातील चौथ्या चेंडूवर हार्दिक पंड्याने दबावाखाली आलेल्या व्हान कॉन्वेचा (१६ चेंडूत ७) स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल टिपला. अवध्या १५ धावांत चार फलंदाज गारद झाल्याने कर्णधार टॉम लॅथमला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. अकराव्या षटकातील तिसर्‍या चेंडूवर मग शार्दूल ठाकूरने सावधपणे खेळणाऱ्या लॅथमला एका धावेवर बाद केले.

अवघ्या १०.३ षटकांतच न्यूझीलंडची अवस्था ५ बाद १५ अशी दयनीय झाली. निम्मा संघ गारद झाला. त्यानंतर ग्लेन फिलिप्स आणि मायकेल ब्रेसवेल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी संघाला अर्धशतकी मजल मारून दिली. एकोणिसाव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर शमीने मायकेल ब्रेसवेलला (३० चेंडूंत २२) ईशान किशनच्या हाती सोपविले. मिचेल सँटनर (३९ चेंडूंत २७) ३१ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हार्दिकच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. आक्रमण आणि बचाव यांचा ताळमेळ साधत फलंदाजी करणारा ग्लेन फिलिप्स (५२ चेंडूंत ३६) वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. कुलदीप यादवने त्याचा झेल टिपला. लॉकी फर्ग्युसनचा (९ चेंडूंत १) सुंदरच्या गोलंदाजीवर उडालेला झेल कुलदीप यादवनेच टिपला. ब्लेअर टिकनेरला (७ चेंडूंत २) कुलदीप यादवने पायचीत करून न्यूझीलंडचा डाव संपुष्टात आणला. अवघ्या ३४.३ षटकांत न्यूझीलंडचा खेळ खल्लास झाला. मोहम्मद शमीने १८ धावांच्या मोबदल्यात तीन विकेट्स घेतल्या हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळविल्या. मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादवांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

मोहम्मद शमीला सामनावीर ६-१-१८-३ पुरस्काराने गौरविण्यात आले. मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना २४ जानेवारी रोजी होणार आहे.

*भारताच्या नावावर मैदानांचे अर्धशतक पूर्ण करण्याचा विश्वविक्रम*

वेगवेगळ्या मैदानांवर एकदिवसीय सामने खेळण्याच्या बाबतीत भारताने अर्धशतक पूर्ण केले. जगातील इतर कोणत्याही देशाला हे शक्य झाले नाही. एकदिवसीय सामने खेळले गेलेले रायपूर हे भारतातील ५० वे मैदान ठरले. जगात काही देशांमध्ये क्रिकेट मैदानांची कमतरता दिसून येते. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंड या देशांत क्रिकेट मैदानाची कमतरता असल्याने एकच मैदान फुटबॉल आणि रग्बीसारख्या खेळांसाठी वापरले जाते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × four =