You are currently viewing मालवणात आपदा मित्र प्रशिक्षणांतर्गत तारकर्ली व बंदर जेटी येथे प्रात्यक्षिके

मालवणात आपदा मित्र प्रशिक्षणांतर्गत तारकर्ली व बंदर जेटी येथे प्रात्यक्षिके

मालवण

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात दोनशे जणांना आपदा मित्र प्रशिक्षण देण्यात येत असून आज तारकर्ली येथील स्कुबा डायविंग सेंटर तसेच मालवण बंदर जेटी किनाऱ्यावर प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले.

आपत्ती काळात करावयाच्या उपाययोजना व मदत कार्याबाबत देण्यात येत असलेल्या आपदा मित्र प्रशिक्षणासाठी राज्यातून बहु आपत्ती प्रवण अशा वीस जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्याच्या लोक संख्येनुसार प्रशिक्षणार्थींची संख्या निश्चित करण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोनशे जणांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील एनसीसी विद्यार्थी व विविध रेस्क्यू टीम मधील सदस्य यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी डिसेंबर महिन्यात ९६ जणांना प्रशिक्षण देण्यात आले होते. तर आता १३ ते २४ जानेवारी या कालावधीत १०४ जणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या अंतर्गत आज प्रशिक्षणार्थींना तारकर्ली येथील इसदा स्कुबा डायविंग सेंटर येथे पाण्यातील बचाव कार्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. तर मालवण बंदर जेटी किनाऱ्यावर लाईफ बोट कशी हाताळावी या बाबत माहिती देऊन बोटीद्वारे करण्यात येणारे बचाव कार्याविषयी समुद्राच्या पाण्यात प्रात्यक्षिक घेण्यात आले.

या आपदा मित्र प्रशिक्षणात आपत्तीच्या वेळी दोरी, बांबू व इतर उपलब्ध साधनसामग्रीच्या साहाय्याने बचावकार्य कसे करता येईल याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे, तसेच प्राथमिक उपचार, कृत्रिम श्वासोच्छवास, इतरांना वाचवताना आपलीही काळजी कशी घ्यावी याबाबतही प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये गिर्यारोहण बाबतही प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांनी यावेळी दिली.

या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांच्यासह एनडीआरएफचे डेप्युटी कमांडंट प्रमोद कुमार, टीम कमांडर इन्स्पेक्टर धर्मेंद्र सेवदा, एनडीआरएफ टीम पुणेचे सदस्य, पीएसआय एस. पी. खांदारे, पीएसआय ए. बी. साठे, पीएसआय तांडेल, एएसआय टेकाळे, हेडकॉन्स्टेबल धुरी व कांबळे, मंडळ अधिकारी पीटर लोबो, तलाठी व्ही. एम. राठोड, कोतवाल हरी देऊलकर तसेच सागर सुरक्षा रक्षक, प्रशिक्षणार्थी मुली व मुलगे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + seven =