मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सावंतवाडीतच…..शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओरोस येथे….

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सावंतवाडीतच…..शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओरोस येथे….

आमदार वैभव नाईक यांनी दिला वादाला पूर्णविराम

गेले कित्येक महिने सावंतवाडीत भूमिपूजन झालेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा वाद गाजत होता. कधी हॉस्पिटल वेत्ये येथे, तर कधी नेरूर, कुडाळ असा हॉस्पिटलचा मुलगी दाखवल्यासारखा कार्यक्रम सुरूच होता. दीपक केसरकर पालकमंत्री असताना सावंतवाडीत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर करून घेतले, निधीची तरतूद देखील केली आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या मोकळ्या जागेत हॉस्पिटलचे भूमिपूजन देखील केले होते. नियोजित हॉस्पिटल होणारी जागा राजघराण्याची असल्याने जागेचा मुद्दा महत्वाचा बनला आणि हॉस्पिटल जिल्हा दौऱ्यावर गेले.
काही दिवसांपूर्वी दीपक केसरकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना नियोजित हॉस्पिटल सावंतवाडीतच होणार त्यासाठी शासन आणि राजघराण्याशी जागेच्या संदर्भात योग्य ती बोलणी होतील आणि जागेचा प्रश्न सुटेल असे जाहीर केले होते. राजघराणे देखील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सावंतवाडीतच व्हावे या मताचे आहे. त्यामुळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा वाद शमण्याची चिन्हे दिसत होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी कित्येक वर्षे प्रयत्न सुरू होते आणि अखेरीस शिवसेनेचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसल्यावर महाविकास आघाडी सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय महाविद्यालय मंजूर केले आणि पुढील प्रक्रिया सुरू करण्यास जिल्हा प्रशासनास सांगितले. या सर्व घटनाक्रमांनंतर मीडियाशी बोलताना कुडाळ-मालवण मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सावंतवाडीत आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओरोस येथेच होणार असे जाहीर करून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सावंतवाडी की कुडाळ येथे होणार या उलटसुलट सुरू असलेल्या वादाला पूर्णविराम दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा