You are currently viewing प्रिय तरुणाई
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

प्रिय तरुणाई

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.राधिका भांडारकर लिखित तरुणाईला पत्र*

*प्रिय तरुणाई*,

नमस्कार!
समस्त युवा पिढीस प्रातिनिधिक स्वरूपात, म्हणून प्रिय तरुणाई. या व्यासपीठावरून तुमच्याशी काही संवाद साधण्यापूर्वी मी तुमचे चेहरे न्याहाळत आहे. खूप त्रासलेले, कंटाळलेले, आणि आता काय डोस प्यायला मिळणार या विचाराने वैतागलेलेच दिसत आहेत मला. रिती परंपरा, संस्कृती, आदर्श, इतिहास हे शब्द ऐकून तुमचे कान किटलेले आहेत हे मला कळतंय. तेही साहजिकच आहे. माझ्यासारखे बुजुर्ग तुम्हाला सांगून सांगून काय सांगणार? असेच ना?
*पण होल्ड ऑन —*
मी मात्र अशी एक बुजुर्ग आहे की,” काय हे, आमच्या वेळी नव्हतं बाई असं!” हे न म्हणता तुमच्याशी संवाद साधू इच्छिणारी आहे. “तुमच्यात मलाही घ्या की” अशी विनंती करणार आहे.

एखादा ढग धरतीवर बसून जातो आणि संपतो. मात्र मागे हिरवळ ठेवून जातो. मी ना तो संपलेला ढग आहे आणि तुम्ही वर्तमानातील हिरवळ आहात. मी भूतकाळ आणि तुम्ही वर्तमान काळ आहात. गतकाळातच रमण्यापेक्षा मला वर्तमान काळाबरोबर जोडायला आवडेल. एक साकव बांधायला आवडेल.

साक्षी भावाने जेव्हा मी तुमच्या जीवनाकडे पाहते, तेव्हा मला तुम्ही काळाच्या खूप पुढे गेलेले दिसत आहात. खूप प्रगत आणि विकसित भासता. आज या क्षणी मी शिक्षित असूनही तुमच्या तांत्रिक, यांत्रिक जीवनाकडे पाहताना मला फार निरक्षर असल्यासारखं वाटतं आहे. त्या क्षणी तुम्ही माझे गुरु बनता आणि मी शिष्य होते. हे बदललेलं नातं मला मनापासून आवडतं. आणि जेव्हा मी हे नातं स्वीकारते तेव्हा माझ्या वार्धक्यात तारुण्याचे दवबिंदू झिरपतात आणि मला जगण्याचा आनंद देतात.
*बी पॉझिटिव्ह.*.
*से येस टू लाइफ…* हा नवा मंत्र मला मिळतो.

हो युवकांनो! भाषेचा खूप अभिमान आहे मला. पण तरीही तुमची टपोरी, व्हाट्सअप भाषा मला आवडूनच जाते. *कूल*. *चिल*,*ड्युड*, *ब्रो*,*सिस*.. चुकारपणे मीही हे शब्द हळूच उच्चारूनही बघते बरं का!
परवा संतापलेल्या माझ्या नवऱ्याला मी सहज म्हटलं,
” अरे! चील!” त्या क्षणी त्याचा राग बटन बंद केल्यावर दिवे बंद व्हावेत तसा विझूनच गेला की!

तुमची धावपळ, पळापळ, स्पर्धा, इर्षा,आय अॅम द बेस्ट व्हायची महत्त्वाकांक्षा, इतकच नव्हे तर तुमचे नैराश्य जीवनाविषयीचा पलायनवाद,आत्महत्या,स्वमग्नता हेही मी धडधडत्या काळजांनी बघतेच रे! मनात येतेही
“थांबवा रे यांना, वाचवा रे यांना!” एक झपकीच मारावीशी वाटते मला त्यावेळी तुम्हाला. पण मग थांबते क्षणभर. हा लोंढा आहे. उसळेल, अपटेल, फुटेल पण येईल किनाऱ्यावर. आमच्या वेळचं, तुमच्या वेळचं ही तुलना येथे कामाची नाही. त्यामुळे दरी निर्माण होईल. अंतर वाढेल. त्यापेक्षा मला तुमचा फक्त हात धरायचाय् किंवा तुमच्या पाठीमागून यायचंय.
” जा! पुढे पुढे जा! आमच्यापेक्षा चार पावलं पुढेच राहा! कारण तुम्ही पुढच्या पिढीचे प्रतिनिधी आहात. पण वाटलंच कधी तर पहा की मागे वळून. तुमच्यासाठी माझ्या हातातही एक मिणमिणती पणती आहे. दिलाच तर प्रकाशच देईल ती, हा विश्वास ठेवा. एवढेच.बाकी मस्त जगा. मस्त रहा. जीवनाचा चौफेर अनुभव घ्या.”

तुमचेच,तुमच्यातलेच,

*एक पांढरे पीस*.

*राधिका भांडारकर पुणे.*

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 2 =