You are currently viewing अटल प्रतिष्ठानचे अटल गौरव पुरस्कार जाहीर

अटल प्रतिष्ठानचे अटल गौरव पुरस्कार जाहीर

उमा प्रभू, सुषमा तायशेटे व डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत ८ जाने. रोजी होणार वितरण

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातत्याने गेली एकोणीस वर्षे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या आणि भारतरत्न अटलजींच्या नावे स्थापन झालेल्या अटल प्रतिष्ठान या न्यासाच्या वतीने १९ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दहा महोनोभांवाना “अटल गौरव पुरस्कार २०२३” जाहीर करण्यात आल्याची माहिती अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर व कार्यवाह डॉ. राजशेखर कार्लेकर यांनी दिली.

समाजाच्या विविध घटकांसाठी स्नेहालयाच्या माध्यमातून काम करणारे स्नेहालय अहमदनगरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गिरीश कुलकर्णी – कोकणातील गरीब व गरजू रुग्णांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्या. यासाठी धडपड करणारे डॉ.अमेय देसाई, मुंबई, पुण्यनगरी पुण्यामध्ये दलित, शोषित, दिव्यांग, वंचित घटकांसाठी अहोरात्र झटणारे पुण्याचे ज्ञानेश्वर उर्फ माउली दारवटकर, ईलेक्ट्रॉनिक मिडीयामध्ये जनसामान्यांच्या प्रश्नांना जाहीरपणे वाचा फोडणारे लोकशाही वृत्तवाहिनीचा बुलंद आवाज असणारे मुंबईचे श्री. ऋषी देसाई, साहित्यिक क्षेत्रात आपला विशेष ठसा उमटविणाऱ्या जेष्ठ लेखिका, कवयित्री सौ. उषा परब, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेचा आदर्श वारसा जपणारे दै. सकाळचे सिंधुदुर्ग आवृत्ती प्रमुख श्री. शिवप्रसाद देसाई, अतिशय प्रतिकुल परिस्थितीत संषर्घ करुन जिल्ह्याच्या उद्योग जगतात यशस्वी वाटचाल करणारे यशस्वी उद्योजक राजेंद्र केसरकर, कुडाळ. शिक्षण क्षेत्रातील आव्हाने पेलून बॅ. नाथ पै यांच्या विचारांचा वारसा जोपासणारे शिक्षण महर्षी श्री. उमेश गाळवणकर, आपल्या आदिवासी समाजाला मुख्यप्रवाहात आणून त्याना खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगण्यासाठीचे हक्क मिळवून देणारे श्री. उदय आईर, फार मोठ्या कष्टाने आणि परिस्थितीशी संघर्ष करुन मराठी चित्रपटसृष्टीत अल्पावधीत कोकणचे नाव सातासमुद्रापार करणारे कलाप्रेमी श्री. साईनाथ जळवी अशा दहा महानोभावाना गौरविण्यात येणार असून रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी राजवाडा सावंतवाडी येथे सायंकाळी ४ ते ७ यावेळेत हा गौरव सोहळा संपन्न होणार आहे.

यावेळी अटलच्या राष्ट्रसाधना या स्मरणिकेचे प्रकाशन सिंधुदुर्ग कन्या, नृत्यांगना व वयम् डान्स स्टुडिओ पुणेच्या संचालिका सौ. स्नेहल पार्सेकर हिने संरचित केलेला भरतनाट्यम नृत्याविष्कार तसेच शिशुवाटिकेच्या चिमुकल्यांचाही कार्यक्रम होणार आहे.यावेळी मानव संसाधन विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. उमा सुरेश प्रभू, संयुक्त सचिव ॲटोमिक एनर्जी भारत सरकारच्या सौ. सुषमा तायशेटे, स्नेहालय अहमदनगरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गिरीश कुलकर्णी, सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले, सौ. शुभदादेवी भोंसले राणी सरकार आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा