You are currently viewing युवा शक्तीतून राष्ट्रनिर्माणाचा संकल्प; सावंतवाडीत आज ‘युवा संगम २०२६’

युवा शक्तीतून राष्ट्रनिर्माणाचा संकल्प; सावंतवाडीत आज ‘युवा संगम २०२६’

युवा शक्तीतून राष्ट्रनिर्माणाचा संकल्प; सावंतवाडीत आज ‘युवा संगम २०२६’

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांनी प्रेरित उपक्रम; युवकांना राष्ट्रकार्य, नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकीची दिशा

सावंतवाडी :

“तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूँगा” या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रेरणादायी विचारांतून युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, कर्तव्यबुद्धी आणि सामाजिक बांधिलकी जागविण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सावंतवाडी यांच्या वतीने ‘युवा संगम २०२६’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजता पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सभागृहात, सावंतवाडी येथे होणार आहे.
युवा पिढीने एकत्र येऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण करावी, नवीन मित्र जोडावेत, समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी सकारात्मक विचार मांडावेत तसेच नेतृत्वगुण विकसित करावेत, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
‘युवा संगम’च्या माध्यमातून युवकांना राष्ट्रकार्याची प्रेरणा, राष्ट्रभक्ती, संस्कार, कर्तव्यबुद्धी आणि सामाजिक जबाबदारी याबाबत विचारमंथन करण्याची संधी मिळणार आहे. यावेळी युवकांनी स्वतःचे विचार मांडत समाजासाठी सकारात्मक संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘परिचयातून नवीन मित्र, विचारांच्या देवाणघेवाणीतून नवीन दिशा आणि राष्ट्रकार्याच्या प्रेरणेतून नवे नेतृत्व’ या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमात युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सावंतवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
‘युवा शक्ती • युवा विचार • युवा संकल्प’ या भावनेतून आयोजित या युवा संगमात युवकांनी मित्रांना सोबत घेऊन आवर्जून सहभागी व्हावे, असे आयोजकांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा