You are currently viewing नवसाला पावणारी चौकेतील श्री देवी भराडी माता

नवसाला पावणारी चौकेतील श्री देवी भराडी माता

चौके गावचे ग्रामदैवत श्री स्वयंभू भराडी मातेचा महिमा अगाध आहे. मालवण तालुक्यातील कसाल मालवण मार्गावर चौके गावची देवी भराडी मंदिर आहे. देवीच्या कृपेने गावातील सर्व मंडळी एकोप्याने नांदतात. चौके गावची श्रद्धास्थान श्रीदेवी भराडी आईच्या जत्रोत्सवाला जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील भक्तगण येतात. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या चौके गावामध्ये श्रीदेवी भराडी आई पाषाण रूपाने आहे. या मातेची महती सर्वत्र पसरली आहे. भराडी जत्रोत्सव ही सर्व भक्तांसाठी पर्वणीच असते. या दिवशी चौके पंचक्रोशीत नवचैतन्य पसरते. मोठ्या उत्साहात हा जत्रोत्सव साजरा केला जातो. भराडी मातीचे मंदिर पाहून व भराडी मातीचे दर्शन घेऊन सर्वजण तृप्त होतात.

चौके हे गाव चिरेखाण व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. इथल्या लोकांचा पूर्वापार शेती हा व्यवसाय असला तरी त्याला जोड धंदा म्हणून या गावात चिरेखाण व्यवसायाला मान्यता मिळाली आहे. या चिरेखाण व्यवसायामुळे या भागातील लोकांना रोजगाराची चांगली संधी मिळाली आहे. फार पूर्वी हा गाव आंबेरी गावामध्ये मोडला जायचा. ब्रिटीश काळात या गावात ब्रिटीशांनी उभारलेल्या चौकी मुळे हे गाव चौके म्हणून उदयास आले. सुमारे ४५० घरे असणाऱ्या या गावाची लोकसंख्या १८०० एवढी आहे. या गावात ९ वाड्या असून थळकरवाडी, कुळकरवाडी, वावळ्याचे भरड, मांडखोलवाडी, नारायणवाडी, बावखोलवाडी, गोड्याचीवाडी, सम्यकनगर, भवानीनगर अशा वाड्यांचा समावेश आहे.

या गावचे ग्रामदैवत श्री देवी भराडी माता आहे. या मंदिराचे प्रमुख मानकरी स्थळकर गावडे,कुळकर गावडे,परब असून अन्य बारापाच मानकरी देवस्थानात सामिल असतात. या गावात गावडे वस, परब वस, चाळा, गिरोबा, हनुमान मंदिर, दत्त मंदिर, विठ्ठल मंदिर, रवळनाथ मंदिर अशी देवदेवतांची मंदिरे आहेत. श्री देवी भराडीच्या मंदिरात घटस्थापना, दसरा, तुलसी विवाह, त्रिपुरारी पौर्णिमा, वार्षिक जत्रोत्सव अर्थात दहीकाला, गुढीपाडवा, होळी असे उत्सव साजरे केले जातात. चौके गावची ग्रामदेवता श्री देवी भराडी माता म्हणजे एक स्वयंभू पाषाण असून देवीची छत्रछाया या गावावर सदैव आहे. देवी भराडी माता भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते त्यामुळे ती गावकऱ्यांचे श्रद्धास्थान बनली आहे.

फार वर्षांपूर्वीपासून सांगितल्या जाणाऱ्या आख्यायिकेनुसार गावापासून काहीशा जंगलमय निर्जनस्थळी झाडाझुडपाने व्यापलेल्या अशा भरड भागात या पाषाणरुपी देवीचा उगम झाला. याठिकाणी असलेल्या भल्यामोठ्या करवंदीच्या झाडीमध्ये या पाषाणरूपी देवतेला रोज पान्हा सोडणारी गाय गावकऱ्यांना दिसून आली. चौकशी केली असता याठिकाणी देवता असल्याचे समजले. त्यानंतर या भरडा वरील जागेची साफसफाई करून या देवीला भराडी असे नाव देऊन पूजा अर्चा चालू केली.. भाविकांच्या मनोकामना पूर्ण होत असल्याने या देवीची ख्याती वाढली आहे . घटस्थापनेपासून या देवीच्या मंदिरात सर्व वार्षिक उत्सव मोठ्या थाटमाटात साजरे केले जातात. कार्तिक कृष्ण सप्तमीला परंपरेनुसार श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव साजरा होतो.

श्री देवी भराडी मंदिरात पाषाण स्वरूपात देवी आसनस्थ आहे. हे पाषाण रुजीव असल्याचे गावातील लोक अभिमानाने सांगतात. या पाषाणाची उंची अडीज फूट असून त्याची लांबी चार फूट आहे. वार्षिक जत्रोत्सवाला आणि दसऱ्याला पाषाण रुपी भराडी आपला मोहरा परिधान करून दागदागिन्यांनी नटून थटून भक्तांना दर्शन देते. भराडीचे ते रूप विलोभनिय असेच असते.

या मंदिराचा २०१८ साली जिर्णोद्धार करण्यात आला असून एक देखणे मंदिर म्हणून मंदिराचा नावलौकिक आहे. चौके गावची जत्रा पार पडल्यावर दुसऱ्या दिवशी मंदिरात जागरण होते. तर तिसऱ्या दिवशी पूर्वमर्यादेप्रमाणे चौके गावची भराडी देवी आपल्या भावाला आंबेरी गावचे ग्रामदैवत सकलेश्वर देवाला भेटण्यासाठी माहिरी जाते. यावेळी चौके, आंबेरी गावातील सर्व देवतांच्या देवी भेटीगाटी घेत भाऊ सकलेश्वर देवाची भेट घेऊन एक दिवस माहेरी राहते. यावेळी सकलेश्वर देवाची जत्रा झाल्यावर सकाळी दशमीचे गाडगे फोडून जड अंतकरणाने देवी चौके मुक्कामी निघते. अश्याप्रकारे देवीच्या जत्रौत्सवाची सांगता होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + fourteen =