You are currently viewing लेखिका कवयित्री सौ.राधिका भांडारकर यांनी “संवाद दिवाळी अंक २०२२” वर वाहिलेली स्तुतीसुमने

लेखिका कवयित्री सौ.राधिका भांडारकर यांनी “संवाद दिवाळी अंक २०२२” वर वाहिलेली स्तुतीसुमने

*जागतिक साकव्य विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ.राधिका भांडारकर यांनी “संवाद दिवाळी अंक २०२२” वर वाहिलेली स्तुतीसुमने*

संवाद मीडिया तर्फे प्रकाशित होणार्‍या दिपावली दिवाळी अंकाचे हे दुसरे वर्ष. २०२२ सालचा हा दिवाळी विशेषांक ही सर्वांग सुंदर आहे.

दारी दिव्यांची आरास
अंगणी रांगोळीचे सडे
सुख घेऊन घरोघरी
पाऊल लक्ष्मीचे पडे ..
असे सुंदर प्रकाशमय , पावित्र्यमय सुरुवात करून श्री दीपक पटेकर यांनी त्यांच्या संपादकीयात, या अंकाची सुरेख ओळख करून दिलेली आहे.

या अंकाचे बाह्यरूप तथा अंतरंग ही अतिशय सुरेख आहे. श्री अभय वाटवे यांचे मुखपृष्ठ कलात्मक आहे.संपूर्ण अंकाचा ले आउट अतिशय सुटसुटीत,नेटका आणि देखणा आहे. अंक पाहताक्षणीच उघडावा आणि वाचावा असा मोह होतो. अंकाचे खास आकर्षण म्हणजे निवडक साहित्यिकांचे दर्जेदार साहित्य. संपूर्ण अंक उत्कृष्ट साहित्याने सजलेला आहे.

या अंकात गद्य विभागात ३३ लेख आणि कथा आहेत. आणि काव्यांजलीत २६ काव्यरचना आहेत. त्या संपूर्ण अंकात ठिकठिकाणी वाचायला मिळतात. सर्वच लेख, कथा,कविता निवडक, उत्कृष्ट आणि वाचनीय आहेत. विविध विषय सहजपणे हाताळले गेलेले आहेत.

साहित्य म्हणजे समाजाचा आरसा असतो. याची प्रचिती संवादच्या दिपावली या दिवाळी अंकातून होते.

अबोल वृद्धत्व ही नीला पाटणकर यांची पहिलीच कथा हृदयस्पर्शी आहे. हेमंत सांबरे यांचे वासुदेव बळवंत फडके एक सांजवात ….हा लेख वाचताना पुन्हा एकदा स्वातंत्र्यासाठी प्राणाहुती दिलेल्या शूरांच्या आठवणी जाग्या होतात. सौ. सुमती पवार यांचा,गणेश स्थापने मागील लोकमान्य टिळकांचा संदेश… हा लेख खरोखरच आजचा गणेशोत्सव कुठे चाललाय यावर विचार करायला लावणारा आहे. श्रीनिवास गडकरी यांची सोपे नसते ही कविता फारच आवडली. आणि पटली. देव कल्पना, कातरवेळी तुला विसरणे, छान फुलांचे असे घसरणे, सासरी गेलेल्या मुलीस बंध तोडून इतरांत मिसळणे ,सोपे नसते हे अत्यंत सुरेख शब्दात त्यांनी मांडले आहे. सौ ज्योत्स्ना तानवडे यांनी बिन भिंतीची शाळा या लेखातून सारे प्रवासी घडीचे.. आनंद घ्या आनंद वाटा .हा अत्यंत मौल्यवान असा जगण्याचा संदेश दिला आहे. अरुणा दुदलवार यांच्या सर्वच अलक वाचनीय आहेत. दीपक पटेकर यांचा मनामनातला कृष्ण कन्हैया हा गद्य आणि पद्य मिश्रित रसपूर्ण लेख खूपच सुंदर आहे. भक्ती आणि प्रीतीचा संगम असलेल्या पवित्र प्रेमाचे गमक म्हणजेच राधाकृष्ण प्रीती! खरं आहे. दीपक पटेकर यांनी साहित्य रत्न श्रीकांत दीक्षित— श्रीकांत दादा यांना वाहिलेली श्रद्धांजली वाचून मन हेलावले. गौरी शिरसाट यांची व्रण ही कथा मनाला उद्विग्न करते.. एकतर्फी प्रेमातून घडणारे प्रसंग आजही समाजात आहेतच. माधुरी काकडे यांची मधुदीप काव्यरचनेतील दिवाळी ही बालगीते वाचताना मजा वाटली. निशा दळवी यांची नात्यांची वीण वास्तववादी आहे. कधी घट्ट कधी उसवणारी… मोहन काळे यांच्या इस्कोट कथेतील रूखमा मनात घर करते.
दिपावली या दिवाळी विशेष अंकात माझ्या याला जीवन ऐसे नाव या लेखास स्थान दिल्याबद्दल मी संपादकांची आभारी आहे.

मी जरी निवडक साहित्याविषयीच लिहिले असले तरी संपूर्ण अंक वाचनीय आहे. अगदी दिवाळीच्या फराळासारखा चविष्ट, तिखट —गोड, खमंग, खुसखुशीत. जरूर वाचावा असाच. संवाद मिडियाचे मनःपूर्वक अभिनंदन! आणि त्यांच्या पुढील साहित्य प्रवासासाठी लाख लाख शुभेच्छा!!

राधिका भांडारकर.

प्रतिक्रिया व्यक्त करा