You are currently viewing पाऊस कधीचा पडतो….

पाऊस कधीचा पडतो….

पाऊस हा तसा निसर्गाचा अभिन्न भाग… आणि कोकणातला पाऊस म्हणजे तर स्वतःच एक निसर्ग! पावसाच्या अनेक कविता इथे सहज आकार घेतात…अनेक रंगात अनेक ढंगात खुलतात.

आताही परतीचा म्हणून जो पाऊस पडतो आहे तो केवळ कवितांनाच नव्हे, तर राजकीय काव्यालाही जन्म देत आहे. पावसाने शेतकऱ्याचे उभे पीक आडवे केले आहे. दहा दिवस कोसळणाऱ्या पावसाने अगदी हाताशी आलेले भाताचे पीक पार मातीत मिसळून टाकले. नुकसानभरपाईची पंचयादी, मंत्र्यांचे आदेश, पाठपुरावे, आंदोलनाचे इशारे आणि फोटोसेशन यातून मात्र मागील काही दिवस झोपलेले राजकारण या निमित्ताने तरारून उठले आहे. पंचनाम्याच्या सोपस्कारातुन शेतकऱ्याच्या वाट्याला नेमके काय येणार हा भाग अलाहिदा, पण आज तरी राजकीय काव्याची सुरुवात झाली आहे हे दिसतंय!

यावेळच्या पावसाला केवळ भातशेतीचे नुकसान यापेक्षाही थोडा वेगळा अर्थ आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला आठवत असेल की कोकणातला चाकरमानी कसा हालअपेष्टा आणि उध्वस्त मनाने कसाबसा कोकणात परतला होता. त्याला स्वतःलाच जिथे कळेनासे झाले होते की आपले पुनर्वसन कसे होणार, तिथे सरकारला ते समजावे आणि पेलावे हे तर शक्यच नव्हते. त्याच्या पाठी परतण्याने कोकणातल्या घरात कुठे छुप्या वावटळी, तर कुठे उघड वादळे व्हायची सुरुवात झाली होती. कारण आधीच अपुरी शेती, त्यात खाणाऱ्या हातातोंडाची आबाळ, पर्यायी पर्यटनासारखे उद्योग लॉकडाऊनच्या आधीही डबघाईला आलेले, उद्योगाच्या क्षेत्रात तर आधीच बोंबाबोंब अशा दुष्काळात कोरोना आणि लॉकडाऊन दुष्काळातल्या तेराव्या महिन्यासारखा आला होता. त्यामुळे कदाचित कायमच इथे स्थिरावणाऱ्या चाकरमान्याबद्दल प्रेमापेक्षा भीती आणि काळजीच अधिक होती. दुबळ्या झोळीतही नातेसंबंध सांभाळण्याचे प्रयत्न झाले, नाही असं नाही. या सगळ्या जगण्याच्या केविलवाण्या धडपडीला “आत्मनिर्भर होणे” असाही शब्द असल्याचे त्यानिमित्ताने कळले. या सगळ्यातुनही चार अधिक कोपरे लागवडीखाली आणण्याचे प्रयत्न केले गेले. आशेची लागवडच खरं तर या कोपऱ्यातुन केली गेलेली होती.

या पावसात ती आत्मनिर्भरतेची आशा उभ्या पिकाबरोबर कोसळलेली आहे. खरे दुःख मातीत मिसळलेल्या भाताचे नाहीय, तर मातीमोल झालेल्या या आशेने आहे. पुन्हा ही आशा रुजवण्यासाठी काय करायचं या प्रश्नावर बोलणे सोपे नाहीय हे सर्वांनाच आतून आतून माहीत आहे. राजकीय गदारोळात या डोळ्यातली निराशा, काळजी आणि उद्याची भीती खरेच कोणी वाचू शकेल का, हा अस्वस्थ करणारा प्रश्न या कोसळणाऱ्या पावसात भेसूरपणे उभा आहे.

आताचं समाजमन म्हणजे फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर हेच झाले आहे. त्यावरही ही आतली खोल अस्वस्थता उफाळून येताना दिसते. रायगडचे कवी गणेश भगत कवितेतून ही उध्वस्त भावना व्यक्त करताना म्हणतात…

“शेतकरी राजा तुझं नशीब फुटलं..
कारण इथे तर आभाळच फाटलं…

गहू द्राक्ष कांदा, उध्वस्त झालं भात….
कोट्यवधीचं नुकसान झालं एका पावसात…
हजारो शेतकऱ्यांचं नशीब देशोधडीला लागलं…
कारण इथं तर आभाळच फाटलं…”

‘होय म्हाराजा’ या अशाच एका अस्सल मालवणी ग्रुपवर अमित चाळके या कवीनेही खूप छान शब्दात ही अस्वस्थता व्यक्त केली आहे.

मेल्या पावसा यंदा तुका,झाला तरी काय ?
तूच सांग रे आता, आम्ही खावचा तरी काय?

पाणी तरवो लावीत हुती माझी माय…
तुका तिची अजिबात दया कशी इली नाय ?

व्हयो तेव्हा शापच आमच्यारी पाठ फिरवलं…
संसार आमचे बुडवन आमची शाप जिरवल.

आता असो वतान सोन्याची माती केलं…
इतको कसो रे तू निर्दयी झालं??

आधीच नाट मोडली मेल्या त्या कोरोनाची
देवा सांग ही शिक्षा देतस खयच्या कारणाची?

येयत दिवाळेक चाकरमानी, आये पायलीभर फोव दी..
तेका आता काय सांगा, बाबा यंदा बाजारातनाच घी….??

मेल्या पावसा यंदा तुका, झाला तरी काय ?
तूच सांग रे आता आम्ही खावचा तरी काय?….

आम्ही खावचा तरी काय, हा प्रश्न जिथे जगाच्या पोशिंद्या शेतकऱ्यालाच पडत असेल तिथे इतरांचे काय हाल होणार असतील याचा विचारदेखील हादरवून टाकणारे भविष्य समोर आणेल. कितीही यांत्रिकीकरण झालं तरी मशीन्स फक्त प्रक्रियाच करू शकतं, अन्न तयार नाही करू शकत! तिथे मातीत राबणारे शेतकऱ्याचे हात आणि उम्मीद काय ती जगाला तारू शकते. अमितच्या कवितेवर शिक्षक असलेल्या तातू कुबल यांची प्रतिक्रिया पण तेवढीच बोलकी आहे. ते म्हणतात, ” काल आमच्या शाळेच्या गावात लोकानी झोपलेल्या भाताच्या पिकावर पाणी सोडून दिले आणि आता भुईमूग काढायला घेतला आहे. म्हणतात, गुरुजी निदान हा भुईमूग तरी हाताला लागतोय का पहातो, नाहीतर तोही कुजून जाईल! जरा चार दिवस पोरांना ऑनलाईन शिकवू नका हो, एवढे उपकार करा! अक्षरश: हे ऐकून रडू आले.”

ही आहे खेड्यातली वास्तव स्थिती. ऑनलाइन शिक्षणापेक्षा शेतातले चार दाणे अधिक महत्त्वाचे ठरू लागलेत!

“पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने” अशी ग्रेस-फुल भावना घेऊन शेतकरी जगण्याच्या उमेदीने पुन्हा उभा राहू पाहतोय. राजकारणाच्या पलीकडे जात त्याच्यापाठी सर्वांनी एकदिलाने उभे रहायची गरज आहे. आणि यात काही कोणी त्याच्यावर उपकार करत नाहीय. त्याच्या पाठीशी राहिलात, तरच तुमच्या पोटाची खैर आहे. दुर्दैवाने शेतकऱ्याला आता जर “आत्महत्या’ करण्याची वेळ येणार असेल, तर इथे “आत्मनिर्भर” कधीच कोणीही होऊ शकणार नाही. पाऊस असा कोसळतो…. त्यात शेतकरी कोसळू नये हे पाहणं तुमची आमची सर्वांचीच जबाबदारी आहे! जबाबदारी कसली? गरज आहे ती, गरज!!

अविनाश पराडकर, सिंधुदुर्ग
9422957575

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + sixteen =