वैभववाडीत पावसाचा कहर : नावळेतील शेतकऱ्याची गाय पुरात गेली वाहून….

वैभववाडीत पावसाचा कहर : नावळेतील शेतकऱ्याची गाय पुरात गेली वाहून….

वैभववाडी – उंबर्डे मार्ग पाण्याखाली, वाहतूक काही काळ ठप्प.

वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी तालुक्याला सकाळपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे पुराचे पाणी रस्त्यात आल्याने वैभववाडी – उंबर्डे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तालुक्यातील अनेक पूल, कॉजवे पाण्याखाली गेले. भात शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेती जमीनदोस्त झाली आहे. अतिवृष्टीचा फटका हेत येथील दोन घरांना बसला आहे. तर नावळे येथील एका शेतकऱ्याची गाय पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. करूळ घाट मार्गात ठिकठिकाणी दगड माती रस्त्यावर आल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

वैभववाडी तालुक्यात गुरुवारी सकाळपासून मुसळधार पाऊस झाला. तालुक्यातील सुख व शांति नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. तसेच गावातील नद्या दुथडी भरून वाहत होत्या. तालुक्यातील बहुतांश रस्ते पाण्याखाली गेले होते. वैभववाडी – उंबर्डे मार्गावरील पूल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे चार तास वाहतूक ठप्प झाली होती. तसेच कुसुर पिंपळवाडी नजीक रस्त्यावर पाणी आले होते. वैभववाडी – गगनबावडा मार्गावरील जामदारवाडी नजीकची मोरी गाळाने भरल्याने पाणी रस्त्यावर आले होते. सर्वात जास्त नुकसान तालुक्यात भात शेतीचे झाली आहे. मळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी त्यात पिके आडवी झाल्याने नुकसान झाले आहे. झोडणी केलेले भात गवत बहुतांश शेतकऱ्यांनी मळ्यात ठेवले होते. ते देखील अतिवृष्टीत कुजून गेले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास नुकसानीचा आकडा खूप मोठा वाढण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा