You are currently viewing स्त्रीला संसारात नेमकं काय हवं असतं?
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

स्त्रीला संसारात नेमकं काय हवं असतं?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य… लालित्य नक्षत्रवेल… शब्दांकुर समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम लेख*

*स्त्रीला संसारात नेमकं काय हवं असतं?*

स्त्री…
…म्हणजे जननी विश्वाची…त्यागाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्त्री. जन्म दिल्या आई-बापाला, घराला सोडून अनोळखी असलेल्या घरात, कुटुंबात, परक्या लोकांमध्ये आयुष्य काढणे हे सहज सोपे नसते. आपल्या पूर्वायुष्याची काहीही संबंध नसलेल्या घरात नवी नवरी…सून म्हणून स्त्री माप ओलांडते आणि हळूहळू त्याच घरची होऊन जाते. बालपणापासून ज्यांच्यासोबत वाढलो, खेळलो, बागडलो लहानाचे मोठे झालो ते घर सोडून नव्या घरात कायमचं येणं आणि त्या घरचंच होऊन जाणं हा केवढा मोठा त्याग स्त्री करते केवळ परंपरा आणि रीतीरिवाज म्हणून…!
लग्न होऊन नवीन घरात प्रवेश करणारी स्त्री आश्वासक असते घरातील सर्वांनीच तिला आपलंसं करावं, प्रेम द्यावं, आपलीच मुलगी समजून घरात नांदू द्यावं… बालपणापासून झालेल्या आई वडिलांचे संस्कार आणि तिच्या बौद्धिक क्षमतेनुसार सासरी ती वावरते. शहरात राहणारी अनेक कुटुंब ही “हम दो हमारे दो” या संकल्पनेनुसार राहिलेली असतात तर गाव खेड्यांमध्ये अजूनही एकाच घरात सख्खी, चुलत अशी कुटुंब एकत्रच राहत आहेत, काही एका घरात राहूनही जेवणखाण वेगळं करतात. अशावेळी शहरांतील घरांमध्ये येणारी सून ही कित्येकदा “मी आणि माझा नवरा” हाच विचार घेऊन येते. क्वचित प्रसंगी एखादी एकत्र राहणे आवडणारी असते, सासू सासरे यांना आई वडील मानून राहणे तिला प्रिय वाटते. गाव खेड्यात येणारी मात्र आहे त्यात समाधान मानते किंवा नवऱ्याची नोकरी असेल त्याठिकाणी स्थलांतरित होण्यात धन्यता मानते. एकंदरीत विचार करता बऱ्याचशा स्त्रिया आजकाल शिकलेल्या असल्याने स्वतंत्र विचार घेऊन वावरताना दिसतात.
संसार म्हटला की भांड्याला भांड लागणार, मग थोडंसं चेपलं, ढोंग पोंग आलं म्हणून भांड फेकून थोडंच देणार… नीटनेटकं करून ते वापरतोच.. अगदी तसंच भांडण जरी झालं तरी स्त्री ही नवऱ्याने आपल्याला समजून घ्यावं, आपण परक्या घरात आले, त्यामुळे आपली चूक जरी झाली तर ती पोटात घालावी आणि आपल्यावर निरंतर प्रेम करावं अशीच अपेक्षा करून असते. संसारात तिला नवऱ्याकडून खूप काही अपेक्षा नसतात, कमावती असेल तर अगदीच माफक अपेक्षा म्हणजे नवऱ्याकडून प्रेम आणि विश्वास मिळावा… कारण स्त्री घराबाहेर पडते तेव्हा तिच्यावर नवऱ्याचा असलेला अढळ विश्वास आणि मिळणारं प्रेम हाच तिच्यासाठी बुस्टर डोस असतो. आपल्या रुपापेक्षा नवऱ्याने आपल्या स्वभावावर प्रेम करावं अशीच कित्येकदा स्त्रीची भावना असते. दोघंही कमावती असतात तेव्हा नवऱ्याने देखील घरातील कामात मदत करावी ही माफक इच्छा असते.
नोकरीसाठी घराबाहेर न पडणाऱ्या स्त्रिया मात्र आपल्या घरकामात मग्न असतात. वेगवेगळे पदार्थ करून घालण्याची बऱ्याचदा त्यांना भारी हौस असते. आपण केलेल्या जेवणाची नवऱ्याने स्तुती करावी, मनसोक्त खावं अशी त्यांची इच्छा असते. नवऱ्याकडून केवळ प्रेमाचे चार शब्द, आणि वेळ असेल तेव्हा सुट्टीत, विकेंडला वगैरे नवऱ्याने आपल्याला बाहेर फिरवून आणावं अशीही प्रांजळ इच्छा असते. नेहमीच घरात राहून कंटाळल्याने खूप काही नाही परंतु संसारात सुख मिळावं, मिळून मिसळून रहावं एवढ्या मात्र माफक इच्छा असतातच.
मुलं झाल्यावर मुलांची जबाबदारी एकत्र कुटुंबात आजी आजोबा, काका, काकी आदी सर्वच उचलतात परंतु विभक्त कुटुंबात मात्र आपल्या नवऱ्याने आपल्या सोबत मुलांचीही जबाबदारी उचलावी अशी स्त्रीची मनोमन इच्छा असते. “वृत्ती तेवढ्याच प्रवृत्ती” या म्हणीप्रणाने काही स्त्रिया नवऱ्यांवर जास्त जबाबदारी न टाकता स्वतःच सर्व जबाबदारी घेतात. मोठं झाल्यावर मुलांनी देखील त्यांची जबाबदारी घ्यावी अशी इच्छा बाळगून राहतात.
संसाराचा रथ दोन चाकांवर चालतो, पळतो… एक चाक नवरा तर दुसरे बायको…! त्यामुळे सोबतचं चाक देखील आपल्यासारखेच चालावे एवढीच स्त्रीची इच्छा असते…म्हणजे संसाराला आनंदाची किनार लागून संसार सुखाचा समाधानाचा व्हावा….!

©【दीपी】
दीपक पटेकर, सावंतवाडी

प्रतिक्रिया व्यक्त करा