You are currently viewing वेष्टनातलं प्रेम
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

वेष्टनातलं प्रेम

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अंजली दीक्षित (पंडित) लिखित अप्रतिम लेख*

*वेष्टनातलं प्रेम*

आपल्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर आणि उदात्त अभिव्यक्ती कुठली असेल तर ती आहे प्रेम! हे प्रेम कुणाबद्दलही आणि कशाबद्दलही असू शकतं. फक्त वयात आलेल्या किंवा पौगंडावस्थेतल्या विरुद्ध लिंगी व्यक्तीवरच प्रेम जडते असे नाही. प्रेम फक्त तारुण्यातच करायची गोष्ट आहे असंही नाही. आपण स्वतः लावलेल्या कुंडीतल्या रोपाला एखादे सुगंधाने घमघमणारे फुल आले की त्यावर आपण प्रेम करतोच ना. बाळाच्या मऊ मऊ अंगाचा स्पर्श झाला की आईला पान्हा फुटतो हेही प्रेमच असतं. वाढदिवसाला मोठ्या दादाने किंवा ताईने भेट दिलेले फाउंटन पेन हे सुद्धा प्रेमच आहे. पाळीव प्राण्यांवर केलेली माया हे सुद्धा प्रेमाचंच रूप आहे. कडाक्याच्या थंडीत फुटपाथ वर मुटकुळे करून पडलेल्या अनाथ गरीब मुलाला जेव्हा आपण एखादी शाल पांघरतो तेव्हा ही प्रेमच व्यक्त करत असतो. आज्जीने सुरकुतलेल्या थरथरत्या हाताने चांगल्या मार्काने पास झाली म्हणून नातीला वाटीतनं गुळ शेंगदाण्याचा लाडू आणून देणे ही सुद्धा प्रेमाचीच अभिव्यक्ती आहे. त्याचप्रमाणे एखाद्या प्रियकराने व्हॅलेंटाईनच्या दिवशी आपल्या प्रेयसीला दिलेले लाल गुलाबाचे फूल हे सुद्धा प्रेमच आहे,मित्राने मित्राला मारलेली मिठी हे सुद्धा नितांत सुंदर असे प्रेमच आहे.

आयुष्यात अशी किती म्हणून उदाहरणे देता येतील याला काही अंतच नाही. जिथे जिथे आपण सकारात्मकतेने आणि आपुलकीने दुसऱ्या बद्दलच्या भावना व्यक्त करतो तिथे तिथे प्रेमाचा निखळ सुंदर असा झराच वाहत असतो. आणि या वाहत्या झऱ्याला कुठल्याही महिन्यातच किंवा तारखेतच व्यक्त होण्याचे बंधन हवे असते का? तर नाही; आपण वर्षातले 365 दिवस कुणा न कुणावर तरी प्रेम व्यक्त करतच असतो कारण ती एक अतिशय सुखावह आणि अंत:प्रेरणेने व्यक्त होणारी अभिव्यक्ती आहे.


अनेकांना वाटतं की हे प्रेम काय सांगायची गोष्ट आहे का? पाश्चात्यांचे अंधानुकरण फक्त, याची काय गरज आहे? मला असं वाटतं की व्यक्त होण्याची गरज प्रत्येकाला आहे पण त्यासाठी या महागड्या वस्तू भेट देणे निरर्थक आहे. त्या देण्यामागे जागतिक बाजारपेठेने पद्धतशीरपणे आपल्या तरुण वर्गावर घातलेली मोहिनी आहे. अमुक कंपनीचा ब्रँडेड टेडी बेअर अमुक कंपनीचं चॉकलेट गिफ्ट बॉक्स आणि ब्रॅण्डेड घड्याळे, भेटकार्ड, ब्रँडेड गिफ्ट देण्यासाठी महागडी ज्वेलरी… हे सगळं नियोजनबद्ध पद्धतीने तरुण वर्गाच्या असे काही मनावर कोरले जाते की याशिवाय आपले प्रेम व्यक्त करणे म्हणजे ते प्रेमच नाही…. असा काहीसा समज त्यांचा करून देण्यात येतो. मग जितकी महागडी वस्तू आपण गिफ्ट देऊ तितकं आपलं समाजात वजन वाढणार, लोक आश्चर्याने आणि असूयेने आपल्याकडे बघणार. अर्थातच सगळं जग आपण जिंकलं अशी भावना आपल्यामध्ये निर्माण होणार; मग ती हेलिकॉप्टर मधून केलेली पुष्पवृष्टी असू शकते एखाद्या मोठ्या मैदानावर फुलांनी सजवलेला बदामाचा आकार असू शकतो किंवा आणखी हे फॅन्टसीचं मायाजाल खूप सुंदर मनमोहक पद्धतीनं विणलं गेलंय आणि जातंय. ते कुठल्या माध्यमातून? तर रोज लाखोंच्या संख्येने आपल्या पुढ्यात आदळणाऱ्या टीव्हीवरच्या जाहिराती आहेत, विविध समाज माध्यमांवरचे शॉर्टृस आणि रिल्स आहेत, फिल्मस्टार्सच्या दिखाऊ आयुष्यातल्या रंजक गोष्टींचे केलेले चित्रण आहे, त्यांच्या फिल्म मधल्या वेगवेगळ्या भ्रामक उत्तुंग कल्पना आहेत ..वगैरे. या दिखाऊपणाच्या जाळ्यात फसत चालली आहे आत्ताची पिढी.
ही सगळी लॉबी आहे, जाहिरातींद्वारे लहान थोर आणि तरुण मनाला भुरळ घालून अब्जावधींची लूट हे राजरोसपणे करत आहेत.


याचे अगदी खूप साधे आणि सध्या ट्रेंडिंग मध्ये असलेले एक उदाहरण म्हणजे प्री वेडिंग शूट. आता हा एक पूर्णपणे वेगळा विषय आहे यावरही मी सविस्तरपणे व्यक्त होईनच पण सध्या इतकंच वाटतं की हे प्री-वेडिंग शूट केलेले फोटोज तुमच्या लग्नाच्या किंवा रिसेप्शनच्या वेळी मोठ्या स्क्रीनवर दाखवले जात असतात आणि त्यामध्ये कधीकधी इतक्या ऑकवर्ड पोजेस असतात की बघणारा मान खाली घालतो. कसली आहे ही हौस? प्रश्न इतकाच आहे की तुम्हाला काय दाखवायचं आहे जगाला की तुम्ही अमुक अमुक ठिकाणी फिरायला गेला होतात म्हणजे तुमची ऐपत तितकी आहे, अमुक अमुक ब्रँडचा ड्रेस तुम्ही घालू शकता म्हणजे पुन्हा तुमची ऐपत तुम्हाला दाखवायची आहे आणि तुम्ही प्री-वेडिंग शूट सारख्या महागड्या चैनीच्या गोष्टीवर खर्च करू शकता म्हणजे पुन्हा तुम्हाला तुमची ऐपतच दाखवायची आहे… अहो मग या सगळ्यात प्रेम कुठेतरी मिसिंग नाही वाटत का? ते कसं दाखवणार तुम्ही जगाला? नाही ना दाखवू शकत? म्हणजेच प्रेम ही अनुभवण्याची गोष्ट आहे हे तर लक्षात आलं ना? मग त्याला हे ब्रँडेड महागडे वेष्टन खरोखरच आवश्यक आहे का? त्याशिवाय व्यक्त केलेलं प्रेम हे प्रेम नाही का? बरं असे केल्याने व्यक्त केलेले प्रेम खूप दिवस टिकेल याची काहीही गॅरंटी कुठलीही कंपनी देत नाही. मग हे सगळं काय चालू आहे? फक्त थिल्लर मनोरंजन आणि वेळ घालवण्याचे प्रयत्न… एवढ्यापुरतेच आपले प्रेम मर्यादित ठेवायचे का?
‘प्रेमा’ तुझा रंग इतका उथळ का बरे झाला? आजूबाजूला डोळे उघडून पहा. समाजात काय चालू आहे याचं भान आवश्यक आहे. दारिद्र्याने, बेकारीने आपले हात पाय किती खोलवर पसरलेत याची जाणीव होऊ द्या. मग आम्ही प्रेम व्यक्त करायचं नाही की काय? ताटातली अर्धी भाकरी भुकेल्याला द्यावी की काय? मुळातच तुमच्या ताटात भाकरी नाही. बफे सिस्टीम मध्ये आपण पाहतोच आहोत की जितकं जात नाही तितकं प्लेटमध्ये ओढून घेऊन शेवटी कचराकुंडीत अन्न फेकलं जातं. ती गोष्ट वेगळीच आहे. विरोध या दिखाऊपणाला आहे, या वेष्टनातल्या प्रेमाला आहे. कुठलीच गोष्ट दीर्घकाळ टिकत नाही किंवा लक्षात राहत नाही पण त्या मागची भावना मात्र चिरंतन असते. नफा खोरी करणाऱ्या या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या मायाजालात फसून आपले प्रेम साजरे करणे हे निश्चितच सवंगपणाचे आणि उथळपणाचे द्योतक आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन विचारपूर्वक आपले मार्ग निवडण्यातच खरे शहाणपण आहे. एक साधे देशी आवारात फुलणारे आणि मिळणारे गुलाबाचे फूल दिले तरीही प्रेम व्यक्त होणारच असते आणि ते प्रेम दीर्घकाळ टिकवून ठेवणं फक्त आणि फक्त आपल्यावरच अवलंबून असते. शेवटी किती मोठं गिफ्ट दिलं आणि त्याच्यामागे किती पैसे खर्च केले यावरून त्या प्रेमाची किंमत करणारा जोडीदार आपल्याला हवाय का नको हे ज्याचे त्याने ठरवायचे… पटतंय ना?
तुम्हा सर्वांचे वर्षातले 365 दिवस प्रेमाचे जावोत ही सदिच्छा.

अंजली दीक्षित
७/२/२३
२.००pm

प्रतिक्रिया व्यक्त करा