You are currently viewing कष्टाने, प्रामाणिकपणे व सचोटीने काम केल्याची फलश्रुती – श्री. सतीश गोखले

कष्टाने, प्रामाणिकपणे व सचोटीने काम केल्याची फलश्रुती – श्री. सतीश गोखले

जागतिक फार्मासिस्ट दिन २०२२ सावंतवाडीत उत्साहात साजरा

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण व अत्यंत दुर्गम भागात दिवसरात्र कष्टाने, प्रामाणिकपणे, सचोटीने व निस्वार्थपणे काम केल्याची फलश्रुती म्हणजेच आजचा हा पुरस्कार आहे असे प्रतिपादन श्री. सतीश गोखले यांनी केले. यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजच्या वतीने जागतिक फार्मासिस्ट दिनी गोखले यांचा ‘फार्मासिस्ट ऑफ द इयर’ हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. हा पुरस्कार त्यांनी निस्वार्थ भावनेने जिल्ह्यातील सर्व फर्मासिस्ट बांधवांना समर्पित केला.
यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी व यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ डी. फार्मसी आणि सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फार्मसी दिन २०२२ साजरा करण्यात आला. यावेळी श्री यशवंतराव भोसले एज्यूकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, भोसले नॉलेज सिटीच्या प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, जिल्हा केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष आनंद रासम, तालुका सचिव संतोष राणे, खजिनदार विद्यानंद बांदेकर, बी फार्मसी प्राचार्य डॉ. विजय जगताप, डी. फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे, रजिस्ट्रार प्रसाद महाले व जनसंपर्क अधिकारी नितीन सांडये उपस्थित होते.
३४ वर्षांपासून फार्मसी व्यवसायात मणचे ता. देवगड जि. सिंधुदुर्ग येथे कार्यरत असलेल्या श्री. सतीश गोखले यांना संस्थेचे कार्याध्यक्ष मा. अच्युत सावंतभोसले यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी गोखले कुटुंबीय, मकरंद कशाळीकर, सचिन बागवे, प्रेमानंद देसाई, मंदार काणे, ग्रेगरी डान्टस आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. विजय जगताप यांनी फार्मसीचे महत्त्व व कॉलेजची एकंदर वाटचाल विषद केली. प्रा. सत्यजित साठे यांनी फार्मसिस्ट दिनाचा इतिहास व देशाचे जगाच्या औषध निर्मितीतील स्थान यासंबंधीची माहिती दिली. जिल्हाध्यक्ष मा. आनंद रासम यांनी फार्मासिस्ट हे ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा देताना कशाप्रकारे जोखीम पत्करतात, रात्री-अपरात्री आपली सेवा बजावतात तसेच कोविड-१९ काळामध्ये फार्मासिस्ट आपल्या दारी ही संकल्पना जनतेसाठी किती उपयोगी ठरली याविषयी विचार मांडले व या कठीण प्रसंगी अविरत अखंड सेवा बजावलेल्या फार्मासिस्ट वर्गाचे विशेष कौतुक केले.

जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात भित्तिपत्र प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्त्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, मुखाभिनय स्पर्धा, सर्वेक्षण स्पर्धा, फार्मासिस्टसोबत सेल्फी ई. विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबरीने याचदिवशी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवसाचे औचित्य साधून महाविद्यलयात रोटरी क्लब, सावंतवाडी यांच्या विद्यमाने रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी रोटरी क्लब सावंतवाडी तालुका अध्यक्ष रो. विनया बाड व तालुका सचिव श्री. प्रमोद भागवत ई. मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
कॉलेजच्या ई-मॅगझिन व माहिती पुस्तिकांचे उद्घाटन
विभागप्रमुख प्रा. तुषार रुकारी यांनी महाविद्यालयास भारतीय शिक्षण क्षेत्रातील सर्व्वोच मांनाकनापैकी एक राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद (नॅक) चे मांनाकान मिळाले बद्दल माहिती उपस्थित मान्यवरांना दिली. याचबरोबर महाविद्यालयाच्या कार्याचा वार्षिक अहवाल सादर केला. तसेच कॉलेजच्या फार्मांकुर या वार्षिक विशेषांकांचे आणि फार्माट्विट या वार्षिक बातमी पत्रांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
फार्मासिस्टने प्रामाणिकपणे व सातत्यपूर्ण कार्य करणे आवश्यक
कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष मा. अच्युत सावंतभोसले म्हणाले की, फार्मासिस्ट वर्ग हा सामाजिक आरोग्य व्यवस्थेचा एक महत्वाचा घटक असून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपून प्रामाणिकपणे व सातत्यपूर्ण कार्य करणे आवश्यक आहे. त्यांच्या कार्याची योग्य दखल घेता यावी यासाठीच संस्थेने आठ वर्षांपूर्वी या पुरस्कार वितरणाची सुरुवात केली आहे. आजतागायत हा पुरस्कार अत्यंत योग्य व्यक्तींना मिळाला असून हा पुरस्कार प्रदान करताना संस्थेचा ऊर अभिमानाने भरून आला आहे असे प्रतिपादन केले. अशी बांधिलकी जपल्याने विद्यार्थ्यांना अर्थात भावी फार्मासिस्ट यांना एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. प्रियंका मलबारी, प्रा. स्नेहा मडगावकर, प्रा. स्नेहा सावंत व प्रा. शीतल सामंत यांनी मेहनत घेतली. प्रा. नमिता भोसले यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. ॐकार पेंडसे यांनी आभार मानले.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 3 =