You are currently viewing जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे ज्येष्ठ सदस्य लेखक कवी डॉ.निशिकांत श्रोत्री यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.ज्योती रामोड यांनी लिहिलेला अप्रतिम लेख…

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे ज्येष्ठ सदस्य लेखक कवी डॉ.निशिकांत श्रोत्री यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.ज्योती रामोड यांनी लिहिलेला अप्रतिम लेख…

साहित्य संस्कृतीचा वारसा जपणारे बहुआयामी व्यक्तिमत्व

“लेखकाचे मन हे समुद्रासारखे असते  त्यात किती अनमोल
हिरे-मोती रुपी साहित्य दडलेले असते हे फक्त त्यालाच ठाऊक असते”…

संध्याकाळी आकाशातील चंद्र-तारे जितके मनमोहक असतात तितकेच साहित्यकाराच्या शब्दाची रचना समाजाच्या विचारसरणीला नवी कलाटणी देते. समाजात प्रत्येक व्यक्ती उपजिविकेसाठी कोणता ना कोणता व्यवसाय अथवा नोकरी करतो पण आपल्या छंदातून समाजाचे मनोरंजन आणि दिशा बदलण्याचा प्रयत्न खूप कमी लोक करतात. जीवनात प्रत्येक व्यक्ती आपली साथ सोडून जातो पण शेवटच्या क्षणापर्यंत आपला छंद मात्र आपली साथ देत असतो. आयुष्याच्या शेवटच्या काळात वाटणारा एकटेपणा हा फक्त आपल्या छंद जोपासणेतूनच दूर होऊ शकतो. व्यक्तीने कायम आपल्या विचारातून आणि कृतीतून कसे तरुण राहावे याचे आदर्शवत उदाहरण म्हणजे डॉ. निशिकांत श्रोत्री हे आहेत. व्यवसायाने डॉक्टर असल्यामुळे समाजाच्या सेवेचा वसा तर त्यांनी घेतलेला आहेच पण त्या सोबतच समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मनाचा थांगपत्ता लावण्याचा प्रयत्न आपल्या साहित्यातून केलेला आहे. माणूस मनाने तरुण असला की तो वयाने ही तरुणच राहतो.
निसर्गाच्या प्रत्येक अबोल कृतीतून परोपकाराचे दर्शन व्यक्तीला वेळोवेळी घडत असते. अगदी त्याचबरोबर साहित्यिकांच्या प्रत्येक लेखणीतून व्यक्तीने जीवन जगण्याची कला कशी साकारावी याचे उत्तम दर्शन घडते. असेच सर्वोत्तम, सृजनशील व परिवर्तनीय साहित्य आदरणीय निशिकांत श्रोत्री यांनी निर्माण केलेले आहे. त्यात विशेष रूपाने कादंबरी, कथा, एकांकिका, वैद्यकीय लेख संग्रह, काव्यसंग्रह, ध्वनिफिती यांचा समावेश होतो. निसर्गाचा गुणधर्म म्हणजे मन मोठे ठेवून सर्वांना सर्व काही देणे. अगदी त्याचप्रमाणे यांच्या लेखनातून व्यक्तीच्या अनन्यसाधारण गुणांची गुंफण केलेली आहे. सहकार्य, समता, एकात्मता, प्रेम, भाव, राग, क्रोध, मानसिकता, आदर, सहसंबंध, नाते या सर्वांना एकत्र बांधले आहे. आपल्या लेखनातून त्यांनी व्यक्तीचे समाजातील प्रतिबिंब प्रतिबिंबित केले आहे.
आपण उत्तम डॉक्टर आहात त्यापेक्षा सर्वोत्तम काव्य गुरू आहात. जुन्या काळातील जेष्ठ कवी, कवयित्री यांचा सहवास लाभलेले आपण एक भाग्यवंत आहात . अत्यंत दर्जेदार, सोपी, शब्दलावण्य असलेली आपली प्रत्येक काव्य रचना मनाला वेगळेच समाधान देते. आपण कवितेतील सर्व प्रकार लिहिले आहेत, तरीही भावकाव्यातून आपली उत्तुंग प्रतिभा दिसते व ते काव्य मोठा संदेश देवून जाते. आपण आताच्या काळातील नावाजलेले भावगीतकार आहात. आपण प्रसारित केलेले भावगीतावरील लेख नवीन भावगीत शिकणाऱ्या कवींना उपयुक्त ठरत असून त्यांची भावगीताबद्दलची आवड वाढवीत आहे. भावगीत शिकणाऱ्या सर्व कवींचा पाया मजबूत होत आहे. भावगीत, युगुलगीत काव्य लिहिण्यासाठी प्रत्येक रचनाकाराला प्रोत्साहन मिळत आहे. भावगीत युगलगीत काव्यातील सर्व बारकावे आपल्याकडून शिकून घेवून येणाऱ्या पिढीत उत्कृष्ट कवी निर्माण होतील असा दृढ विश्वास आम्हाला वाटत आहे.
समाजामध्ये भावगीतकार आणि अभिनेता म्हणून स्वतःचे वेगळे अस्तित्व आणि कर्तुत्व तुम्ही निर्माण केले आहे. कादंबरीमध्ये विशेष रूपाने अनिता, निवडुंगाची फुले, स्वप्नातील कळ्यांनो, बाबळीची शीतल छाया, कुंचले घेऊन हाती, कर्मभूमी, उपासना,साडेसाती, संरक्षिता याची रचना केली आहे. कथासंग्रहात ब्रह्मास्त्र, डायग्नोसिस, सुवर्ण पुष्कराज तसेच एकांकिकांमध्ये उपद्व्याप, कैफियत, अनोळखी, पिसाट, सौदामिनी, शांतीवन, हाकनाक, महायोगी यांची रचना केली आहे. वैद्यकीय क्षेत्रात केवळ काम करूनच थांबले नाहीत तर त्यावर आधारित वेगवेगळी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत, त्यात प्रामुख्याने स्त्री आणि आरोग्य कुटुंबनियोजन, सुरक्षित प्रस्तुति, युवाअवस्था म्हणजे काय? अशी मार्गदर्शक ग्रंथ संपदा आपल्या विचारातून साकारलेली आहेत. मानवी मनाचा कल ओळखून विविध काव्याची रचना त्यांनी केलेली आहे. त्यात मनाची पिल्लं, निशिगंध, अर्चना, झुळूक, शब्दांची वादळ हे काव्य संग्रह प्रसिद्ध आहेत. विविध साहित्यावर आधारित ध्वनिफिती त्यांनी निर्माण केल्या आहेत. मुलगी की मुलगा, उषा स्वप्न, नव्या युगाचा वसा, सर्वधर्मपरमेश्वर, भजनांजली यांचा खास समावेश होतो.
अशाप्रकारे लहान वयापासून अत्यंत कष्ट आणि संघर्षातून जीवनाची वाटचाल करत असताना व्यावसायिक आणि कलात्मक दृष्टिकोनातून वैभवाचे शिखर आपल्या दृढनिश्चय आणि संकल्पनेतून डॉ.निशिकांत श्रोत्री यांनी गाठली आहेत. वयाचे 77 वर्ष पूर्ण झालेले असतानाही कामसूवृत्ती इतरांसाठी काही तरी करण्याची धडपड आणि समाजासाठी केलेले कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे. प्रत्येक व्यक्तीने जीवन कसे घडवायला पाहिजे जीवनाला कशाप्रकारे अर्थ दिला पाहिजे, वयानुसार बदलत गेलेली मानसिकता सकारात्मक ठेवून जीवनाचे उद्दिष्ट कसे साध्य केले पाहिजे, याचे उत्तम मार्गदर्शन आणि प्रेरणा  डॉ. निशिकांत श्रोत्री यांच्या जीवन प्रवासातून आपल्या सर्वांना मिळते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी हीच प्रार्थना की त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि उत्तम साहित्यातील कलाकृती त्यांच्या कल्पनाशक्तीच्या दालनातून साकार व्हावी. ज्याद्वारे वाचकांचे मन, मस्तिष्क आणि मनगट यात परिवर्तन घडेल आणि त्यातून उद्याची पिढी अधिक जागृत आणि विकसित निर्माण होईल.
” जीवनात हिरा ओळखण्यापेक्षा
कला ओळखणे खूप महत्त्वाचे आहे
कारण हिरा काही क्षण सुख देईल
पण कला प्रत्येक क्षण सुखाचा घालवेल ”

लेखिका
डॉ.ज्योती रामराव रामोड
इतिहास विभाग
बाबुरावजी घोलप महाविद्यालय
सांगवी,पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + 10 =