You are currently viewing बुलडाणा अर्बनचे श्री.राधेश्यामजी चांडक….

बुलडाणा अर्बनचे श्री.राधेश्यामजी चांडक….

…..नापास होऊन पास झालेला माणूस…!

एखादा मुलगा फारसा शिकत नाही. पुढे महाविद्यालयात गेल्यानंतर तीन-चार विषयात नापास होतो .विशेष म्हणजे अर्थशास्त्रात नापास होतो. तो ज्या विदर्भातील बुलढाण्याच्या जिजामाता महाविद्यालयात शिकला त्याच महाविद्यालयात काही वर्षानंतर अर्थशास्त्र परिषद होते आणि त्या अर्थशास्त्र परिषदेचे उद्घाटन करण्यासाठी त्याला निमंत्रित करण्यात येते .ही गोष्ट आहे बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा श्री राधेश्यामजी उर्फ भाईजी चांडक यांची .मिशन आयएएस हा प्रकल्प सहकार विद्या मंदिर मध्ये राबविण्यात यावा यासाठी मी प्रा.शिवाजी कुचे व उज्वल कुचे काल बुलढाणा येथे जाऊन आलो . भाईजी बरोबरच जिल्हाधिकारी श्री रामामूर्ती IAS जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते IASव खासदार प्रतापराव जाधव यांच्या भेटीचे नियोजन होते. जिल्हाधिकाऱ्यांची बंगल्यावर भेट झाल्यावर मी भाईजींना फोन लावला .ते तेव्हा सहकार विद्या मंदिर या शाळेत होते .खरं म्हणजे त्यांची सहकार विद्या मंदिर ही शाळा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेली आहे .रोज अनेक लोक ही शाळा बघायला येतात .एखादी शाळा बघायला लोक येतात यातच त्या शाळेचं मोठेपण आलं आणि त्या शाळेची निर्मिती करणाऱ्या भाईजीचं अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येते .आम्ही जिल्हाधिकारी बंगल्यावरून भाईंजीकडे निघालो. चिखली रोडवरील त्यांचा बंगला नजरेत भरणारा आहे. भाईजींनी आमचे मनापासून स्वागत केलं .आम्ही देखील मिशन आयएएसचा पूर्ण पुस्तकांचा एक संच देऊन त्यांचा सत्कार केला .त्यांच्या सहवासामध्ये गप्पागोष्टी मध्ये दोन तासांचा वेळ कसा निघून गेला कळलेच नाही .मला आठवतंय .भाईजींना एक दृष्टी आहे. त्या दृष्टीमुळेच त्यांनी माझा मी आयएएस अधिकारी होणारच हा कार्यक्रम पंधरा वर्षांपूर्वी बुलढाण्याच्या गर्दे सभागृहामध्ये प्रचंड उपस्थितीत संपन्न केला होता. एवढ्यावरच वेळेस ते थांबले नाहीत तर बुलढाणा अर्बनच्या प्रत्येक शाखेतून मी आयएएस अधिकारी होणारच हे पुस्तक मिळण्याची त्यांनी व्यवस्थाही केली होती .विशाल नरवाडे आज कलेक्टर झालेले आहेत. त्यांना शिक्षणासाठी मदत करण्यासाठीही बुलढाणा अर्बनचा मोलाचा वाटा आहे. भाईजी सांगत होते .आम्ही ऐकत होतो.चांडक परिवार हा राजस्थानमध्ये जोधपूर जिल्ह्यातील रहिवासी. बुलढाणा जिल्ह्यातील डोंगरखंडाळा या गावात त्यांचे पूर्वज आले. माझ्या घरात सावकारीचा व्यवसाय होता. पण मला पटत नव्हता .माझ्या कुटुंबीयांशी चर्चा करून पुढे मी त्या व्यवसायाला बुलढाणा अर्बनमध्ये परिवर्तित केले .खरं म्हणजे त्यांची कहाणी लिहिण्यासारखी आहे. पण ते म्हणाले मी माझे आत्मचरित्र लिहावे असे मला वाटत नाही.. इतरांनी लिहिले तर मला त्यात काही वाटणार नाही .मीच माझी आत्मस्तुती करावी हे मला पटत नाही .आज बुलढाणा अर्बनने संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्र शिवाय इतरही राज्यात आपली पाळे मुळे रोवलेली आहेत आणि ती खंबीरपणे रुतलेली आहेत हे सर्वात महत्त्वाचे .त्यांनी गावोगावी निर्माण केलेली गोडाऊन हे देखील महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांचा माल त्या गोदामात ठेवून त्या गोदामाची राखण करून आणि त्यावर शेतकऱ्यांना रक्कम उपलब्ध करून देऊन भाईजींनी एका मैलाच्या दगडाचे काम केलेले आहे. सहकार विद्या मंदिर ही एक आदर्श शाळा आहे.ही शाळा त्यांच्या कन्येच्या सौ कोमलताईच्या हवाली केलेली आहे .ते त्यात हस्तक्षेप करीत नाहीत. भाईंचे वेळापत्रकही पाहण्यासारखे आहे. सकाळी लवकर उठणे .सहकार विद्या मंदिरात जाणे. सायकलींग करणे. योगासन करणे. दररोज सकाळी नियमितपणे हास्यक्लबमध्ये जाणे आणि अकरा वाजता कार्यालयात हजर होणे. विशेष म्हणजे भाईजी सांगतात. मी फारसा शिकलेला नाही. अगदी मला मोबाईल मधील नंबर देखील सेव करता येत नाही. हे सर्व माझे सहकारी करतात. परंतु येथील लोकांचा शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मी कार्य करीत होतो व करीत आहे आणि करणार आहे. भाईजींनी डोंगर खंडाळ्याला म्हणजे आपल्या जन्म गावाला स्पर्धा परीक्षेच्या ग्रंथालय आणि अभ्यासिका सुरू केली. मुलांसाठी स्पर्धा परीक्षांची पुस्तके आणून दिली. बुलढाणा अर्बनची अभ्यासिका त्यांच्या नावलौकिकाला साजेशीच आहे. मी जेव्हा त्यांना मिशन आयएएस या उपक्रमाची माहिती दिली. त्यांना ती होतीच. त्यांनी पटकन मिशन आय.एएस. त्यांच्या अधिकार क्षेत्रात असणाऱ्या सर्व शाळांमध्ये राबवण्यासाठी परिपत्रक काढण्याचे लगेच आश्वासन दिले .ते म्हणाले मी उद्या तसे परिपत्रक काढतो .भाईजी आज 72 वर्षाचे आहेत. परंतु त्यांच्याकडे पाहिल्यानंतर तसे वाटत नाही याचे कारण ते नियमित करीत असलेल्या व्यायाम योगासन हास्य क्लब मध्ये नियमितपणे जाऊन हास्यकल्लोळ करणे आणि नियमितपणे पर्यटन करणे. ते मला सांगत होते की ते पंधरा दिवस बुलढाणाला असतात आणि पंधरा दिवस वेगळ्या ठिकाणी कामानिमित्त पर्यटनानिमित्त फिरत असतात .त्यांच्या परदेश वाऱ्याही अनेक झालेल्या आहेत. फारसे शिक्षण न घेतलेले भाईजी आज संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या चांगुलपणामुळे चर्चेचा विषय ठरलेले आहेत ,अनेक ठिकाणी त्यांना निमंत्रित करण्यात येते.. व्याख्यानासाठी उद्घाटनासाठी ते आठवणीने त्या ठिकाणी जातात .आपली कहाणी सांगतात .परवाचे उदाहरण ते सांगत होते की त्यांना पुण्याच्या एका संस्थेने निमंत्रित केले होते .पुण्यातील प्रतिष्ठित व्यक्ती त्या कार्यक्रमाला होते. त्यांना एक तास बोलण्याची वेळ देण्यात आली होती. पुण्याचे लोक तशी वेळ पाळण्यात तरबेजच आहेत आणि पुणेकरांसमोर खरं म्हणजे भाईजी म्हणजे कमी शिकलेला माणूस. पण त्यांचे कर्तृत्व इतके महान आहे की एक तासाचा कार्यक्रम साडेतीन तास झाले तरी संपत नव्हता. पुणेकर भाईजींना म्हणत होते अजून सांगा अजून सांगा आणि भाईजी सांगत होते .ते साडेतीन तास झाल्यानंतर मी थांबलो आणि सभागृहात टाळ्यांचा प्रचंड गजर झाला. सर्वांनी टाळ्याच्या रूपाने माझ्या कार्याची पावती मला दिली .खरं म्हणजे माणसं मोठी झाली की इथे एक काम करतात .आपल्या गावाला किंवा आपल्या जिल्ह्याला सोडतात. मग ते पुण्याला मुंबईला दिल्लीला मोठ्या शहरामध्ये स्थायिक होतात. परंतु या माणसाने घार हिंडते आकाशी लक्ष तिचे पिलापाशी या न्यायाने आपल्या बुलढाणा जिल्ह्यावर लोभ कायम ठेवला आहे. ते ज्या गावात जन्मले त्या डोंगर खंडाळ्यावरही त्यांचं सातत्याने लक्ष असते. खरं म्हणजे आशी दृष्टी असणारी माणसे फारच कमी आहेत. मी जेव्हा अनेकांशी बोलतो तेव्हा मला त्यांच्या कमकुवतपणाची कीव येते .पण जेव्हा भाईजींशी बोलत होतो .तेव्हा जाणवत होते की शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलेले आहे आणि ते निर्माण करण्यामध्ये त्यांची जिद्द सातत्य प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास यामुळे बुलढाणा अर्बनचे पाऊल पडते पुढे. माणूस जेव्हा चांगले काम करीत जातो तेव्हा त्याला मागे ओढणारेही बरेच लोक असतात. समाजामध्ये अशा लोकांची कमी नाही .भाईजी सांगत होते. पण मी त्यांना जुमानले नाही. मी माझे काम करीत राहिलो .मराठी मध्ये एक म्हण आहे….. हत्ती रस्त्याने चालत असतो तेव्हा कुत्रे भुंकतच असतात…. असे होतच असते .पण भाईजींनी कधीही त्याठिकाणी राग मानला नाही आणि प्रगतीचे पाऊल पुढे नेत गेले .आज बुलढाणा अर्बनने आपल्या बँकेचे क्षेत्राबरोबरच शिक्षण क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात जे अढळ स्थान निर्माण केले आहे ते शब्दातीत आहे .एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी भाविकांना राहण्यासाठी बुलढाणा अर्बनतर्फे निवास व्यवस्था केलेली आहे .खरं म्हणजे हे बँकेचे काम नाही .परंतु आपले एक उत्तरदायित्व म्हणून त्यांनी ही सामाजिक बांधिलकी जोपासली ती निश्चितच नोंद करण्यासारखी आहे. या सर्व कामात भाईजी सर्वे सर्व असले तरी त्यांची कन्या सौभाग्यवती कोमल व जावई सुकेश झंवर यांचेही योगदान तेवढेच महत्त्वाचे आहे .कारण या वाटचालीमध्ये अनेकांची साथ घ्यावी लागते. अनेकांचे नियोजन करावे लागते आणि ते समर्थपणे त्यांचे जावई व त्यांची कन्या करीत आहे. श्री संत गाडगेबाबा यांचा भुकेलेल्या अन्न तहानलेल्या पाणी आणि निवारा या सूत्रांचा भाईजींनी आपल्या जीवनामध्ये तंतोतंत अवलंब केलेला आहे. माझ्या गावातला कोणताही माणूस उपाशी राहू नये यासाठी त्यांनी अन्नक्षेत्र सुरू केलेले आहे .आणि गावात जो माणूस उपाशी असेल त्याने भाईजींच्या अन्नछत्र येथे येऊन जेवण करावे. त्याचबरोबर शिक्षणाची गंगा खऱ्या अर्थाने रुजवण्यासाठी त्यांनी आपल्या गावात एक अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे. ज्या पालकाची खरोखरच परिस्थिती नाही. त्या पालकांनी येऊन फक्त भाईजींची भेट घ्यायची आणि सांगायचे की माझी आर्थिक परिस्थिती नाही .मी माझ्या मुलाची फी भरू शकत नाही .अशा मुलांना शाळेमध्ये विनामूल्य प्रवेश देण्याचे दातृत्व भाईजींनी दाखवलं आहे. खरं म्हणजे आज शाळांची फी प्रचंड वाढलेली आहे .पण अशा प्रचंड फीच्या गदारोळातही सामान्य माणसाला फी भरू न शकणाऱ्या माणसाला दिलासा देणारी ही बाब नक्कीच महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद करण्यासारखी आहे .भाईजींच्या या अभिनव उपक्रमाचे अनुकरण इतरही शाळांनी करावे .किमान प्रत्येक वर्गामध्ये एक दोन असे विद्यार्थी असावेत की जे हुशार आहेत परंतु ही फी भरू शकत नाहीत.भाईजीने जसा आधार दिला तसा आधार दिला तर ही मुले या दीपस्तंभ चा आधार घेऊन समाजासमोर आदर्श निर्माण केल्याशिवाय राहणार नाहीत.भाईजी आता लवकरच एक लोक चळवळ सुरू करणार आहेत.त्याची संकल्पना त्यांनी आमच्यासमोर मांडली ती अशी की वेगवेगळ्या समारंभातून लग्न समारंभातून वाढदिवसाच्या समारंभातून उपहारगृहातून मोठ मोठ्या हॉटेलमध्ये अनेक अन्न वाया जाते .लोक अपेक्षेपेक्षा जास्त ताटात वाढून घेतात आणि आज जगभरात अनेक लोक उपाशी असताना अन्नाची नासाडी होते .त्यासाठी भाईंजींनी पुढाकार घ्यायचे ठरवले आहे आणि त्यासाठी त्यांचे नियोजन झाले आहे आणि याबाबतीत जनजागृती करण्यासाठी ते संपूर्ण महाराष्ट्र पालथा जाणार आहेत. आज अन्नाची जी नासाळी होते आहे ती थांबवली पाहिजे .यासाठी या सामाजिक कार्यासाठी स्वतःचा वेळ देणारा हा माणूस निश्चितच आगळावेगळा आहे हे वेगळे सांगणे नको. आज बुलढाणा अर्बनचा सर्वत्र बोलबाला आहे .त्यांचे सहकार विद्या मंदिर आज शिक्षण क्षेत्रात खंबीरपणे आपले पाय रोवून उभे आहे. याला कारण भाईजीच आहेत. आम्ही शाळेच्या संदर्भात एक मोठी योजना त्यांच्यासमोर मांडली. अर्थातच ती लाखो रुपयांची आहे .पर्यावरणाशी संबंधित आहे. भाईजींनी क्षणाचाही विचार न करता त्या योजनेची पूर्ण रूपरेषा उज्वल कुचेकडून समजावून घेतली आणि दिवाळी झाल्याबरोबर तुम्ही माझ्याकडे परत या .आपण आपल्या शाळेपासून सुरुवात करू असेही त्यांनी आम्हाला सांगितले .आपल्या शाळेसाठी अभिनव कल्पना राबवणाऱ्या या महान मानवाला खरोखरच मनापासून सलाम केला पाहिजे .भाईजी सांगतात मला महाराष्ट्रातच नव्हे तर बाहेरच्या राज्यातूनही निमंत्रण येतात आणि मी त्याचा स्वीकार करतो .जातो .बोलतो. अगदी महाराष्ट्रात भारताच्या या कोपऱ्यापासून तर त्या कोपऱ्यापर्यंत भाईजींना जाण्यामध्ये आनंद येतो. त्यांच्याकडे पाहिले तर कोणीही त्यांना 72 वर्षाचा म्हणणार नाही .साधारणतः 65 वयोगटात ते असावेत असा एक अंदाज येतो आणि आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा भाईजींनि सांगितले की माझ्या या स्वास्थ्याचे रहस्य माझा नियमित व्यायाम सकारात्मक दृष्टिकोन योगासन आणि नियमितपणे मित्रांबरोबर हसणे हास्यकल्लोळ करणे आणि पर्यटन करणे यालाच आहे. अशा या दिलखुलास माणसाच्या सहवासामध्ये आमचा वेळ कसा निघून गेला ते कळले नाही. गरीब मुलांसाठी ज्ञानाची दारे विनामूल्य उघडे करणाऱ्या व गावातल्या भुकेल्या माणसाला रोज जेऊ घालणाऱ्या या माणसाला या लेखा निमित्त मानाचा मुजरा. भाईजीसारखी माणसे या समाजात जर जन्माला आली तर सहकार शिक्षण ज्ञानदान या क्षेत्रामध्ये प्रगती होऊ शकेल यात शंकाच नाही. प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी अमरावती 9 8 9 6 96700 3

प्रतिक्रिया व्यक्त करा