You are currently viewing राज्य नाट्य स्पर्धा १५ नोव्हेंबरपासून..

राज्य नाट्य स्पर्धा १५ नोव्हेंबरपासून..

मालवण

शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे १५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोंदणीकृत नाट्य संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा समन्वयक संजय शिंदे यांनी केले आहे.

६१ व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची सिंधुदुर्ग केंद्राची प्राथमिक फेरी १५ नोव्हेंबरपासून मामा वरेरकर नाट्यगृह या ठिकाणी सुरू होणार आहे. ही स्पर्धा सिंधुदुर्ग केंद्रामध्ये आणण्याचा प्रमुख उद्देश हाच होता की जिल्ह्यातील जास्तीत जास्त नाट्य संस्थांना व नाट्य कलावंतांना या स्पर्धेत सहभागी होता यावे. सिंधुदुर्ग केंद्रावर ही स्पर्धा २०१८ पासून सुरू झाली. यावर्षी आपल्या केंद्रावरील या स्पर्धेचे चौथे वर्ष आहे. सुरवातीपासूनच या स्पर्धेला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे.

जिल्ह्यातील नामांकित नाट्य संस्था या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपल्या दर्जेदार नाट्यकृती सादर करत असतात. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या नाट्यसंस्थांना शासनाच्यावतीने नाट्य निर्मिती खर्च, सहभागी कलावंतांना दैनिक भत्ता, स्थानिक नाट्यसंस्था वगळून इतर नाट्यसंस्थेतील कलावंतांना प्रवास खर्च; तसेच सादरीकरणादिवशीच्या तिकीट विक्री रकमेतील ५० टक्के हिस्सा नाट्यसंस्थांना देण्यात येतो. त्यामुळे हौशी नाट्यसंस्थांवरील आर्थिक भार काही प्रमाणात कमी होतो. जिल्ह्यातील नाट्य संस्था व त्यातील कलावंतांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध होते. यासाठी जास्तीत जास्त नाट्यसंस्थांनी सहभागी व्हावे.

स्पर्धेच्या प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर असून स्पर्धेसाठी विहीत नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या www.mahasanskruti.org या वेबसाइटवर नवीन संदेश या मथळ्याखाली उपलब्ध होतील. अधिक माहितीसाठी जिल्हा समन्वयक शिंदे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा