You are currently viewing कुडाळ नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या अक्षता खटावकर बिनविरोध निवड

कुडाळ नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या अक्षता खटावकर बिनविरोध निवड

कुडाळ :

 

कुडाळ येथील नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या नगरसेविका अक्षता खटावकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी खटावकर यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी उपस्थित काँग्रेस-शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी खटावकर यांना शुभेच्छा दिल्या.येथील नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी काळुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली.

यावेळी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद नातू, अधीक्षक गितांजली नाईक आदी उपस्थित होते. कुडाळ नगरपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता आहे. महाविकास आघाडीत ठरल्याप्रमाणे घटक पक्ष काँग्रेस पक्षाच्या आफ्रिन करोल यांनी १४ मे रोजी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसच्या नगरसेविका खटावकर यांनी नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून १२ जूनला एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विरोधी पक्ष भाजपाने मात्र या निवडणुकीत कोणतीच हालचाल केली नाही. निवडणूक निर्णय अधिकारी काळुसे यांनी खटावकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल असल्याने नगराध्यक्षपदासाठी त्यांची निवड जाहीर केली.

यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख, तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, प्रकाश जैतापकर, माजी नगराध्यक्ष आफ्रिन करोल, श्रेया गवंडे, श्रुती वर्दम, ज्योती दळवी, सई काळप, उदय मांजरेकर, द्वारकानाथ घुर्ये, संतोष शिरसाट, अतुल बंगे, बबन बोभाटे, सुंदर सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + 14 =