You are currently viewing ‘सिंधु बँक सॅलरी प्लस’ योजनेतून नोकरदारांना ४० लाख पर्यंतचे विमा संरक्षण कवच

‘सिंधु बँक सॅलरी प्लस’ योजनेतून नोकरदारांना ४० लाख पर्यंतचे विमा संरक्षण कवच

१ नोव्हेंबर २०२० पासून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने आपल्या बँकेत पगार जमा होणाऱ्या नोकरदारांसाठी विशेष लाभ देणारी ‘सिंधु बँक सॅलरी प्लस’ योजना राबविण्यास सुरूवात केली. या योजनमध्ये सुलभ व कमी व्याजदर असणाऱ्या कर्ज सुविधेबरोबरच सामुहिक अपघात विमा पॉलीसीचा लाभ दिला जातो. नोकरदारांना त्यांच्या मासिक पगाराच्या १०० पट व जास्तीत जास्त ४० लाख पर्यंतचे विमा संरक्षण ‘विनामोबदला’ बँकेमार्फत दिले जाते. बँकेने आतापर्यंत सुमारे ८०६१ नोकरदारांसाठी आपल्या उत्पन्नातून ५९.७५ लाख विमा हप्ता रक्कम विमा कंपनीकडे भरलेली आहे.शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन, निवृत्ती वेतन, जिल्हा बँकेमध्ये जमा करणेस मान्यता मिळाल्याची माहिती बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.

सदरची योजना जिल्हयातील इतर बँकांमध्ये सुध्दा आहे. मात्र त्या योजनेचे पात्रता व निकष पाहता खूपच कमी नोकरदारांना त्याचा लाभ होवू शकतो. तृतीय व चतुर्थं वेतन श्रेणीतील नोकरदारांना याच लाभ होत नाही. करार पध्दतीवरील अंशदान योजनेतील नोकरदारांना या योजनेत समाविष्ट करून घेतले जात नाही. आमच्या बँकेच्या ‘सॅलरी प्लस’ योजनेचे पात्रता व निकष सर्वांनाच सामावून घेणारे आहेत व विमा हप्ता प्रिमियम रक्कम बँक स्वतः आदा करते.

जिल्हा बँकेच्या पगारदार कर्मचाऱ्याचा यामध्ये समावेश आहे. यातील एक कर्मचारी कै.स्नेहल श्रीराम मराठे (वय वर्ष ५४ रा. हरकुळ बुद्रुक ता. कणकवली) यांचा अपघात विमा ‘सॅलरी प्लस’ योजनेनुसार उतरविण्यात आलेला होता. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी हरकुळ बुद्रुक येथे दुचाकी व बैल यांची धडक होवून अपघात झाला व पुढे त्यांचे २१ डिसेंबर २०२१ दुदैवी निधन झाले. तद्नंतर त्यांचे वारस श्रीराम मराठे यांनी बँकेच्या मार्गदर्शनाखाली सदर विमा क्लेम कंपनीकडे सादर केला. दि.न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीने रक्कम रू.४० लाख मंजूर केलेला असून सदर रक्कमेचा चेक बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, विमा कंपनीचे कुडाळ शाखा प्रबंधक श्री. रंजन यांचे हस्ते श्री. मराठे यांना देणेत आला. याव्यतिरिक्त बँकेने केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री सुरक्षा विमा २ लाखांचा विमा क्लेम मिळविणेसाठी आवश्यक कार्यवाही सुरु आहे. जिल्हा बँकेमुळे आपल्या कुटुंबाला विम्याचा आर्थिक लाभ होत असल्यामुळे कै. स्नेहल मराठे यांच्या कुटुंबीयांनी बँकेचे आभार व्यक्त केले आहेत.

शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन, निवृत्ती वेतन, जिल्हा बँकेमध्ये जमा करणेस राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार मान्यता दिलेली आहे. जिल्हयातील ग्रामपंचायत, अन्य नोकरदारांनी जिल्हा बँकेत आपले पगार खाते सुरू करून बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नजिकच्या शाखेत संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी केलेले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 5 =