You are currently viewing आनंदाचे संकेत
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

आनंदाचे संकेत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

*आनंदाचे संकेत*

महाकवी कालीदासाने म्हटले आहे,
“उत्सवप्रिय:खलु मनुष्य:”
हे शंभर टक्के खरं आहे. त्यामुळेच भारतीय संस्कृतीत
सण,उत्सव, व्रतवैकल्ये यांना खूप महत्व आहे. आजही ते तितकंच टिकून आहे. कदाचित काळाप्रमाणे पद्धती बदलल्या असतील. अधिक सुटसुटीत आणि सोयीच्या झाल्या असतील. मात्र त्यामागच्या संकल्पना, भावना,दृढ आहेत. प्रत्येक सण हे आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे.आपले आनंदाचे संकेत आहेत.

भेदभाव विसरुन समाजाला एकसंध करणे हे सण साजरा करण्या मागचं मूळ ऊद्दीष्ट.

तसे आपल्याकडे बाराही महिने कुठले ना कुठले सण असतातच. विवीध धर्म, पंथ, जात, भाषा यामुळे सण साजरे करण्याच्या पद्धतीही विवीध आहेत.

चैत्रातला गुढीपाडवा. जिथून मराठी लोकांचे नूतन वर्ष सुरु होते. ते फाल्गुन मासातल्या होळीपर्यंत वैविध्य पूर्ण सण साजरे केले जातात. अगदी आजही. श्रावण महिना तर सणांनी गच्च भरलेला.नागपंचमी, राखी पौर्णिमा, जन्माष्टमी आणि अमावस्येचा बैल पोळा. काही ठिकाणी हाच दिवस पिठोरी अमावस्या म्हणूनही साजरा केला जातो. हिंदु संस्कृतीतला तो मातृदिन आहे.

राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या
प्रेमाचा संकेत आहे. बहीण, भावाला प्रेमाचा धागा बांधते,
आणि भाऊ ” तिचे संकटात रक्षण करण्याचे “वचन देतो..
राखी पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णीमा. हा कोळ्यांचा सण. सागर उसळलेला असतो. त्याला श्रीफळ अर्पण
करुन त्याची प्रार्थना केली जाते.दिवाळीतली भाऊबीज ही सुध्दा बहिण भावाच्या प्रेमाचाच बंध घट्ट करते.

मूळात सर्वच सणांद्वारे निसर्गाविषयीची कृतज्ञता व्यक्त केली जाते. वृक्षवल्ली, पशु, पक्षी, धन धान्य या सगळ्यांची
पूजा निरनिराळ्या सणांच्या, व्रतवैकल्यांच्या माध्यमातून
केली जाते.वटपौर्णीमेला वडाची पूजा, हरतालिकेला पत्रीपूजन करतात .
खानदेशात अक्षयतृतियेला आखाजी म्हणतात.
*घागर भरणे* हा एक सुंदर प्रकार हा सण साजरा करताना त्यात समाविष्ट आहे. मातीच्या मडक्यात पाणी, ,पाण्यात नाणी वर मातीचच झाकण त्यावर खरबुज…पानाफुलांनी ही घागर सजवली जाते. धान्याच्या
रांगोळीवर ठेऊन ती पुजली जाते. पाणी आणि मातीचे महत्व सांगणारा, उन्हाळ्याची चाहुल देणारा हा शेतकर्‍यांचा, मातीशी नातं सांगणारा भावपूर्ण सण..

पोळा हा असाच गोड सण!जे बैल शेतकर्‍यांसाठी राबतात.त्यांच्याविषयी प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणारा सण! बैलांनासुट्टी. झूल, घुंगुरमाळा, शिंगांना रंग लाऊन त्यांना सजवलं नटवलं जातं. तेव्हां ते इतके गोजीरे दिसतात! सवाष्णी त्यांचं औक्षण करतात.पुरणपोळीचा घास भरवतात.. शेतात राबणार्‍या सर्व मजुरांना घरातल्या स्त्रिया स्वत: रांधुन वाढतात..किती भावुकता प्रेम माणुसकी हा सण दाखवतो….!!
बाकी गणपती उत्सव दसरा दिवाळी हे तर राष्ट्रीय सणच म्हणा की..
सर्वत्र साजरे केले जातात…
तिळगुळ घ्या गोड बोला हा प्रेमळ संदेश देणारा संक्रांतीचा सण वेगवेगळ्या नावाने भारतात साजरा केला जातो…
सामुहिक आनंद देणारे हे सण..
चांगल्याचा उद्धार आणि वाईट शक्तींचा संहार.
नात्यागोत्यांची जपणूक.ज्योतीने ज्योत लावा,अंधाराकडुन प्रकाशाकडे ,तमसो वा ज्योतिर्गमय् .
असे सुरेख संदेश देणारे हे भारतीय सण. आपल्या संस्कृतीची मुळं.

प्रत्येक सणाशी विशीष्ट खाद्यपदार्थही जुळलेले आहेत.
गुढी पाडवा म्हणजे श्रीखंड पुरी हवीच.शिवाय अनोरशापोटी कडुनिंब चिंच गुळाची गोळी.
रामनवमीचा सुंठवडा.(यात पूर्वजांनी आरोग्य शास्त्राचा किती बारकाईने विचार केलेला आहे) नारळीपौर्णिमेला नारळीभात. गोकुळअष्टमीचा अनारदाणे घालुन केलेला दहीभात काला. पिठोरी अमावस्येला राजेळी केळ्याचे दिवे.
गणपतीला मोदक. नवरात्रीत मसाल्याचे दूध.आणि दिवाळी म्हणजे फराळाचे ताटच. चकली कडबोळी अनारसे करंज्या..होळीला पुरणपोळी.

आजकाल आपण जरी हे पदार्थ वर्षभर खातो तरी सणाला आवर्जुन खाद्यपरंपरा सांभाळतोच.

काळ बदलला .परिस्थिती बदलली.पूर्वी स्रियांसाठी सण हे वरदान होतं कारण त्यानिमीत्ताने त्या उंबरठा ओलांडत.आता तशी परिस्थिती नसली तरी बहुतांशी ,वेगळ्या पद्धतीने म्हणा, वेगळे अर्थ उलगडुन
तितक्याच ऊत्साहाने भारतीय, देशात परदेशातही
हे आनंदाचे सण धूमधडाक्यात साजरे करतात..
सण म्हणजे नटणं..
सण म्हणजे मिष्टांन्नाची मज्जा.,
सण म्हणजे सामुहिकता…
सण म्हणजे निसर्गाची पूजा..
मानवता, कृतज्ञता व्यक्त करण्याचं निमीत्त..
अगदी करोनाच्या लाॅकडाउन काळातही, दूरत्वाचे बंधन असतानाही,अधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने,
घेउ साथ विज्ञानाची
साजरे करु सण
घेउनी मदत अंतर्जालाची…
हीच भावना कायम होती.
काळ कितीही बदलू दे.पण सांस्कृतिक परंपरांची ही मुळं
मातीतच रहाणार. फारतर त्याला नवे कोंब फुटतील. त्यातलं साजरेपण अधिक डोळस होईल. त्यात पर्यावरणाचा विचार,बदलत्या काळानुसार गांभीर्याने केला जाईल. निसर्गपूजनाबरोबर निसर्गाची जपणूक हा केंद्रबिंदु राहील..नव्हे तो रहावाच.

बदलत्या काळानुसार, विशेषत: तरुण पीढीमधे व्हँलेंटाईन डे, फ्रेंडशीप डे, हॅलोवीन डे असे काही विदेशी सण अथवा ऊत्सवही मनवले जातात.पुन्हा तेही आनंदाचे ,प्रेमाचेच संकेत.

आणखी एक मुद्दा मला इथे मांडावासा वाटतो. तो म्हणजे
सर्वधर्म समावेशकतेचा. इतर धर्मातल्या सणानाही आपलेपणाने पहाण्याचा. त्यात नाताळ आहे. रोजे आहेत ईद आहे.नवरोज आहे. आपल्या उत्साहाचा कण नि कण
या सणांमधेही सामावला पाहिजे. आणि समाजामधे ही
सकारात्मक भावना आज बळावत आहे, ही समाधानाची बाब आहे. मित्रत्वाची, आपलेपणाची भावना रुजवण्यासाठी सण हे एक महत्वाचे माध्यम आहे.

मला आवर्जून सांगावीशी एक आठवण आहे..
मी बँकेत नोकरी करत असताना ईस्माईलभाई नावाचा आमचा एक ग्राहक होता. आणि तो बँकेत आला की सर्वांना प्रथम नमश्ते! असं म्हाणायचा आणि नंतर
वालेको सलाम..आणि आम्हीही अस्सलाम वालेको म्हणायचे…ईद च्या दिवशी तो आवर्जून सर्वांसाठी लज्जतदार शीर खुरमा घेऊन यायचा…

शेवटी सण म्हणजे आनंद ऊत्साह यांची देवघेवच.
आणि काळाच्या प्रवाहात हा आनंदौघ टिकणारच.

सौ. राधिका भांडारकर.

प्रतिक्रिया व्यक्त करा