You are currently viewing ज्ञानेशांचा संदेश..

ज्ञानेशांचा संदेश..

नामस्मरणाचे प्रकार –

 

🎯 *पहिला प्रकार* :- नामाचा उच्चार करणे व तो कानांनी लक्षपूर्वक ऐकणे.याच्या अभ्यासाने चित्ताची एकाग्रता लवकर साधली जाते. नामाचा मुखाने उच्चार व कानांनी त्याचे श्रवण,असे सतत करीत राहिल्याने आपल्या जीवनात नामाचे चक्र निर्माण होते.सुदर्शन चक्राच्या सहाय्याने भगवंत दुष्टांचा संहार करतो व सुष्टांचे सर्व संकटांपासून संरक्षण करतो.त्याचप्रमाणे संतांचे हे नामचक्र साधकाच्या अंत:करणात काम,क्रोध आदी विकारांचा संहार करते व त्याचे सर्व संकटांपासून रक्षण करते.

 

तुकाराम महाराज सांगतात

तुका म्हणे देह भरला विठ्ठले। काम क्रोधे केले घर रिते।।

नामाच्या चिंतने। बारा वाटा पळती विघ्ने।।

 

त्याचप्रमाणे दासबोधात समर्थ रामदास स्वामी सांगतात.

नामे संकटे नासती । नामे विघ्ने निवारिती।

नामस्मरणे पाविजेती। उत्तम पदे।।

 

🎯 *दुसरा प्रकार :-* नामाचा उच्चार करणे व ते करीत असतांना उपास्य मूर्ती चरणापासून मस्तकापर्यंत व मस्तकापासून चरणापर्यंत पुन: पुन: पहात रहाणे.मनाची एकाग्रता साधण्यास हा अभ्यास उत्तम आहे. एकदा एका साधुला ब्रह्मराक्षस प्रसन्न झाला.त्याने त्या साधुला सांगितले की आपण तुझी सर्व कामे करूं,पण एका अटीवर.ती अट म्हणजे काम सांगण्याचे तू ज्या क्षणी थांबवशील त्या क्षणालाच आपण तुला खाऊन टाकू.त्या साधूने राक्षसाला पुष्कळ कामे करावयास सांगितली व त्याने सुद्धा आपल्या अचाट सामर्थ्याच्या जोरावर ती सर्व कामे केली.शेवटी कांहीच काम सांगावयास शिल्लक रहात नाही असे पाहिल्यावर साधुची पांचावर धारण बसली.शेवटी त्याला एक युक्ती सापडली.त्याने त्या राक्षसाला एक खड्डा खणून उंच खांब रोवण्यास सांगितले,राक्षसाने ते काम एका क्षणात केले.नंतर साधुने त्याला एक विलक्षण काम सांगितले. खांबाच्या खालच्या टोकापासून वरच्या टोकापर्यंत व फिरून वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत सारखे चढत-उतरत राहणे हेच ते काम,राक्षस ते काम करून अगदी थकून गेला तरी काम संपेना.शेवटी त्याने साधूचे पाय धरले.आपले मन हा असाच एक राक्षस आहे.त्याच्या चंचल स्वभावामुळे आपण अक्षरशः अधोगतीला जात आहोत.म्हणून त्याला असे काम द्या की त्याने “राम” म्हटले पाहिजे,ते काम म्हणजे नाम. नामाचा उच्चार करणे व तसे करीत असतां मनाला डोळ्यांवाटे उपास्य मूर्तीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व पुनः मस्तकापासून चरणापर्यंत फिरवीत ठेवल्याने मनाची चंचलता व बहिर्मुखता नष्ट होऊन ते स्वरूपी स्थिर होते.

 

🎯 *तिसरा प्रकार :-* नाम-नामी अभेद.भगवंत व भगवन्नाम दोन्ही एकच आहेत या बोधात नामस्मरण  करणे.भगवन्नाम भगवद्रूपच आहे कारण ते परब्रह्माचे शुद्ध स्फुरण आहे. नामाचा उच्चार करीत असता नामरूपाने प्रभु आपल्याजवळ आहे,उच्चार होत असता प्रभुचा संग घडत आहे,या भावनेने नामस्मरण करणे चांगले.अशा प्रकारे नामस्मरण करणाऱ्या साधकाला त्वरित फलप्राप्ती होते.

 

🎯 *चौथा प्रकार :-* टाहो फोडून नामाचा उच्चार करणे.साध्या भाषेत सांगावयाचे म्हणजे बेंबीच्या देठापासून नामाचा उच्चार करणे.या प्रकारात साधकाची भावना अशी असते की, प्रभु कोठे तरी दूर आहे व त्याला टाहो फोडून त्याच्याच नांवाने हांक मारल्याशिवाय तो धावून यावयाचा नाही.हा प्रकार वर वर दिसावयास साधा व कांहीसा सौम्य वाटतो.परंतु फळ देण्याच्या दृष्टीने तो फार महत्त्वाचा आहे.या प्रकारच्या नामस्मरणात भक्ताचा भोळा भाव प्रकट होत असतो व त्या भोळ्या भावालाच भगवंत भाळतो.शिवाय अशा प्रकारच्या नामस्मरणात साधकाचा देह नाम घोषाने अक्षरश: दुमदुमतो.जीवापासून देहापर्यंतच्या सर्व घटकांमध्ये पालट होतो व सरते शेवटी साधकाला,

देह ही पंढरी आत्मा पांडुरंग।

करीतसे संग अहर्निशी।।

असा अनुभव प्राप्त होतो.

 

🎯 *पांचवा प्रकार :-* श्वासोच्छवासी नामस्मरण.आपण श्वासोच्छवास सहजच सर्वकाळ करीत असतो.या श्वासोच्छवासात आपले नामस्मरण आपल्या सोयीप्रमाणे बसवावयाचे.नाममंत्र जर अधिक अक्षरांचा असेल तर त्याचे दोन किंवा अधिक विभाग करून तो मंत्र श्वासोच्छवासात जपावयाचा.उदाहरणार्थ,रामकृष्णहरी हा मंत्र राम-कृष्ण-हरी या तीन विभागांत जपावयाचा.एक श्वास आंत घेत असतां राम म्हणावयाचे,दुसरा उच्छवास बाहेर सोडीत असतांना कृष्ण म्हणावयाचे व तिसरा श्वास पुन्हा आंत घेत असता हरी म्हणावयाचे,किंवा याच मंत्राचे दोन विभाग करावयाचे.एक राम व दुसरा कृष्णहरी.श्वासोच्छवासात नामस्मरण करण्याने एकाग्रता लवकर होते.आरोग्याला तर हे नामस्मरण फारच चांगले,त्याचप्रमाणे सुगंध येणे,प्रकाश दिसणे वगैरे अतिन्द्रिय अनुभव या प्रकारच्या नामस्मरणाने साधकाला त्वरित येतात.

 

🎯 *सहावा प्रकार :-* श्वासावर लक्ष देऊन नामस्मरण करणे.या प्रकारात नाम घेत रहावयाचे व तसे करीत असतां श्वासावर फक्त लक्ष ठेवावयाचे.हा प्रकार वरच्यापेक्षा सोपा आहे.

 

🎯 *सातवा प्रकार :-* जिव्हेला वेग देऊन नामस्मरण करणे.या प्रकारच्या नामस्मरणात साधकांची प्रगती फार त्वरित होते.भटकणाऱ्या मनाला लगाम घालून त्याला स्थिर करण्याचे सामर्थ्य या नामस्मरणात आहेजोपर्यंत जिव्हेत नामाचा वेग आहे,तोपर्यंत मनाला जरा सुद्धा हालचाल करता येत नाही;परंतु हाच वेग ज्या प्रमाणात कमी होत जाईल त्या प्रमाणात मनाचे चंचलत्व वाढू लागेल.म्हणून या प्रकारच्या नामस्मरणात साधकाने जिव्हेतील नामाचा वेग टिकून राहील असा अभ्यास करण्याचा प्रयत्न करावा.

 

🎯 *आठवा प्रकार :-* स्वरूपाच्या स्मरणात नामाचा उच्चार.आनंदाने भरलेले ज्ञानघन चैतन्य हे जीवाचे म्हणजे ‘मी’ चे स्वरूप आहे.’मी’ चे पांघरूण घेऊन देवच देहात नांदतो.देह म्हणजे मंदिर व या मंदिरातील देव ‘मी’ आहे,या बोधात साधकाने नामाचा नित्य उच्चार करीत रहावे.अशा नामस्मरणाच्या सतत अभ्यासाने आयुष्यात एक दिवस असा उगवेल की,त्या दिवशी प्रज्ञेचा प्रकाश बुद्धीत पडून जीवाला आपल्या खऱ्या स्वस्वरूपाचा प्रत्यक्ष बोध होईल.

 

🎯 *नववा प्रकार :-* भूती भगवंत या भावात नामस्मरण.भगवंत सर्वत्र भरून राहिलेला आहे,हा शास्त्राचा सिद्धांत आहे व संतांचा अनुभव आहे.साधकाने हा अनुभव प्राप्त होईपर्यंत दृष्टिसमोर जे दिसते ते हरीचे रूप आहे अशा श्रद्धेने भगवन्नामाचा उच्चार नित्य करीत रहावे.या प्रकारात मनाची खरी एकाग्रता साधली जाते.इतर प्रकारांत सर्व काही बाजूला सारून ध्येयवस्तूच्या ठिकाणी मन एकाग्र करावयाचे असते परंतु या प्रकारात मनाला एका प्रभुचेच अग्र सर्वत्र दाखवित रहावयाचे असते.इतर प्रकारांत मनाची एकाग्रता भंग व्हावयास साधे कारण सुद्धां पुरे होते,परंतु या प्रकारात मनाची एकाग्रता अखंड रहाते.

 

🎯 *दहावा प्रकार :-* सद्गुरुंची मूर्ती मनःचक्षू पुढे ठेवून नामस्मरण करणे.या प्रकारच्या नामस्मरणात साधकाची प्रगती त्वरित होते.सामान्य साधकाला भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणणे कठीण जाते;परंतु ही अडचण या प्रकारात भासत नाही.कारण आपल्या सद्गुरुंना आपण प्रत्यक्ष पाहिलेले असते,त्यांच्याशी संवाद केलेला असतो,त्यांच्या पायावर प्रत्यक्ष मस्तक ठेवलेले असते व त्यांचा परिचय झालेला असतो.मनात आणण्याचाच अवकाश की,सद्गुरुंची मूर्ती चटकन् डोळ्यांसमोर येते.म्हणूनच साधकाने सद्गुरुंच्या ठायी भगवद्भाव ठेवून व त्यांची मूर्ती मनःचक्षूपुढे आणून नित्य नामस्मरण करीत रहावे.

 

🎯 *अकरावा प्रकार :-* संख्या ठेवून माळेवर जप करणे.हा प्रकार दिसावयास कनिष्ठ परंतु अनुभवाच्या दृष्टीने फार श्रेष्ठ आहे.सामान्य साधकांना संसारातील सुखदुःखांचा वेध लागलेला असतो.प्रपंच-पंकात त्यांचे मन इतके खोल रूतलेले असते की त्यातून त्याला बाहेर काढून नामकमलावर आरूढ करणे कठीण असते.विषयांचे स्मरण जीवाला सहज आहे.त्यासाठी मुद्दाम अभ्यास करावा लागत नाही.रेसचा छंद असणाऱ्या माणसाला घोड्याचे स्मरण सहज असते.घोड्याचे स्मरण करण्यासाठी त्याला माळ जपत बसण्याची जरूरी नाही.हातात माळ घेऊन पतीच्या नामाचा जप करण्याचे पतिव्रतेला कांहीच कारण नसते.याचे कारण ती पतिव्रता असते म्हणून.पति आपल्या जीवनाचे सर्वस्व आहे हे तिला न शिकवितांही समजत असते.त्यामुळे पतिव्रतेला पतीचे अखंड स्मरण सहज असते.परंतु सर्वसाधारणतःसाधकाला देवाचे असे स्मरण असत नाही.देव आपल्या जीवनाचे सर्वस्व आहे, आपल्या जीवनाचाही सर्व आधार तोच आहे,हे सामान्य माणसांना सांगून व शिकवून उमजत नाही.तात्पर्य, हातात माळ घेऊन देवाच्या नामाचा जप करणे,त्याचे अट्टाहासाने प्रयत्नपूर्वक स्मरण करणे,हे साधकाला आवश्यक असते.याचे कारण तो देवव्रत नसतो म्हणून.गुरूकृपेने जीव-शिवाचे लग्न लागल्यावर साधकाला माळ जपत बसण्याची आवश्यकताच रहात नाही.सारांश,प्रपंच-पंकात रूतलेल्या मनाला अट्टाहासाने बाहेर काढून नामकमलावर आरूढ करण्याचे सामर्थ्य माळेत आहे.माळेला ‘स्मरणी’ हे नांव अत्यंत योग्य आहे.माळेच्या नुसत्या दर्शनाने नामाची आठवण होते.म्हणून साधकाने संख्या ठेवून माळेवर जप करणे चांगले.नित्य नियमाने प्रत्येक दिवशी कमीत कमी अकरा माळा जप करण्याचा संकल्प करावा.त्या शिवाय दिवसभर रिकाम्या वेळांत हातात माळ घेऊन जप करण्याचा अभ्यास करावा.अट्टाहासाने नामाचा जप करतां करतां साधकाचे मन विषयांतून निघून नामात रमू लागते व नामस्मरण हा साधकाचा स्वभाव बनतो.या प्रकारात साधकाला लोकांच्या टीकेला तोंड द्यावे लागते.कारण हातात माळ घेतल्यामुळे हा विनाकारण शो (show)म्हणजे प्रदर्शन करतो अशी टीका लोक करू लागतात.वास्तविक,जगात प्रदर्शन होत नाही कशाचे हाच प्रश्न आहे! कोणी आपल्या अहंकाराचे तर कोणी आपल्या विद्वतेचे प्रदर्शन करतात.कोणी आपल्या श्रीमंतीचे तर कोणी आपल्या सत्तेचे प्रदर्शन करतात. किंबहुना आपल्या मोठेपणाचे प्रदर्शन करण्याची जगात जणू काय चढाओढच लागली आहे!अशा परिस्थितीत हातात माळ घेऊन जप करण्याचे प्रदर्शन करतो,अशी लोकांनी टीका केली तर त्याला निष्ठावंत साधकाने भिण्याचे काहीच कारण नाही.

 

*वर जे नामस्मरणाचे काही निवडक प्रकार दिलेले आहेत,त्यात श्रेष्ठ प्रकार कोणता असा साधकाला प्रश्न पडण्याचा संभव आहे.याचे उत्तर असे की,ज्याच्या प्रकृतीला जो प्रकार मानवेल तो प्रकार त्याला श्रेष्ठ आहे.निरनिराळ्या प्रकृतीच्या साधकांना एकच प्रकार मानवणार नाही,म्हणून आपल्या प्रकृतिला कुठला प्रकार मानवेल त्याच प्रकारचे नामस्मरण साधकाने करावे.शेवटी महत्त्वाची सूचना करून वाचकांशी चाललेले हे हितगुज संपवितो.*

 

*नामाचे दोन प्रकार आहेत.एक ‘साधक नाम’ व दुसरे ‘सिद्ध नाम’.सामान्य साधक जे नाम घेतात त्याला साधक नाम म्हणतात व संत जे नाम घेतात त्याला सिद्ध नाम म्हणतात.साधक नामाने प्रेमानंद साध्य करून घ्यावयाचा असतो.सिद्ध नामाने प्रेमानंद अखंड सेवन करावयाचा असतो. साधक नामाने साधक त्रस्त होतो, परंतु सिद्ध नामाने संत मस्त होऊन रहातात.साधक नामाचा उच्चार जिव्हेने किंवा मनाने मुद्दाम करावयाचा असतो,परंतु सिद्ध नामाचा उच्चार न करतांही तो अंत:करणात आपोआप चालू रहातो.सारांश,सिद्ध नाम हे साधकाचे साध्य असावे.परंतु साधक नामाची उपासना केल्याशिवाय सिद्ध नाम प्राप्त होत नाही हे मात्र साधकाने लक्षात ठेवावे.म्हणून वर सांगितलेल्या नामस्मरणाच्या प्रकारांपैकी ज्याला जो प्रकार आवडेल त्या प्रकारचे नामस्मरण करून साधकाने शाश्वत कल्याण साधावे.*

 

आपुले कल्याण इच्छिणे जयासी।

तेणे या नामासी विसंबु नये।

करील परिपूर्ण मनीचे हेतू।

ठेविलीया चित्त नामापाशी।।

भुक्ति आणि मुक्ति वोळंगति सिद्धि।

होईल की वृद्धि आत्मनिष्ट।

एकाजनार्दनी जपतां हे नाम।

पुरवील काम जो जो हेतू।।

 

🙏~सद्गुरु श्री वामनराव पै.🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 4 =