You are currently viewing रोटरी क्लबच्या माध्यमातून प्रथिने पावडर, कॅल्शियम व व्हिटॅमिन टॉनिकचे वाटप

रोटरी क्लबच्या माध्यमातून प्रथिने पावडर, कॅल्शियम व व्हिटॅमिन टॉनिकचे वाटप

कुपोषण मुक्त कणकवली तालुका उपक्रमांतर्गत ६ ठिकाणी शिबिरे

कणकवली

रोटरी क्लब कणकवलीच्या माध्यमातून कुपोषण मुक्त कणकवली तालुका हा उपक्रम राबविला जात आहे. रोटरी क्लब कणकवलीच्या प्रेसिडेंट वर्षा बांदेकर, सेक्रेटरी उमा परब. इव्हेंट चेअरमन विरेंद्र नाचणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यात ६ ठिकाणी शिबिरे घेण्यात आली.

कणकवली तालुक्यातील कनेडी आणि वरवडे बिट मधील लोकांसाठी डॉ. विद्याधर तायशेटये यांच्या संजीवनी हॉस्पिटल, कणकवली येथे शिबीर घेण्यात आले. यावेळी ४२ कुपोषित मुलांची तपासणी करण्यात आली.

खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रमध्ये एकूण ८ कुपोषित मुलांची डॉ. प्रसाद रानडे यांनी तपासणी केली. कसार्डे बिट मधील १७ कुपोषित मुलांची डॉ.अभिजित कणसे यांनी तळेरे ग्रामपंचायत येथे तपासणी केली. हलवल अंगणवाडी येथे डॉ. सुहास पावसकर यांनी १३ कुपोषित मुलांची तपासणी केली. नांदगाव बिट मधील डॉ. कारंडे नांदगाव अंगणवाडी येथे २२ कुपोषित मुलांची तपासणी केली. फोंडा बिट मध्ये डॉ. शैलेंद्र आपटे यांनी फोंडा अंगणवाडी येथे १८ कुपोषित मुलांची तपासणी केली.

या शिबिरांमध्ये राज्य शासनाच्या अंगणवाड्यांमध्ये शिक्षण घेणाऱ्या कुपोषित बालकांची वैद्यकीय तपासणी, त्यांच्या पालकांना व अंगणवाडी सेविकांना आहार व आरोग्याबाबत मार्गदर्शन उपस्थित डॉक्टर व इव्हेंट चेअरमन वीरेंद्र नाचणे यांनी केले. या कार्यक्रमात सर्व बालकांना मोफत मार्गदर्शन, तपासणी व पुरेशी प्रथिने पावडर, कॅल्शियम व दोन महिने पुरेल इतके व्हिटॅमिन टॉनिक देण्यात आले.

रोटरी क्लब कणकवली आणि एकात्मिक बालविकास विभाग कणकवली तालुका यांच्या वतीने तालुक्यातील अंगणवाडी कुपोषणमुक्त करण्याचा हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. कणकवली तालुक्यातील सुमारे दीडशे कुपोषित बालकांना दर दोन महिन्यांनी शिबिरे घेऊन लाभ देण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी रोटरी क्लब कणकवलीच्या प्रेसिडेंट वर्षा बांदेकर यांनी दिली. या शिबिराला सर्व रोटरी सदस्य तसेच अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका व कणकवली तालुका अधिकारी पाटील सर यांचे विशेष सहकार्य लाभले. हा कुपोषण मुक्त कणकवली प्रकल्प यशस्वी करण्यासाठी सर्व रोटरी सदस्यांचे आर्थिक पाठबळ व मदत असल्याचे देखील बांदेकर म्हणाल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा