You are currently viewing दीपक केसरकर यांच्या मुंबईतील शक्ती प्रदर्शनानंतर सावंतवाडीत शिवसैनिकांची गर्दी

दीपक केसरकर यांच्या मुंबईतील शक्ती प्रदर्शनानंतर सावंतवाडीत शिवसैनिकांची गर्दी

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंच्या शिव संवाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर आ.वैभव नाईक सावंतवाडीत.

महाराष्ट्रातील शिवसेना पक्षामध्ये उभी फूट पडून शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी शिवसेना गटनेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केले. शिवसेनेच्या शिंदे गट व भाजपा पक्षांमध्ये युती होऊन महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले. युतीचे सरकार महाराष्ट्रात येऊन जवळपास २५ दिवस उलटून गेले, तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नसून सर्वच आमदार आपल्याला मंत्रीपदाची संधी मिळते की नाही याच विवंचनेत आहेत. शिंदे गटाच्या काही आमदारांनी आपापल्या जिल्ह्यातील आपले समर्थक घेऊन मुंबईत शक्ती प्रदर्शन केले. अशाच प्रकारे शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते व सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांचे समर्थक मुंबईत दाखल झाले आणि शक्ती प्रदर्शन करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्याचे निमंत्रण दिले.
आमदार दीपक केसरकर यांच्या समर्थकांनी मुंबईत शक्तीप्रदर्शन केल्यानंतर सावंतवाडीत देखील शनिवारी जिल्हाभरातील काही शिवसैनिक, पदाधिकारी सावंतवाडी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे दाखल झाले. यात प्रामुख्याने कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार कट्टर शिवसैनिक वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्यासह उद्धव ठाकरे यांचे समर्थक असलेले शिवसेनेतील अनेक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. शिवसेनेचे युवासेना प्रमुख माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे शिव संवाद यात्रेच्या निमित्ताने कोकण दौऱ्यावर येत असून आमदार दीपक केसरकर यांची कर्मभूमी असलेल्या सावंतवाडीत ते शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी सभा घेणार आहेत. शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे सावंतवाडीत येत असल्याने उद्धव ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी सभेची पूर्वतयारी म्हणून सावंतवाडी येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे सावंतवाडीत देखील दीपक केसरकर यांच्या विरोधात शिवसैनिकांनी शक्ती प्रदर्शन केल्याचे बोलले जात आहे. चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांच्या स्वगृही परतण्यामुळे जुन्या शिवसैनिकांचा उत्साह अधिक वाढला आहे.
मुंबई येथे दीपक केसरकर यांचे कट्टर समर्थक असणारे सर्व पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, जिल्ह्यातील दीपक केसरकर समर्थक शिवसेना नगरसेवक आनारोजीन लोबो, अशोक दळवी, सौ.कीर्ती बोंद्रे, सौ.दीपाली सावंत, वेंगुर्ला दोडामार्ग येथील अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आमदार दीपक केसरकर यांची मुंबईत भेट घेउन शक्तिप्रदर्शन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रखडलेली विकासकामे पूर्ण करण्याचे सांगून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्याचे निमंत्रण दिले होते. केसरकर समर्थक आणि मुंबई येथे केलेले शक्ती प्रदर्शन याच्यात पार्श्वभूमीवर सावंतवाडी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात उद्धव ठाकरे समर्थक यांनी केलेले समर्थन पाहता भविष्यात शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आणखी वाढत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + two =