You are currently viewing विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार दिलीप पांढरपट्टे यांनी स्वीकारला

विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार दिलीप पांढरपट्टे यांनी स्वीकारला

अमरावती

अमरावतीचे नवे विभागीय महसूल आयुक्त दिलीप पांढरपट्टे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार प्र. आयुक्त पवनीत कौर यांच्याकडून आज स्वीकारला.

प्रारंभी प्र. आयुक्त तथा जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी श्री. पांढरपट्टे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, अप्पर आयुक्त नीलेश सागर, उपायुक्त संजय पवार, अजय लहाने, गजेंद्र बावणे, शरद कुळकर्णी, सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, श्यामकांत म्हस्के, मधुकर वासनिक, सुधाकर दवंडे, नियोजन उपायुक्त किरण जोशी, तहसीलदार वैशाली पाथरे, निकिता जावरकर, संतोष काकडे आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी श्री. पांढरपट्टे राज्याचे मृद व जलसंधारण सचिव म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी 1987 मध्ये शासकीय सेवेत प्रवेश केला. त्यांना 2000 मध्ये अपर जिल्हाधिकारी म्हणून बढती मिळाली. त्यानंतर भारतीय प्रशासन सेवेत त्यांची निवड झाली.

श्री. पांढरपट्टे यांनी विविध जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी, जिल्हा पुनवर्सन अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, ठाणे महापालिकेत उपायुक्त, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव, सिंधुदुर्ग येथे अपर जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग व रायगड येथे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, धुळे व सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक आणि सचिव, मृद व जलसंधारण सचिव म्हणून काम पाहिले.

श्री. पांढरपट्टे हे कवी, लेखक, गझलकार असून, त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘शब्द झाले सप्तरंगी’ हा गझलसंग्रह, डॉ. राम पंडित संपादित ‘मराठी गझल : दिलीप पांढरपट्टे’, ‘घर वा-याचे, पाय पा-याचे’ हा ललित लेखसंग्रह, ‘कथा नसलेल्या कथा’ हा कथासंग्रह, ‘बच्चा लोग, ताली बजाव’ हा विनोदी लेखसंग्रह, ‘शायरी नुसतीच नाही’ हा उर्दू शायरीबाबत परिचयात्मक ग्रंथ,तसेच कुळ कायद्यातील घरठाण हक्काबाबत ‘राहिल त्याचे घर’ अशी त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांची बोधकथांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी उर्दू भाषा व लिपी शिकून उर्दूमध्येही ‘रिंद’ या नावाने गझललेखन करतात. ‘शब्द झाले सप्तरंगी’, ‘गजल-रेगिस्तान से हिंदोस्तान तक’, ‘गालिब और मैं’ अशा कार्यक्रमांतून त्यांनी गजल सादरीकरण केले आहे.
आयुक्त कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी व विविध कार्यालयप्रमुखांनी विभागीय आयुक्तांचे स्वागत केले. यावेळी लेखा सहायक संचालक दिगंबर नेमाडे, विशेष कार्य अधिकारी सुशील आग्रेकर, स्वीय सहायक अतुल बुटे, प्रदीप गाडेकर, सनत उईके यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचा-यांनी स्वागत केले.

000

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × three =