देवगड शिक्षण विभागात करोडोंचा घोटाळा

देवगड शिक्षण विभागात करोडोंचा घोटाळा

‘फौजदारी’ दाखल करण्याची प्रदीप नारकरांची मागणी

देवगड

देवगड पंचायत समितीच्या शिक्षण विभागात झालेल्या करोडो रुपयांच्या घोटाळ्याबाबत पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद सभागृहात आवाज उठविण्यात आला. या घोटाळ्यातील संशयितांवर फौजदारी गुन्हा दाखल करणे अपेक्षित असताना फक्त चौकशी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या घोटाळ्यातील संशयित कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेनेचे जि. प. सदस्य प्रदीप नारकर यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

देवगड पं. स. च्या शिक्षण विभागात ज्या कालावधीमध्ये करोडो रुपयांचा घोटाळा झाला त्यावेळी कार्यरत असलेले लिपीक हे ह्या प्रकरणातील प्रथम दर्शनी संशयित असतानाही त्यांचे तात्काळ निलंबन करून चौकशी करणे अपेक्षित होते. परंतु तसे न होता प्रशासनाने त्यांची बदली ग्रामीण पाणीपुरवठा विभागात करून त्यांच्यावर कृपादृष्टी दाखवलेली आहे. त्यामुळे सर्व स्तरातून प्रशासनाच्या या भूमिकेबाबत संशयितांना सदर प्रकरणातून वाचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे शिक्षण विभागात करोडो रुपयांचा घोटाळा करणाऱ्या व शासनाच्या तिजोरीची लूट करणाऱ्यांना जलद गतीने शिक्षा करण्यासाठी सदर प्रकरण त्वरित गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत चौकशी करण्यात यावी अथवा फौजदारी गुन्हा दाखल करून सदर प्रकरणात दोषी असणाऱ्यांना अभय न देता कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना जि. प. सदस्य प्रदीप नारकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा