You are currently viewing वारस (भाग ११)

वारस (भाग ११)

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री आसावरी इंगळे (जामनगर) लिखित अप्रतिम कथा*

*वारस (भाग ११)*

त्या दिवसानंतर कामिनी तिची काळजी घेऊ लागली. तिला खालीच एक खोली राहायला दिली गेली. राघोने कितीही दुर्लक्ष केलं तरी जुईचे बोबडे बोल त्याच्या कानावर पडू लागले. तिच्या मोहक हालचाली त्याला मोहवू लागल्या होत्या. एक दिवस तो अचानक घरी आला तेव्हा शालू जेवत होती. जुई आपल्या चिमुकल्या हातांनी तिला भरवत होती. कामिनी बाजूला बसून शालूला वाढत होती.

“अं…अशं नाई बुवा. मी गोश्तही शांगितली..आता तू खायच्य..”

शालू हातातील घास जुईला भरवणार इतक्यात तिचं लक्ष राघोकडे गेलं आणि ती तिथून क्षणार्धात अदृश्य झाली. कामिनीही खाली मान करून उभी राहिली. काही क्षणांपूर्वीचं हसतं खेळतं वातावरण जाऊन तिथे तणाव दिसू लागला. खोलीत भयाण शांतता पसरली.

“तू! ..अचानक? सांगितलं नाहीस.. आणि गाडीचा आवाजही नाही आला..!”, शालू वातावरणात मोकळेपणा आणत म्हणाली.

“हो..ते काही पेपर्स घ्यायचे होते.”

दोघांचे संभाषण सुरु असलेले पाहून कामिनी तिथून तिच्या खोलीत निघून गेली. का कुणास ठाऊक, यावेळेस त्याला ते कुठेतरी खटकलं..विशेषतः जुई आपल्यामुळे न खाता गेल्याने त्याला जास्तच रुखरुख लागली. तो काही न बोलताच पेपर्स घेऊन गेला. तरीही शालूच्या ते लक्षात आलं होतं. जुईचं अस्तित्व त्याच्या मनात नकळतच मायेचा ओलावा तयार करत होतं. अजून काही दिवसात त्यालाही जुईचा लळा लागणारच होता. शालूला खात्री होतो तशी म्हणून तर तिने कामिनीला मदतीच्या नावाखाली घरात स्थान दिलं होतं.

काही दिवस उलटले. एरवी जुई समोर आली की तिला हिडीसफिडीस करून मारहाण करणारा राघो, प्रथम शालूला दुखवायचं नाही म्हणून जुईकडे दुर्लक्ष करणारा राघो नजर चोरून तिच्या बाललीलांमध्ये रमू लागला होता. शालूच्या नजरेतून ते सुटलं नव्हतं!

सकाळची वेळ होती. रविवार असल्याने राघो घरीच होता. तो आणि शालू उठायचेच होते. कामिनी खोलीबाहेर आली ती घाबरीघुबरी होऊन! जुई खोलीत नव्हती. ती बागेतही नव्हती. घरातील नोकर चाकरांनी तिला बाहेर जाताना पाहिले नव्हते.

(क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा