You are currently viewing वारस (भाग ५)

वारस (भाग ५)

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री आसावरी इंगळे (जामनगर) लिखित अप्रतिम कथा

घरी आल्यानंतर राघोचा मात्र धीर सुटला.

“हे सगळं कामिनीनेच केलं असावं. मला चार दिवसांपूर्वीच घराच्या मागच्या बाजूला अर्ध कापलेलं लिंबू दिसलं होतं.”, तो भडकून म्हणाला.

शालूचा खरंतर यावर विश्वास नव्हता..
विश्वास तर राघोचाही नव्हता ..तरीही..!! आपल्यावरील राघोचं प्रेम पाहून तिचे डोळे भरून आले..! यानंतर त्या बाजूलाही जायचे नाही, असा तिने निश्चय केला. तिला कोणताही धोका पत्करायचा नव्हता!

काळ आपल्या वेगाने पुढे सरकत होता. तिने बंगल्याच्या मागच्या बाजूला जाणे पूर्णपणे बंद केले होते..अगदी त्याबाजूला उघडणाऱ्या खिडक्या देखील बंद केल्या होत्या. बंगला प्रशस्त असल्याने फारसे काही अडतही नव्हते.

एक दिवस शालूला घराच्या मागच्या बगीच्यातून छोट्या मुलीचा आवाज आला. आवाज खूपच नाजूक आणि कोवळा होता. तिला मोह आवरला नाही. तिने त्या बाजूची खिडकी उघडून पाहिले. चार-साडे वर्षांची एक चिमुरडी बोबड्या आवाजात माळी काकांना झाडाफुलांबद्दल काही प्रश्न विचारात होती आणि माळी काकादेखील तिच्याशी तोतड्या आवाजात तिला उत्तरे देत होते. पोरगी लोभस होती. कोण आहे ही? न राहवून शालू मागच्या अंगणात गेली. तिला अचानक आलेले पाहून माळी काका प्रथम दचकले मग सावरले.

“कोण आहे हो ही चिमुकली, माळी काका?”

“कामिनी ताईंची पोर हाय…जुई!”, माळी काका उत्तरले.

“अच्छा..!”

त्यानंतर जवळपास अर्धा तास शालू तिच्याबरोबर गप्पा मारत होती. जुईत आपण इतके कसे रमलो? तिचे तिलाच आश्चर्य वाटले. या अर्ध्या तासात तिने कामिनीबद्दल, ती घरी आहे याव्यतिरिक्त काहीही माहिती दिली नाही! शालूला याचे आश्चर्य वाटले. ती जुईसोबत गप्पा मारत असतानाच राघोच्या गाडीचा हॉर्न वाजला. तसा जुई तिथून क्षणार्धात अदृश्य झाली! म्हणजे जुई राघोला घाबरते की कामिनीला? आणि का? आणि इतक्या लोभस पोरीला राघो महिना महिना भेटू नये..! शालूच्या डोक्यात प्रश्नांचे मोहोळ उठले. पण राघोला विचारण्यात काहीच अर्थ नव्हता. ती आता गर्भार होती. कामिनीची दुष्ट नजर तिच्यावर पडू नये म्हणून तिला घराच्या मागच्या अंगणात जायला पूर्ण बंदी होती. असे असताना जुईशी भेट झाली एवढे जरी कळले तरी त्याने डोक्यात राख घालून घेतली असती! कामिनीने स्वतःच्या लालसेपोटी चिमुकलीचे पूर्ण आयुष्य बरबाद केले. तिला कामिनीची चीड आली. जुई भेटल्याचे न सांगण्याबद्दल तिने माळी काकांना बजावून तीही घाईघाईत घरात आली.

*(क्रमशः)*

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + 7 =