You are currently viewing फुटीर आमदारांचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही

फुटीर आमदारांचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही

केसरकर आधी तोंडाला लगाम घाला, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा इशारा

सिंधुदुर्ग

फुटीर आमदारांचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्या डोक्यात हवा गेली आहे. ते आपली लायकी विसरून बोलू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना आमदार केले मात्र खाल्ल्या मिठाला विसरलेले केसरकर हे सध्या पवार साहेबांवर टीका करत आहेत. त्यांनी ही टीका थांबवावी अन्यथा त्यांचे विमान रस्त्यावर उतरवायला वेळ लागणार नाही, वेळ पडल्यास त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जिल्ह्यात फिरु देणार नाहीत असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी दिला आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, युवक राष्ट्रवादीचे कणकवली विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नयन गावडे, सकाराम हुंबे, सेनापती सावंत, उत्तम तेली, सुजल शेलार आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अनंत पिळणकर पुढे म्हणालेत, दीपक केसरकर यांनी आधी आपला राजकीय इतिहास तपासावा. केसरकर हे पहिले काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर ते राष्ट्रवादी मधून सावंतवाडी चे नगरसेवक व नगराध्यक्ष झाले. याच दीपक केसरकर यांना नगरपालिका महासंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्ष केले. त्यानंतर याच केसरकर यांना शरद पवार साहेबांनी विधानसभेत पोहोचविले हा सर्व प्रवास शरद पवार यांच्या आशीर्वादामुळेच झाला याचा विसर दीपक केसरकर यांना पडला आहे. कालपरवापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये लहानाचे मोठे झालेल्या केसरकर यांना आता खोट्या हिंदुत्वाची नशा चढली आहे. या नशेत ते काहीही बरळायला लागले आहेत. त्यांची नशा उतरायला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वेळ लागणार नाही. असे देखील पिळणकर यावेळी म्हणाले.

केसरकर हे फुटीर शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. पोपटपंची करण्यात केसरकर यांचा हात कोणीही धरू शकत नाही. मात्र हेच केसरकर शिंदे गटात किती दिवस राहतात हे येणाऱ्या काळात जनतेला समजेल. कालपरवापर्यंत नारायण राणे यांना दहशतवादी म्हणणारे केसरकर आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची भाषा करू लागले आहेत. यावरून केसरकर यांच्यातील लखोबा लोखंडे जिल्ह्यातील जनतेला समजून आला आहे. त्यामुळे पुढच्या विधानसभा निवडणुकीत केसरकर यांचे राजकीय दुकान सावंतवाडीकर जनता बंद केल्याशिवाय राहणार नाही आणि हे दुकान बंद करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आघाडीवर असतील हे केसरकर यांनी ध्यानात ठेवावे.

दीपक केसरकर हे अन्य लोकांची वय काढतात. आता केसरकर यांनी लक्षात ठेवावे की ज्या पवार साहेबांवर आपण बोलता त्यांचे राजकीय वय तुमच्या वया एवढे आहे हे लक्षात ठेवा आणि बोला. शरद पवार साहेबांनी स्वच्छ मनाने अनेकांना मोठे केले मात्र तुमच्यासारखे फुटीर खाल्ल्या ताटात हात धुवून निघून गेले. त्यामुळे तुम्हाला पवार साहेबांवर बोलण्याचा अधिकार नाही आणि तुमची तेवढी पात्रताही नाही, हे लक्षात ठेवा आणि जिभेला लगाम घाला. अन्यथा शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काय आहे हे तुम्हाला दाखवून द्यावे लागेल, असा इशारा देखील अनंत पिळणकर यांनी दिला आहे. खरंतर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला तुमच्यावरही बोलायची इच्छा नव्हती, मात्र आमच्या दैवतावरच तुम्ही कृतघ्न होऊन बोलू लागलात म्हणून ही वेळ आमच्यावर आली आहे. आणखीन याच्यापेक्षा वाईट वेळ आणू नका एवढेच सांगतो, असा थेट इशारा पिळणकर यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा