You are currently viewing विठ्ठल पाहुणा

विठ्ठल पाहुणा

*शब्द वैभव, साहित्य कणा, कुसुमाग्रज अशा विविध समूहावर कार्यरत लेखिका कवयित्री शीला पाटील यांची अप्रतिम भक्ती रचना*

*विठ्ठल पाहुणा* ( *अष्टाक्षरी* )

सोनसळी गहु बाई
साठवते डेऱ्याआड
विठुराया घरी आला
आषाढाच्या महिन्यात

ताटी भोजनाला केली
बाई पुरणाची पोळी
धार साजुक तुपाची
वर टाकली मायेची

ताटी लावायला केला
दुधसाळी मऊ भात
शिरा पुरी सप्त भाजी
लवणाची त्यास साथ

दुधी भोपळ्याची वडी
वेली फळे सोबतीला
केली कांडून कुटुन
खीर गव्हाची जोडीला

कानवला उकडते
गोड सांजोरी भरते
चुल भानोशाची पुजा
वर अत्तर शिंपते

माझ्या विठु रायासाठी
चंदनाचे पीढे पाट
तीन चुले मांडायला
माय भीमेचे तीरथं

समईची तेलवात
सुगंधाची उदबत्ती
चंदनाची गंधगोळी
विठ्ठलाच्या माथी

माझा विठ्ठल साजिरा
किती आळवावु त्यास
किती गोड त्याचे रूपं
किती करु ऊठबस

केळी पानावर वाढु
किती सुग्रास भोजन
माझी शबरीची भक्ती
धन्य सारे भक्तजन

पंढरीचा राजा आला
माझ्या निर्धन कुडीत
भाग्य उजळले माझे
मज जनीची सोबत

राहो निरंतर देवा
तुझी कृपा मजवर
तन मनात असावा
नित्य तुझाचं गजर

*शीला पाटील. चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा