You are currently viewing नाही मी बिच्चारी

नाही मी बिच्चारी

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ.राधिका भांडारकर यांचा अप्रतिम लेख

मी स्वत:चाळीस वर्षे नोकरी केल्यामुळे, नोकरी करणार्‍या स्त्रीच्या समस्या मी जवळून पाहिल्या आहेत.अनुभवल्याही आहेत.
अर्थात काळाप्रमाणे समस्यांचं स्वरुप बदलतं.ज्या काळात मी नोकरी करत होते तो काळ ,नोकरी करणार्‍या स्त्रियांसाठी सुरवातीचा होता. आताच्या मानाने संख्या कमी होती. समाजाची मानसिकता तयार व्हायला वेळ लागतो.
स्त्रियांची कामे ,पुरुषांची कामे यातला फरक तेव्हां ठळक
होता. त्यामुळे घर,संसार नोकरी सांभाळणं म्हणजे खरोखरच तारेवरची कसरत होती.
पण तरीही कालही आणि आजही ऊंबरठा ओलांडलेल्या स्त्रीच्या बेसीक,प्राथमिक स्वरुपाच्या समस्येत फारसा बदल झालेला नाही.आणि तो फक्त आपल्याच देशात आहे असं नाही,देश विदेशातल्या समस्त स्त्रियांच्या
त्या समस्या आहेत.
मूळात नोकरी करणार्‍या स्त्रियांचे दोन ठळक प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात ती तिची आर्थिक गरज असते.
आणि दुसर्‍या प्रकारात ती तिची बौद्धिक गरज असते. आणि मग सवयीने ती गरज आर्थिकही बनते.दुसर्‍या प्रकारात विशेषत: स्वावलंबन,स्वातंत्र्य,स्वत:ची ओळख.,सम्मान
अस्तित्व असे स्वकेंद्रित घटक प्रामुख्याने असतात.त्यामुळे त्यातली जिद्द,युद्धं निराळी असू शकतात. शिवाय ती स्वत:चं विश्व उभारण्यासाठी काही सपोर्ट सिस्टीम्स खरेदी
करुच शकते.पण तरीही “नोकरी करणारी स्त्री” या उपाधीला चिकटलेल्या समस्या जवळजवळ सारख्याच असतात.
पहिली समस्या घरातूनच सुरु होते.कुटुंबाचं संपूर्ण
सहकार्य मिळणं हे अत्यंत जरुरीचे असते. त्यातूनही जोडीदाराचा समंजसपणा हाही तितकाच महत्वाचा असतो.
ती पैसे मिळवते,कुटुंबाचा आर्थिक भार पेलते ,त्यासाठी तिला आपल्या मदतीची गरज आहे या जाणीवेनं एखादं
कुटुंब तिच्यापाठी भक्कमपणे उभं राहिलं तर तिचा मानसिक भार खूप कमी होऊ शकतो. संयुक्त कुटुंबात
असे देखणे चित्र पहायला मिळतेही. पण तिथेही नाण्याला दोन बाजू असतात.पिढ्या न् पिढ्या चालत आलेले सण,सोहळे,परंपरा नातीगोती,पाहुणचार यांचीही जपणूक
करताना या स्त्रीची भरपूर दमछाक होते.इथे थोडी देवाण
घेवाणाचीही मानसिकता असते.”आम्ही करतो ना मग तूही थोडं कर ना..”असं सरळ अदृष्य गणित असतं आणि अशा वेळी मला नाही जमत वा मला नाही पटत ,नाही माझ्याकडे वेळ ..यात ती अडकते. एका प्रचंड गिल्ट मुळे ती मानसिक दृष्ट्या थकते.खचते.पण show must go on..या रेषेवर तिची कसरत चालूच राहते.
संसार दोघांचाच असेल तर नोकरी करणारी स्त्रीच्या समस्या अधिकच
वर्धित झालेल्या असतात. त्यातून लहान मुलांचे संगोपन,त्यांची आजारपणे
सांभाळ,आणि नोकरी ..मग घरातच एखादी बेबीसीटर
ठेवा नाहीतर पाळणा घरचा आधार घ्या.पण प्रचंड ताण हा असतोच. इथे पती पत्नीच्या समंजस संवादाचा कस लागतो. इथे घरातल्या सर्व स्तरावरच्या कामाची वाटणी
समान असणेच अपेक्षित असते.
“तू पण दमतेस. आज मी स्वयंपाक करतो…”इतकं जरी त्यांनी म्हटलं ना तरी तिला हायसं वाटतं.मनात विसावा मिळतो.
आतापर्यंत आपण फक्त घरातल्याच समस्यांबद्दल विचार केला. पण ज्या ठिकाणी ती काम करते तिथलेही सूर तिला लावावे लागतात. मूळातच नोकरी करणार्‍या स्त्रीबद्दल पुरुषांच्या मनात ,सुप्त असुया असतेच.तिचे मानसिक खच्चीकरण कसं होईल यासाठी हरप्रकारे तिच्या विकासाच्या मार्गात काटे पेरले जातात. तिच्या बारीक सारीक चुकांवर सारे टप्पून बसतात. केवळ, स्त्री,म्हणून तिच्या बढत्या डावलल्या जातात.तिला संधी नाकारली जाते.पुष्कळ वेळा तिच्याशी मित्रत्वाने वागणारे सहकारीच,
तिच्या मार्गातले अडथळे ठरतात. फसवणुकीच्या अशा धक्क्याने ती कोलमडते. खचते. क्षणोक्षणी वाटतं की राजीनामाच द्यावा.शांत जगावं. या “हो नाही’च्या संघर्षात
ती सतत असते. पिळवटून जाते. शिवाय तिचं अत्यंत मौल्यवान असं स्त्रीत्वही तिला जपायचंच असतं. ते मलीन होणं म्हणजे तिच्यासाठी संपणं असतं.उंबरठ्या बाहेर,या बाहेरच्या जगातल्या सुरक्षिततेविषयी काहीच भरवसा नसतो….
पण सख्यांनो,संपूर्ण नाही, पण थोडंफार या नोकरी करणार्‍या स्त्रीसमस्येविषयी, मी रवंथ केलं जरी तरी मी विचारते ,समस्या कुणाला नसतात?कुठल्या क्षेत्रात नसतात.? अहो गृहिणीलाही समस्या असतात. नोकरी करणार्‍या स्त्रीला, इतकी मोठी लढाई करुन ,काही दाम तरी मिळतो. घरातली स्त्री तर अखंड कुटुंबासाठी विनामूल्य राबत असते.मग तो तिचा आनंद,समाधान,सौख्य असते.
मी पाहू कशाला नभाकडे असे उदात्त विचारांचे मुलामे त्यावर लावलेले असतात.तिचं कोंडलेलं मन कुणी ऊघडतं का?
मी नोकरी करत असताना, माझी एक मैत्रीण मला म्हणाली होती ,”तुझं बरं आहे.नोकरीच्या निमीत्ताने बाहेर पडता येतं.
मनासारखं राहता येतं,खर्च करता येतो….”वगैरे वगैरे ती तुलनात्मक बोलत होती.आणि खरोखरच मी निवृत्त झाले आणि फुलटाईम या गृहिणीच्या भूमिकेत आले ,तेव्हा मी तिचं दु:ख जाणू शकले.खरंच,नोकरी करत असतानाच मी अधिक सुखी होते का? असे मला वाटू लागले.जाउदे!
तो वेगळाच विषय आहे. त्यावर नंतर बोलू.
तर सख्यांनो सर्व सम्यसांचा स्वीकार करुन आपण पुढे
जाऊ शकतो ना? मूळात स्वत:लाच सक्षम, सबल करणे,
सतत “मी बिच्चारी” हा मुखवटा काढून टाकणे.
परिवार असो,अथवा अॉफीस असो,सुसंवाद साधणं अतिशय जरुरीचं असतं.तुमच्या प्रभावी व्यक्तीमत्वाचा नेहमीच सकारात्मक परिणाम होऊ शकतो. शिवाय वेळेचं नियोजन,
स्वयंशिस्त आणि आत्मविश्वास असणारी स्त्री नाही डगमगत. “मी हे करुच शकते.. “ही भावनाच बळ देते.
समस्या आहेतच,पण त्यावर मात करून स्वत:ला सिद्ध करेनच ही मानसिकता जी स्त्री बाळगते ती स्त्री घरात, बाहेर कुठेही यशस्वी होतेच.

धन्यवाद!

*राधिका भांडारकर पुणे*.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × two =