You are currently viewing जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ राधिका भांडारकर यांनी कालीदास दिन विशेष लिहिलेला अप्रतिम लेख

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ राधिका भांडारकर यांनी कालीदास दिन विशेष लिहिलेला अप्रतिम लेख

३० जून कालीदास दिनानिमीत्त ,कालीदासांविषयींच्या भावना व्यक्त करताना माझ्या बुद्धीची ,जाणीवेची झेप किती तोकडी आहे हे जाणवतंच.
कालीदास हे प्राचीन भारतातील श्रेष्ठ आणि महान संस्कृत कवी ,नाटककार आणि लेखक.त्यांचे नाट्य आणि काव्य,हे प्रामुख्याने,रामायण,महाभारत,वेद,आणि
पुराणातील कथांवर आधारभूत आहे.
राजा विक्रमादित्याच्या नवरत्न दरबारातील कालीदास हे श्रेष्ठतम रत्न!! त्यांच्या साहित्यात प्रामुख्याने शृंगाररसाचा अनुभव येतो.परंतु त्यांनी त्यांच्या लेखनात,काव्यात आदर्शवाद आणि नैतिक मूल्यांची जपणूक केलेली आहेत..त्यांच्या शृंगार रसात कुठेही अश्लीलता ,लैंगिकतेचा बीभत्स अतिरेक नसून ,पवित्र,उदात्त प्रेमाचाच अविष्कार आहे.विरहाच्या व्याकुळतेतल्या भावना निर्मळ आहेत.
गुप्त डायनेस्टीच्या काळातल्या या महान व्यक्तीचे ,उत्तराखंडमधल्या,रुद्रप्रयाग जिल्ह्यातील कविल्का नावाचे गाव,हे जन्मस्थान.राजकुमारी विद्योत्तमा बरोबर त्यांचा विवाह झाला होता.विद्योत्तमा ही ज्ञानी आणि बुद्धीमान होती.
कालीदासांविषयी बर्‍याच आख्यायिका आहेत.मूळात एक मूर्ख माणूस अशी त्याची ख्याती होती.आणि त्यांच्या ज्ञानी पत्नीने त्यांना पंडीत बनण्याचे आवाहन दिले…
कालीदासाने ते स्वीकारले आणि तद्नंतरच त्यांच्या हातून एकाहून एक ऊत्कृष्ट साहित्यनिर्मीती झाली.
रघुवंश,कुमारसंभव ही महाकाव्ये,मेघदूत,ऋतुसंहार ही खंडकाव्ये,आणि अभिज्ञान शाकुंतलम् ,मालविकाग्निमित्र,
विक्रमोर्वशीय ही नाटके आणि इतर अनेक संस्कृत रचनांची देन कालीदासांनी साहित्यविश्वाला दिली.
आजही त्यांच्या रचनांच्या सौंदर्यस्थळांचा सखोल अभ्यास केला जातो….
कालीदास कुणी वाचला,अभ्यासला असो वा नसो ,मात्र,आषाढस्य प्रथम दिने….ही ओळ आणि कालीदास याची आठवण प्रत्येक साहित्यप्रेमी मनात
बाळगून आहे.
आषाढ महिन्याचा पहिला दिवस,कोसळणारा पाऊस आणि आकाशात वाहणारे ढग यांचे अतूट नाते कालीदासाच्या मेघदूताने अजरामर केले…काव्यकल्पना किती सुंदर,अलवार लवचिक,आणि उंचीची असू शकते याचा अनुभव मेघदूताने दिला…
एका यक्षाच्या विरहव्याकुळतेची ही काल्पनिक कथा या काव्यात गुंफली आहे..
नेमून दिलेल्या कामात खंड पडल्यामुळे कुबेर ,यक्षास
अलकापुरीहून एक वर्षासाठी हद्दपार करतो. हा शापीत यक्ष रामगिरी पर्वतावर ,तळ्याकाठी असलेल्या आश्रमात येतो.अलकापुरीत त्याची प्रेयसी असते.तिच्या विरहात तो व्याकुळ होतो.प्रेमिकेस प्रीतीचा संदेश पोहचवण्यासाठी
त्यास कुणी संदेशवाहक मिळत नाही.आणि अचानक एक दिवस…आषाढातला पहिला दिवस..आकाशात संथपणे विहरणार्‍या मेघाला पाहून त्याच्या सवे
प्रेमिकेला निरोप पोहचवण्याची कल्पना त्याला सुचते.
कोसळणार्‍या पावसामुळे विरहव्याकुळ यक्षाला तो मेघ दूतासारखा भासतो.आणि या कल्पनेतूनच मेघदूत हे अमर,अभूतपूर्व काव्य बरसले…कालीदासाची ही अनन्यसाधारण अशी काव्य कलाकृती आहे..
या दूतकाव्यात ,उत्तरमेघ आणि पूर्वमेघ असे दोन खंड आहेत.सहा सर्ग आणि साधारण एकशे पंधरा पदे आहेत.
उत्तरमेघात विरहदग्ध यक्षाने मेघाला आपली प्रेमकहाणी
विदीत केली आहे.अलकापूरीचं सुंदर वर्णन आणि मार्ग सांगितला आहे.प्रेयसीचं लावण्य कथीत केलं आहे.
मित्र सखा, दूत अशा दुहेरी भूमिकेत यक्ष मेघाला पाहतो.
तो मेघदूतास म्हणतो,
।।श्रीर्मा भूदेवं क्षणमपि चते विद्युता विप्रयोग:।।
या जलधराची प्रियतमा विद्युत असे कल्पून यक्ष त्यास म्हणतो,माझ्यासारखे विरहाचे भोग तुझ्या नशीबी कधीही न येवो!!
मेघदूत हे शृंगार रसमय काव्य असून हे करुणागीत नाही.
हा विप्रलब्ध शृंगार आहे ज्यात प्रियकर प्रेयसीचे मीलन होते….
मेघदूत हा एक मनोरम कल्पनारम्य अनुभव आहे…
मानवी जीवनात निसर्गाचे स्थान सांगणारा अनुभव…
वेदनांवर उतारा देणारा मित्र…प्रसंगी बनणारा दूतही..
आषाढाच्या प्रथम दिनी,पावसाळी वातावरणात या महान कवीचे स्मरण न होणे केवळ अशक्य….
या महान कवीस प्रेमादरपूर्वक वंदन…!!!

सौ. राधिका भांडारकर
पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 1 =