विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘सेवास्पर्श फाउंडेशन’चा करिअर मार्गदर्शन व गुणगौरव सोहळा
दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २३ मे रोजी हडपीवाडी-वराड येथे आयोजन
मालवण
सेवास्पर्श फाउंडेशन यांच्या वतीने दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. २३ मे रोजी दुपारी ३ वाजता हडपीवाडी वराड येथील ‘नम्रता हॉल’ येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
दहावी आणि बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे कोणत्या क्षेत्रात करिअर करावे, कोणत्या संधी उपलब्ध आहेत, याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारत सरकारचे वरिष्ठ अनुवाद अधिकारी (केंद्रीय वस्तू तसेच सेवा कर, मुंबई) सत्यवान रेडकर उपस्थित राहणार असून ते विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींवर मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी अनुभव कथन या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मुंबई येथील डॉ. जान्हवी लाड आणि सिंधुदुर्ग पोलीस दलातील करिश्मा चिंदरकर या आपल्या यशस्वी प्रवासाविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
“योग्य मार्गदर्शन… उज्ज्वल भविष्याची हमी!” हे ब्रीद घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा वराड व परिसरातील सर्व विद्यार्थी आणि पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सेवास्पर्श फाउंडेशनचे अध्यक्ष परमानंद वेंगुर्लेकर यांनी केले आहे.
