You are currently viewing भक्तिभावाची सरिता

भक्तिभावाची सरिता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते यांच्या कवितेवर प्रा .कविवर्य सू.द. वैद्य यांनी उधळलेली स्तुतीसुमने*

 

*’वि ग सा’ यांची कविता* –

*भक्तिभावाची सरिता*

————

*प्रा. कविवर्य सू .द. वैद्य*

 

आमचे सन्मित्र ‘ विगसा ‘ तथा *भावकवी वि.ग.सातपुते , पुणे (सातारकर ) यांचा माझा परिचय अगदी अलिकडचा तरी देखील युगानुयुगाचे नाते या अल्पकाळात जुळले गेले.*

*मातीचे गुण घेऊन माणूस जन्मतो घडतो हे खरे. भावकवी त्याला अपवाद नाहीत.* शौर्य धैर्याचे प्रतीक असणाऱ्या अजिंक्यताऱ्याच्या – शिवरायांच्या भूमीत त्यांचा जन्म झाला, बालपण गेले.याच भूमीत रामदासांचे ‘ प्रपंचविज्ञान ‘ मुरलेले होते, सज्जनगडावरील स्वामींच्या वास्तव्याने याच मातीत भक्तीचा मळा फुललेला होता. घरातील आणि या मातीतील संस्कार झेलून या कवीचे व्यक्तिमत्त्व संपृक्त झालेले दिसते.

 

आपल्या सातारा या जन्मभूमीचे माहात्म्य , गुणवर्णन करणारी एका अनामिक कवीची कविता त्यांना आठवते. त्या भूमीच्या शौर्याचे , भक्तीचे, रांगड्या भाषेचे ,परंपरेचे वर्णन त्यांना मोहविते .

याच मातीत ‘ जडणघडण सुंदर संस्कारांची ‘ झाल्याने आपले ‘ जीवन आज कृतार्थी आहे ‘ हे ते अत्यन्त कृतज्ञतापूर्वक नोंदवितात.

बालपणीच्या संस्कारक्षम वयात त्यांना श्रीधरस्वामींचे सान्निध्य लाभले , त्यांचा कृपाळू समर्थ वरदहस्त डोईवरून फिरला. *भक्तिप्रवण मनाला ‘ दिसामाजि काहीतरी ते लिहावे* ‘ ची प्रेरणा मिळाली. या छंदातूनच त्यांच्या कवितेचा उद्गम झाला.

 

सुरुवातीची त्यांची रचना ओवी अभंगसदृश आहे.संतरचनेतील गुणावगुण तेंव्हापासूनच्या त्यांच्या रचनेत दिसतात. रचनेत नियमांचा काटेकोरपणा नसला तरी अनुभूतीचा प्रामाणिकपणा मात्र आहे. त्यांच्या अंतर्मनाच्या अनुभूतीची ती एक प्रामाणिक , स्वाभाविक अभिव्यक्ती वाटते.

 

नितळ मनाच्या पाकळ्यांवरील भावनांचे चकाकणारे दवबिंदू ढळून निर्माण झालेल्या त्यांच्या बहुप्रसवा लेखणीतून गद्यपद्याच्या नदीने दुथडी वाहत जाणाऱ्या नदीने विशाल रूप केंव्हा घेतले हे त्यांनाही कळले नसेल.

या कवितेला विषयाचे बंधन नाही. ईश्वर,त्याविषयीची श्रध्दा – भक्ती अस्तिक्यभाव, निसर्ग – त्याचे सौंदर्य आणि गूढ , समाजस्थिती, चराचर जीवांची प्रेमभावना असे विविध विषय त्यांनी हाताळलेले आहेत. पण त्यांचा. पिंडच भक्तीचा असल्याने त्यांची ही कविता म्हणजे संतांच्या अपार करुणेचे दर्शन घडविणारा शांत, अथांग वाहणारा अमृतप्रवाह आहे

त्यात विचारांची स्पष्टता, आणि वाणीचा गोडवा आहे. तो त्यांच्या सत्यार्थी व्यक्तिमत्त्वाचा आरस्पानी आरसाच आहे.

*ईश्वरावरील प्रगाढ श्रध्दा हाच स्थायीभाव असल्याने ‘ जीवन ही परमेश्वराची देणगी आहे ‘ असा त्यांचा विश्वास आहे .*

असंख्य जीवनानुभव आणि कवितेचे अनेक आकृतिबंध हाताळणाऱ्या या कवीची कविता हा प्रसन्नतेचा भावनिक मळा वा भक्तिभावाची रोपवाटिकाच वाटते.आज तिने स्फुट अशा अवीट भावकवितेचे रूप धारण केले आहे. *ज्या तन्मयतेने ते संतांची रंगचित्रे चितारतात त्याच तन्मयतेने त्यांची प्रतिभा शब्दांतून भक्तिभावाचे संकीर्तन करते.*

 

भावसंवेदनांचे रंगबिरंगी गुच्छ माळणाऱ्या या भावकवीची कविता म्हणजे साक्षात भक्तिभावाची सरिता आहे.निखळ भक्ती हा तिचा पाया आहे.

त्यांच्या निसर्गवर्णनपर कवितेत ते डोळा देखत्या सौंदर्याचे वर्णन तर करतातच तेंव्हा ‘ मौनाची उलघाल होऊन ‘ दाटुन येते नेत्री अंबर ‘ हा अनुभव त्यांना येतो . सृष्टिपलीकडची सृष्टी पाहणारी कवीची *दृष्टी – प्रतिभा* मग ‘अव्यक्ताचे गूढ ‘ उकलत बसते. हाती बासुरी, पावरी , अलगुज घेऊन साक्षात कृष्णानेच त्याच्या सप्तसुरांनी आसमंत भारल्याची जाणीव होते. *अंतर्मनी आज घुमते पावरी* ‘ आणि ‘ *लोचनी तरळतो श्यामल सुंदर*’ , ‘सावलीपरी तूच संगती*’ हा भास नसून त्याच्या अस्तित्वाचा तो ‘ दरवळ ‘ असतो अशा साक्षात्कारा’ने ‘ शब्दांची ओढ अनावर होऊन कविता अवतरते ‘ ‘सृष्टीची आभा ‘ वर्णिताना ‘ *चैतन्याचा साक्षात्कार* ‘ होतो . असा त्यांचा अनुभव आहे.

वर्ण्य विषयाशी तद्रूप झाल्यावर कविमनातील खळबळीची कशी सहजाभिव्यक्ती होते हे सांगून कवी काव्यनिर्मितीची प्रक्रियाच स्पष्ट करतो.

कवीने लिहिलेल्या असंख्य अशा प्रेमविषयक कवितांतून मानवी प्रेमाच्या अनेक सुख – दुःखात्मक संवेदना देखील प्रतिमात्मक , उत्कट असतातच पण त्यांतून अनेकदा ईश्वरप्रेमच व्यक्त होते. त्याला मधुराभक्तीचे स्वरूप प्राप्त होताना दिसते. कवितेतील ‘ ती ‘ ‘ तो ‘ ‘ तू ‘ म्हणजे ईश्वरच असतो.भेटीची ओढ,विरहाचे दुःख,अतृप्तीची भावना, दर्शन, भेटीचा आनंद या साऱ्या भक्ताच्या भावना असतात.

*’ विगसा ‘ यांना ‘राखावी बहुतांची अंतरे ‘ चे बाळ कडूच मिळाले आहे . त्यांची प्रांजळ वाणी विनम्र, मृदु , आर्जवी, मधाळ, सात्त्विक आणि कुणाचेही बाळसे न मोडणारी आहे . त्यामुळे त्यांचा अनेक क्षेत्रांतील मित्र – परिवार, लोकसंग्रह दृष्ट लागण्यासारखा आहे. व्यवसायामुळे , साहित्यिक , शैक्षणिक राजकीय , सामाजिक क्षेत्रांतील अनेक दिग्गजांचा मित्रत्वाचा गोतावळा त्यांनी जमविला आहे.* त्यामुळे त्यांची दृष्टी नि व्यक्तिमत्त्व अनुभवसमृद्ध झाले आहे. कोणत्याही विषयावर ते भाष्य करू शकतात. त्यांच्या प्रतिभा – स्फुरणाला काळवेळेचे बंधन नसते .त्यांची सालस प्रतिभा हुकमी आहे . ते शीघ्रकवी आहेत .हे वरदान दुर्लभ असते.

त्यामुळे त्यांच्या सामाजिक कवितांतून हे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व प्रस्फुट झाल्याशिवाय रहात नाही.संतांच्या कणवेने ते समाजाकडे पाहतात. त्याच्या प्राकृतिक आचार विचारात होणाऱ्या अस्वाभाविक, पीडादायक वृत्यंतराने, स्थित्यंतराने त्यांचे मन कळवळते ,दुःखी होते.त्याने अनाचाराचा मार्ग सोडून सन्मार्गावर यावे यासाठी कविता त्याला मार्गदर्शन करते.त्याला काही शिकविण्याची, रुक्ष उपदेश करण्याची कवीची भूमिका नसते. ‘लाभाविण प्रीत करणारी कळवळ्या ‘ ची वृत्ती त्यातून दिसते.समाजातील दोष जावेत ,तो सुधारावा यासाठी त्याने आसूड हाती घेतला नाही,त्याचा भाव कधी कठोर होत नाही.दुःखी झाल्याने तो फक्त म्हणतो,

*१ केविलवाणे जीव धावती…*

*२ आसक्ती कुठेही थांबेना!…*

*३. विवेक आज हरपला..असे अनेक कवितांतून तो म्हणतो आणि शेवटी*

*४.’वात्सल्याविन व्यर्थ सारे ‘*

*५. ‘ दयाघना तुजविण रे दुजे सत्य कोणते ‘*

परस्परांतील स्नेह,प्रेम वाढावे अशीच अपेक्षा तो नोंदवितो. आचार, विचार- शुध्दीची ही अपेक्षा आहे . कुठलाही अभिनिवेश नाही.यात चुकीचे असे काहीच नाही

*विगसां ‘ ची कविता म्हणजे एक ‘मुक्तचिंतन’ आहे. ते साध्या, सरळ, सुबोध भाषेतून अवतरते.* अलंकरणाचा त्याला मोह नाही. जे व जसे शब्द समोर येतात तसे ते लेखणीतून झरतात. ‘गंधाळणे, अलवार ‘ अशा आवडीच्या शब्दांचे, ईकारान्त विशेषणांचे त्यांना विशेष आकर्षण आहे. नव्या नव्या शब्दांच्या शोधात आणि निर्मितीत ते रमतात . पंडिती काव्यातील चमत्कृती तिथे दिसत नाही. अनुभवाचे सच्चेपण जसे जमेल तसे प्रांजळ कवितेत अवतरते. थोडक्यात सरळ मनाच्या मनोभावांची ती प्रांजळ, सोज्वळ निर्मिती वाटते.

 

‘ *भावकवे* !

*तव प्रतिभेच्या लाटांवरचा तरंग व्हावे*

*तुला हव्या त्या तटास सहजी स्पर्शुन यावे ‘ असेच वाचकाला वाटल्याशिवाय रहात नाही.*

प्रतिक्रिया व्यक्त करा