You are currently viewing १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर उद्यापासून बंदी – संतोष जिरगे 

१०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर उद्यापासून बंदी – संतोष जिरगे 

वापर आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई…

मालवण

केंद्र सरकारने सिंगल युज प्लास्टिक बंदी बाबतच्या नियमावलीत सुधारणा केली आहे. यानुसार एक जुलैपासून १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक वर बंदी राहणार आहे शहरात पालिका प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नवीन नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांनी दिली.
प्लास्टिक पर्यावरणास हानिकारक असून प्रदूषणामध्ये मोठी भर पडणारे आहे. सन २०१६ मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने याबाबत सर्वप्रथम कायदा केला होता. एकदाच वापर करून फेकणाऱ्या प्लास्टिकला सिंगल युज प्लास्टिक असे संबोधले जाते. राज्य शासनाच्या कायद्यानुसार सुरुवातीला ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे कॅरीबॅग, वॉटर पाऊच, जेवणाचे ताट, ग्लास आदींवर बंदी घालण्यात आली होती. असे प्लास्टिक पर्यावरण प्रदूषणास घातक असल्याने त्याच्या उत्पादन विक्री व वापरात बंदी घातली गेली. महाराष्ट्रात याची अंमलबजावणी सुरुवात झाल्यावर १२ ऑगस्ट २०२१ रोजी केंद्र सरकारने सिंगल युज प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. यानुसार ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या सिंगल युज प्लास्टिक वर बंदी घालण्यात आली याची अंमलबजावणी ३० सप्टेंबर २०२१ पासून करण्यास सुरुवात करण्यात आली.
केंद्राने आता या नियमावलीत बदल करून येत्या १ जुलैपासून १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या सिंगल युज प्लास्टिक वर बंदी घातली आहे. सिंगल युज प्लास्टिक बंदी संदर्भात सुधारित नियमांतर्गत आता १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिकचे कॅरीबॅग, स्ट्रॉ, काड्या, ग्लास, चमचे, काटे, चाकू, मिठाई बॉक्स, सिगारेट पाकीट, निमंत्रण पत्रिकांवर ठेवलेल्या प्लास्टिकच्या फॉईल, पॉलिस्टीरीन वस्तू आदींचा समावेश आहे. १ जुलैपासून मालवण शहरातील नागरिक तसेच व्यापारी यांच्याकडे १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या सिंगल युज प्लास्टिक आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणारा आहे अशी माहिती मुख्याधिकारी श्री. जिरगे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − one =