You are currently viewing बांदा केंद्रशाळेत गुढी उभारून केला शाळा प्रवेशोत्सव

बांदा केंद्रशाळेत गुढी उभारून केला शाळा प्रवेशोत्सव

बांदा

विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील पहिला दिवस चैतन्यमय व अविस्मरणीय व्हावा यासाठी जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्रशाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशाची गुढी उभारून नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करून शाळेचा पहिला दिवस चैतन्यमय बनवला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्ष शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम राबवता आला नव्हता पण चालू वर्षी सर्वाधिक पटसंख्या असलेल्या बांदा केंद्रशाळेत मोठ्या उत्साहाने हा दिवस पार पडला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला हंबीराव मोहिते यांची भुमिका साकारणारे अनिल गवस तसेच देवमाणूस २ या मालिकेत काम करणारी वैष्णवी कल्याणकर या कलाकरांनी उपस्थित राहून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

या दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांचे औक्षण केले व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नारायण गावडे सर्व विद्यार्थ्याला झाडाचे रोप देऊन स्वागत केले. शाळेत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे उमटविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तकांचेही वाटप करण्यात आले. यावेळी सिनेअभिनेते अनिल गवस व वैष्णवी कल्याणकर यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करुन नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या .कार्यक्रमाला बांदा सरपंच अक्रम खान ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य संतोष बांदेकर,ग्रामपंचायत सदस्य उमांगी मयेकर, रवींद्र पटेकर आदि मान्यवर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख संदीप गवस यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक श्री जे.डी.पाटील केले तर आभार मुख्याध्यापक श्रीकांत आजगांवकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − eight =