You are currently viewing ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घ्या – सुरेश सावंत

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घ्या – सुरेश सावंत

आमदार नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्हयातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यात याव्यात, अशी मागणी भाजपा प्रदेश सदस्य, माजी सभापती सुरेश सावंत यांनी पत्रकाद्वारे आमदार नितेश राणे यांना केली.
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर साखर कारखाने सुरु होणार आहेत. त्यापुर्वी ऊसतोडणी चालू होणार आहे. मात्र गेली अनेक वर्ष कोकणातील ऊस जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत तोडले जात नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे फार नुकसान होते. जानेवारीमध्ये ऊस जाळून तोडला जातो. त्या ऊसाचा दर प्रति टन ४०० रूपये कमी मिळतो. उशिरा ऊस तोडल्यामुळे ऊसाचे वजन कमी होते. तसेच शेतक-यांना ऊस तोडून झाल्यावर ऊसाचा ट्रक भरण्याचे प्रत्येक टनामागे ४०० रूपये द्यावे लागतात. म्हणजेच शेतकऱ्याला प्रत्येक टनामागे ८०० ते ९ ०० रूपये मोजावे लागतात. जरी शासनाचा ऊसाचा दर प्रति टन २८०० रूपये असला तरी शेतकऱ्याला प्रति टनामागे १८०० ते १९०० रूपये मिळतात. या सर्व गोष्टीचा विचार करता ऊस उत्पादनाचा खर्च आणि विक्री याचा ताळमेळ बसत नाही. यामुळे कोकणातील शेतकरी फार नुकसानीमध्ये आहे. अन्य भागातील शेतकऱ्याला एवढा खर्च येत नाही. याबाबत शेतकऱ्यांनी अनेकवेळा निवेदने व तक्रारी केल्या आहेत. परंतु त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. उलट त्या शेतकऱ्यांकडे वाकडया नजरेने बघितले जाते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हयातील शेतकरी ऊस शेती करण्यास तयार होत नाहीत. सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये ऊस शेती करणाऱ्यांची संख्या फार कमी झालेली आहे. तरी आपण डी . वाय . पाटील साखर कारखान्याचे प्रतिनिधी व शेतकरी यांची बैठक घेऊन लवकरात लवकर ऊस तोडणी होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी आमदार नितेश राणे यांच्याकडे भाजपा प्रदेश सदस्य, माजी सभापती सुरेश सावंत यांनी पत्राद्वारे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + 14 =