You are currently viewing बांदा शहरात बी एस एन एल नेटवर्क ठप्प

बांदा शहरात बी एस एन एल नेटवर्क ठप्प

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी बी एस एन एल कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना विचारला जाब

बांदा

शहरात बीएसएनएलच्या मोबाईल, लँडलाईन व ब्रॉडबँड सेवेचा बोजवारा उडाला असून ऑनलाईन सेवेत व्यत्यय येत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. बांदा हे महत्वाचे टेलिफोन एकसेंज असतानाही येथील विभागीय कार्यालयात गेली कित्येक वर्षे कनिष्ठ अभियंता पद रिक्त असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बीएसएनएलच्या सावंतवाडी कार्यालयात धडक देत उपविभागीय अभियंता एस. पी. देशमुख याना जाब विचारला. येत्या आठ दिवसात अधिकारी नियुक्त न केल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी विधानसभा युवक अध्यक्ष शैलेश लाड यांनी दिला.

बांदा शहरात दीड हजाराहून अधिक लँडलाईनधारक आहेत. तसेच ५०० हुन अधिक इंटरनेट ब्रॉडबँडधारक आहेत. शहरात राष्ट्रीयकृत बँका, वित्तीय संस्था, पतसंस्था असून दररोज लाखो रुपयांचे आर्थिक व्यवहार होत असतात. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने शहरातील तसेच ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी ऑनलाईन अभ्यासिकेवर अवलंबून आहेत. त्यामुळे बीएसएनएलच्या विस्कळीत सेवेमुळे ग्राहक हैराण झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर शहरात केवळ एकच लाईनमन कार्यरत आहे. बीएसएनएलचे विभागीय कार्यालय हे कनिष्ठ अभियंता अभावी बंद असते. त्यामुळे ग्राहकांना तक्रार देण्यासाठी सावंतवाडी कार्यालयात जावे लागते. यामध्ये वेळ व पैशाच्या अपव्यय होत असल्याने याला जबाबदार कोण असा सवाल दळवी यांनी उपस्थित केला. विभागीय अभियंता देशमुख यांनी येत्या आठ दिवसात आपण प्रत्यक्ष बांद्यात येत पाहणी करून येथील समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याचे आश्वासन दिले. तसेच बांदा विभागीय कार्यालयात रिक्त असलेले कनिष्ट अभियंता पद तात्काळ भरण्यात येईल असे सांगितले.

यावेळी सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, जिल्हा उपाध्यक्ष शफिक खान, सावंतवाडी शहर अध्यक्ष देवेंद्र टेंमकर, युवक विधानसभा अध्यक्ष शैलेश लाड, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, संतोष जोईल, असलम खतिब, सोहेल शेख, अझहर खतीब आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × two =