You are currently viewing “माझी वसुंधरा” अभियानात सावंतवाडी नगरपरिषद कोकणात अव्वल…

“माझी वसुंधरा” अभियानात सावंतवाडी नगरपरिषद कोकणात अव्वल…

सावंतवाडी

सावंतवाडी शहरवासीयांसाठी अभिमानस्पद अशी कामगिरी झाली आहे ती माझी वसुंधरा अभियानात. कोकण विभागात “माझी वसुंधरा” अभियानात सावंतवाडी पालिकेने अव्वल क्रमांक प्राप्त केला आहे. सावंतवाडी पालिकेच्या घवघवीत, दैदिप्यमान यशाला सावंतवाडी शहरवासियांची मानसिकता आणि पालिका अधिकारी, कर्मचारी यांचे अथक प्रयत्न तसेच पदाधिकाऱ्यांच्या संवेदनशीलता कारणीभूत आहे.
सावंतवाडी हे ऐतिहासिक वारसा असलेलं शहर असून सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर हे पालिकेत नगराध्यक्ष असल्यापासून शहराचा खऱ्या अर्थाने विकास होत गेला. सावंतवाडी शहराला केसरकर दाम्पत्याच्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत देखील स्वच्छतेसाठी पुरस्कार मिळाला होता. दीपक केसरकर यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत सावंतवाडीतील लोकांचा रोष पत्करून देखील शहरातील रस्ते रुंदीकरण, बगीचे, मैदाने आदी विकसित करून शहराला एक वेगळे स्वरूप प्राप्त करून दिले होते. त्यांच्या नंतर सौ.पल्लवी केसरकर, बबनराव साळगावकर यांनी देखील शहर स्वच्छतेकडे प्राधान्याने लक्ष देत विकासासाठी प्रयत्न केले होते.
बबनराव साळगावकर यांच्या नंतर नगराध्यक्षपदी आलेल्या संजू परब यांच्या कारकिर्दीत कोरोनाचा प्रभाव सर्वत्र वाढला होता. कोरोनाच्या काळात आरोग्य सभापती असलेल्या अड.परिमल नाईक यांनी शहर स्वच्छतेसाठी मेहनत घेतली होती. शहरातील नागरिक देव्या सूर्याजी, संजू विरनोडकर यांच्या टीम ने शहरात फवारणी करून संसर्ग होऊ नये यासाठी प्रयत्न केले. शहरात वृक्ष लागवडीसाठी शहरवासीयांच्या मदतीने प्रयत्न करण्यात आले. वेगवेगळ्या स्पर्धा, रॅली आदींच्या माध्यमातून शहर स्वच्छतेबाबत जनजागृती करून स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोचविला होता. सावंतवाडी पालिकेतील तत्कालीन नगरसेवक तथा आरोग्य सभापती परिमल नाईक यांनी माझी वसुंधरा अभियान यशस्वीतेसाठी अधिकारी व पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने अथक परिश्रम घेतले होते, त्याचेच फलित म्हणजे सावंतवाडी पालिकेला कोकण विभागात अव्वल स्थान मिळाले.
भविष्यात होणाऱ्या इतर आरोग्य विषयक स्पर्धांमध्ये हीच भूमिका कायम ठेवत अधिक जोमाने अभियान राबविल्यास आपल्या शहराचे नाव राज्य, राष्ट्रीय पातळीवर देखील अग्रतेने अधोरेखित होईल असा विश्वास माजी आरोग्य सभापती अड. परिमल नाईक यांनी अभिनंदन करताना व्यक्त केला आहे.

माझी वसुंधरा अभियानात सावंतवाडी नगर परिषद कोकण विभागात अव्वल आली आहे. आज नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथे गौरव करण्यात आला. याबाबतची माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली असून सहकार्य करणाऱ्या सावंतवाडीकरांचे या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार्‍या पालिका कर्मचारी अधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.

शासनाकडून घेण्यात आलेल्या “माझी वसुंधरा” अभियाना अंतर्गत हे पारितोषिक त्यांना देण्यात आले आहे. कोकण विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे सावंतवाडी पालिकेचा सन्मान करण्यात आला आहे. या अभियानाची लोकचळवळ व्हावी, यासाठी सावंतवाडी पालिकेने प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तसेच हे अभियान यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सावंतवाडी पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 2 =