You are currently viewing संकेत

संकेत

मुंबई दूरदर्शनच्या वृत्तविभागात सहसंपादिका म्हणून काम केलेल्या लेखिका कवयित्री अलका नाडकर्णी यांची अप्रतिम गझल रचना

लांबलेल्या पावसाचे थेंब पडले आज थोडे
लोपल्या आशेस ओले कोंब फुटले आज थोडे

पेटुनी उठला नभाचा घुमट ज्वाळांनी रवीच्या
विझवण्या ती आग काळे मेघ जमले आज थोडे

युगयुगांच्या तापलेल्या भूवरी पडताच पाणी
अत्तराचे दाटलेले लोट उठले आज थोडे

गारव्याची वाट पाहत थांबले होते बियाणे
कोवळे हिरवे मृदुल उन्मेष हसले आज थोडे

पावसाविण कातळातुन वाळलेल्या निर्झरांना
वाहते होण्या पुन्हा आदेश सुटले आज थोडे

थांबले होते नद्यांचे साचलेले डोह काळे
भेटण्या त्यांना नवे ओहोळ झरले आज थोडे

सोसला विरहात मी सांगू कशी सारा उन्हाळा
मीलनाचे रे तुझ्या संकेत दिसले आज थोडे

अलका नाडकर्णी.
मुंबई.
९८२१३ ०८३५९

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 1 =