You are currently viewing सुंदरवाडीत रंगला गझल नवाज भीमराव पांचाळेंचा “एक जखम सुगंधी” कार्यक्रम

सुंदरवाडीत रंगला गझल नवाज भीमराव पांचाळेंचा “एक जखम सुगंधी” कार्यक्रम

गायक स्व.दशरथ सगम व स्व.मधुकर पास्ते यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजन

ओंकार भजन मंडळ सावंतवाडी व गझल सागर प्रतिष्ठान प्रस्तुती

गझल नवाज भीमराव पांचाळे यांचा बहारदार गझलांचा कार्यक्रम रविवारी संध्याकाळी सावंतवाडीत आर पी डी हायस्कुलच्या रंगमंचावर तलावाच्या काठी पार पडला. सावंतवाडीतील गायक स्व.दशरथ सगम व स्व.मधुकर पास्ते या गुणवंत गायकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ओंकार भजन मंडळ व गझल सागर प्रतिष्ठानने आयोजित केला होता.
गझल नवाज भीमराव पांचाळे यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपल्या गझल प्रवासाच्या १९७२ सालातील आठवणी सांगताना, पूर्वी गजलेच्या कार्यक्रमांसाठी श्रोते येत नसायचे, त्यावेळी श्रोत्यांना धरुन आणावे लागत होते आणि कार्यक्रम यशस्वी करावे लागायचे. परंतु आपण आपल्या गझलेतून श्रोते कमावले. अनेक देशांमध्ये आपण गजलेचे कार्यक्रम यशस्वी केले आहेत. सावंतवाडीतील गायक स्व.दशरथ सगम यांच्याशी अत्यंत चांगले नाते होते त्याची आठवण म्हणून सावंतवाडीत आजचा कार्यक्रम घेण्याचे ठरविले. कणकवली येथील विजय उर्फ व्हि के सावंत, नामानंद मोडक त्याचबरोबर सावंतवाडीतील किशोर सावंत, निलेश मेस्त्री इत्यादी सोबत चर्चा करून आजच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्याचे श्री भिमराव पांचाळे यांनी सांगितले. आजचा कार्यक्रम म्हणजे आपल्या मनातलं स्वप्न होत ते पूर्ण झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगत स्व.दशरथ सगम यांची आठवण म्हणून सगम यांनी गायलेली “अंदाज खरा असावा” ही गझल कार्यक्रमाच्या सुरुवातीला गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी गायली. कार्यक्रमाच्या अगोदर प्रा.फातर्पेकर यांच्या हस्ते गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कविवर्य दादा मडकईकर यांच्या हस्ते कार्यक्रमासाठी आलेले वादक वृंद या सर्वांचा सत्कार करण्यात आला. गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या हस्ते गायक स्व. दशरथ सगम व स्व. मधुकर पास्ते यांच्या कुटुंबियांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर गझलनवाज भीमराव पांचाळे दाम्पत्याने स्व. दशरथ सगम यांची आई व पत्नी यांचा खास हृद्य सत्कार केला. यावेळी हार्मोनियम वादक निलेश मिस्त्री तबला वादक किशोर सावंत, बंड्या धारगळकर, दिलीप वाडकर, निलेश मेस्त्री आदींचाही यथोचित सन्मान करण्यात आला.
गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या अप्रतिम गझल गायनाची सुरुवात इलाही जमादार यांच्या “अंदाज खरा असावा” या गझलेने झाली. त्यानंतर कोकणचे सुपुत्र वा. न. सरदेसाई यांची “हे का कुणी फुलांना सांगायला हवे”, जीवनाला दान द्यावे लागते, मी किनारे सरकताना पाहिले, थंडी हवा के झोके, अशा एकापेक्षा एक अफलातून गझलांचे सादरीकरण गझलनवाज भीमराव पंचाळे यांनी केले. सावंतवाडीतील रसिक श्रोत्यांनी प्रत्येक गझलेच्या शेराला टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली. त्यामुळे रसिक श्रोत्यांच्या प्रतिसादाने गझल गायनाचा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. रसिकांनी दिलेली दाद पाहून भीमराव पांचाळे देखील भारावून गेले. कार्यक्रमाचा शेवट करताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नावाजलेले गझलकार कवी कै.मधुसूदन नानिवडेकर यांची “भलभलते सांगतेस का उगाच भांडतेस” ही गाजलेली व भीमराव पांचाळे यांनीच गायलेली, संगीतबद्ध केलेली गझल सादर केली. “गरिबाच्या लग्नाला बायको गोरी काय काळी काय” या भैरवीने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.
सावंतवाडीत मोती तलावाच्या काठावर रंगलेला गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा गजलेचा कार्यक्रम रसिक श्रोत्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण करून गेला. “एक जखम सुगंधी” या नावाखाली रंगलेल्या कार्यक्रमासाठी कणकवली कुडाळ आदी ठिकाणावरून मोठ्या संख्येने गझल प्रेमी रसिक श्रोते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + fourteen =