You are currently viewing नीतेश राणे उद्या हायवे अधिकाऱ्यांसोबत नांदगावची पाहणी करणार…

नीतेश राणे उद्या हायवे अधिकाऱ्यांसोबत नांदगावची पाहणी करणार…

प्रांत कार्यालयात झाली बैठक ; हायवे प्रश्‍नांबाबत तोडगा निघणार…

कणकवली

नांदगाव तिठा येथील सर्व्हिस रोडचे काम अर्धवट ठेवून महामार्ग प्राधिकरणाने प्रवाशांना मृत्यूचे आमंत्रण दिले आहे. यासंदर्भात स्थानिक ग्रामस्थांसमवेत भाजपा आमदार नितेश राणे यांनी आज कणकवली प्रांत अधिकाऱ्यांची भेट घेतली व नांदगाव तिठा येथील प्रलंबित कामांबाबत चर्चा केली. महामार्ग प्राधिकरण चे कनिष्ठ अभियंता श्री. जाधव यांच्याशी संपर्क साधून उद्या १९ मे रोजी नांदगाव तिठा येथे प्रत्यक्ष भेटण्याच्या सूचना केल्या. घटनास्थळी भेट देऊन कोण कोणती कामे करावयाची आणि पावसाळ्या पूर्वी कोणती कामे तातडीने पूर्ण करायची याबाबतच्या सूचना आमदार नितेश राणे हे अधिकाऱ्यांना प्रत्यक्षच देणार आहेत.तसे आज प्रांताधिकार्‍यांसमोरच्या बैठकीत ही भेट ठरवण्यात आली.

प्रांत अधिकारी वैशाली राजमाने यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीला पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे , पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश बावडणे,असलदे सरपंच गुरुप्रसाद उर्फ पंढरी वायंगणकर ,नांदगाव सरपंच सौ. आफ्रोजा नावळेकर, नांदगाव उपसरपंच धीरज मोरये,तालुका अध्यक्ष मिलिंद मिस्त्री ,भाई मोरजकर, कमलेश पाटील,सर्वेश दळवी,आदी उपस्थित होते.

नांदगाव ब्रिज शेजारून जाणारा सर्विस रोड पूर्ण होत नाही तोपर्यंत श्री देव कोळंबा येथे मिडलकट ठेवून पर्यायी मार्ग द्यावा. स्पीड ब्रेकर ची मागणी नसताना महामार्ग प्राधिकरणाने असे ब्रेकर घालून प्रवाशांचे प्राण घेतलेले आहेत त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी या चर्चेदरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी केली. त्यावर आमदार नितेश राणे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना विचारणा केली असता मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. महामार्गावर गतिरोधक घालायचे असतील तर त्याबाबतची जाणीव करून देणारे फलन आधी लावले पाहिजेत. महामार्ग प्राधिकरणाने काल सायंकाळी गतिरोधक घातले आणि काही तासात हा अपघात झाला. महामार्गाला गतिरोधक घालण्याची पद्धत वेगळी असते त्याचा अभ्यास न करता नांदगावात उंचवटे सारखे गतिरोधक घालून अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणा दाखवून दिलेला आहे. अशा पद्धतीने काम करू नका जनतेच्या जीवाशी खेळू नका अशा सक्त सूचना यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिल्या. त्या निरपराध महिलेचा जीव गेला त्याला जबाबदार कोण आज त्यांच्या कुटुंबाला कार्यक्रम होता अशा प्रसंगी अशा दुःखद घटना होऊ नये याची काळजी संबंधित कंपनीने ही घेतली पाहिजे असे श्री राणे म्हणाले. प्रांत अधिकारी म्हणून आपणही संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात अशी चर्चा प्रांताधिकारी वैशाली माने यांच्यासमवेत आमदार नितेश राणे यांनी केली. दरम्यान हायवे लगत असलेल्या शाळेकडे नियमात बसणारा स्पीड ब्रेकर घालावा अशी मागणी होती तीन पूर्ण नकरता जिथे मागणी नाही तेथे स्पीड ब्रेकर घातले आहेत. एका घरात पावसाचे पाणी घुसते त्याच्यावरही उपाय केला पाहिजे तर सार्वजनिक विहीर होती त्याचे पैसे मूळ मालकाला मिळाले आहे त्यामुळे विहिरीचा प्रश्नही निकाली काढणे गरजेचे असल्याचे सरपंच पंढरी वायंगणकर ,आफ्रोजा नावलेकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिला. उद्या भेटीदरम्यान या प्रश्नावर प्रत्यक्ष तोडगा काढण्याचे आश्वासन आम.नितेश राणे यांनी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा