You are currently viewing अणसुर येथील दिप्तेश मेस्त्री यांना संगीत अलंकार पदवी

अणसुर येथील दिप्तेश मेस्त्री यांना संगीत अलंकार पदवी

वेंगुर्ले

नुकत्याच जाहीर झालेल्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या शास्त्रीय गायनाच्या परीक्षेत अणसुर – वेंगुर्ले येथील सुप्रसिद्ध भजनकार, संगीतकार बुवा दिप्तेश मेस्त्री यांनी शास्त्रीय गायन या विभागातून संगीत अलंकार ही पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली. आरवली वेंगुर्ले येथील ज्येष्ठ गायक, किर्तनकार श्रीराम दीक्षित यांच्याकडे गायनाचे प्रारंभिक धडे गिरविल्यानंतर त्यांनी ओल्ड गोवा येथील सुप्रसिद्ध गायक कै. बाळकृष्ण केळकर यांच्याकडे संगीत विशारद पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पणजी गोवा येथील पंडीत जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य रमेश सुखटणकर यांच्याकडून जयपूर, आग्रा आदी घराण्यांच्या घरंदाज गायकीचे शिक्षण घेत गुरूकुल पद्धतीने रियाझ करून संगीत अलंकार ही पदवी संपादन केली.

दिप्तेश मेस्त्री यांना संगीत कलेचा वारसा घरातूनच मिळाला. वडील ज्येष्ठ दशावतार कलाकार कै. दत्ताराम मेस्त्री (ताता) यांच्यापासून प्रेरणा घेत त्यांनी कॉलेज पूर्ण होईपर्यंत काही काळ दशावतार कलेची सेवा सुद्धा केली. त्या नंतर सन २००६ पासून आजतागायत ते अविरतपणे शास्त्रीय गायनाची सेवा करीत आहेत. दिप्तेश मेस्त्री हे एक लौकिकप्राप्त भजनी बुवा आहेत. त्यांच्या आजपर्यंत दहा भजनी सीडी मार्केट मध्ये आल्या आहेत. सोबतच त्यांनी गगनगिरी महाराज यांच्या चरित्रावर आधारित गाण्यांना सुद्धा चाली देऊन त्याची सीडी काढली आहे. दशावतार कलाकारांना ते नेहमीच अनेक प्रकारची गाणी रचना आणि संगीतबद्ध करून देतात. जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर ५०० हून अधिक भजन स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्यांनी अनेक स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक प्राप्त केले आहे.

संगीत कलेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी गेल्या १२ वर्षांपासून त्यांनी जिल्यातील विविध भागात भजन गायन, शास्त्रीय गायनाचे वर्ग सुरू केले आहेत. त्यांचे अनेक शिष्य त्यांच्या पाठोपाठ विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन नावलौकिक कमावत आहेत. दिप्तेश मेस्त्री यांनी गुरूकुल ही संगीत अकॅडमी सुरू केली असून त्याद्वारे ते घरंदाज गायकी शिकवितात. अनेक शिष्य त्यांच्या घरी राहून अखंड गायन सत्र या माध्यमाद्वारे गायन शिकत आहेत. दिप्तेश मेस्त्री आपल्या या यशाचे श्रेय आपले आई वडील, गुरु, पत्नी आणि समस्त कलाकारांना देतात. त्यांच्या या यशाबद्दल समाजातील विविध स्तरातून कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा