You are currently viewing नामाचा नंदादीप…

नामाचा नंदादीप…

नाम आणि उपासना…

 

*उपासना या शब्दाचा विग्रह उप अधिक आसन असा होतो. उप म्हणजे जवळ व आसन म्हणजे वास्तव्य देवाची उपासना याचा सरळ अर्थ आपले वास्तव्य देवाच्या जवळ असणे. ‘जवळ असण्याची क्रिया देहाने घडत नसून मनाने घडते. देहाने आपण कोठे आहोत व काय करीत आहोत यापेक्षा मनाने आपण कोठे आहोत व काय करीत आहोत याला अधिक महत्त्व आहे. देहाने देवघरात किंवा देवळात प्रत्यक्ष असूनसुद्धा मन जर माहेरी गेलेल्या पत्नीच्या घरी रेंगाळत असेल तर तो साधक पत्नीच्या माहेरघरीच वास्तव्य करून आहे असेच ठरते. तात्पर्य, जेथे आपले मन तेथेच वास्तव्य. म्हणूनच प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, मनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गीतेत भगवान सांगतात, ‘इंद्रियाणां मनश्चास्मि’ म्हणजे सर्व इंद्रियांत मन मी आहे. तुकाराम महाराज तर या मनाचे वर्णन फारच बहारीने करतात,*

 

*१) आधी मन घेई हाती । तोचि गणराजा गणपति ।।*

*२) मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण ।।*

*मोक्ष अथवा भवबंधन | सुख समाधान इच्छा ते ।।*

*मने प्रतिमा स्थापिली । मने मना पूजा केली ।।*

*मने इच्छा पुरविली | मन माऊली सकळांची ।।*

*मन गुरू आणि शिष्य | करी आपुलेचि दास्य ।।*

*प्रसन्न आपआपणास । गती अथवा अधोगती ।।*

*साधक वाचक पंडीत। श्रोते वक्ते ऐका मात ।।*

*नाहीं नाहीं आन दैवत । तुका म्हणे दुसरे ।।*

 

*मनाचे हे असाधारण महत्त्व लक्षात घेतल्यास असे आढळून येईल की केवळ मन हेच उपासनेचे केंद्र आहे.*

 

*देवाची उपासना म्हणजे दिव्यत्वाची उपासना देवाची प्राप्ती करून घेणे म्हणजे आपल्या दिव्य स्वरूपाची प्रचीती घेणे.सच्चिदानंदस्वरूपाचे अग्र सतत मनाला दाखवीत राहणे हीच खरी उपासना होय.स्वरूपाच्या ठिकाणी मनाला स्थिर करण्याच्या प्रयत्नालाच उपासना असे म्हणतात.मनाचे वास्तव्य स्वरूपी दृढ करण्यासाठी स्मरणाची आवश्यकता आहे.किंबहुना मन व स्मरण ही एकरूप आहेत.स्मरण हे मनाचे स्वरूप आहे तर मन हे स्मरणाचे रूप होय। आणि म्हणूनच दिव्य स्वरूपाचे स्मरण करणे हीच खरी उपासना होय.अशी उपासना करण्यासाठी कुठल्याही उपाधीची आवश्यकता नाही.भजन,पूजन, पारायण,तीर्थाटन वगैरे जे उपासनेचे प्रकार आहेत त्यांचा योग्य तो वापर झाला नाही तर समाधीऐवजी उपाधी मात्र वाढण्याची शक्यता अधिक आहे. त्यात हे प्रकार केवळ लौकिकासाठी घडू लागले तर अहंकाराचा नाश होण्याऐवजी साधकाच्या ठिकाणी अहंकाराची सूज दिवसेंदिवस अधिकाधिक बळावु लागते. तात्पर्य,स्वरूपाचे स्मरण करण्यासाठी उपचारांची किंवा उपकरणांच काहीच आवश्यकता नाही.केवळ स्मरणाने परिपूर्ण उपासना घडते. या दिव्य स्मरणाचे प्रत्यक्ष रूप आहे भगवंताचे दिव्य नाम.मन हे अत्यंत सूक्ष्म प्रबळ आहे.अशा या मनाला अंतर्मुख करून स्वस्वरूपी स्थिर करण्यासा जे साधन लागते तेही तसेच सूक्ष्म व समर्थ असावयास पाहिजे. भगवंताचे दिव्य नाम अत्यंत सूक्ष्म असून परममंगल व पवित्र आहे. अशा दिव्य हरिनामाचा सतत उच्चाराने व स्मरणाने मन अंतर्मुख होऊ लागते.मनाची चंचलता मोडून ते जसे जसे अधिकाधिक अंतर्मुख होऊ लागते तसे तसे त्या मनाला स्वरूपाचा स्पर्श घडू लागतो. स्वरूपाच्या स्पर्शाने मन सुखावते व देवाच्या चरणाला अधिकच बिलगू लागते.तुकाराम महाराज सांगतात-*

 

*लांचावलें मन लागलीसे गोडी |*

*ते जीवे न सोडी ऐसे झाले ।।* ‌

 

*तर नाथ महाराज सांगतात-*

 

*चित्त चाकाटले स्वरूपामाझारीं ।*

*ते न निघे बाहेरी ऐसें झालें ।।*

*चित्त विसरोनी चित्ता |*

*जडोनी ठाके भगवंता ।।*

*मनाची मोडली मनोगतता।*

*संकल्प विकल्पता करूं विसरे।।*

 

*भगवंताच्या दिव्य नामाने मनाचे उन्मन होते व बुद्धीत प्रकाश पडून जीवाला स्वतःच्या दिव्य स्वरूपाची प्रचीती येते.आणि म्हणूनच भगवंताच्या नामाचे सतत स्मरण करणे हीच उपासना होय.*

 

*🙏सद्गुरू श्री वामनराव पै.🙏*

प्रतिक्रिया व्यक्त करा